या उद्योजिकेने अहमदनगरमध्ये सुरू केलेला हाऊसकीपिंग व्यवसाय आता नाशिक, सांगलीपर्यंत पोहोचला

आठ वर्षे, ५५ कायमस्वरूपी कर्मचारी तर ७५ कंत्राटी कर्मचारी आणि ५० लाखांची उलाढाल असलेला ‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’चा प्रवास अहमदनगरपासून सुरू होऊन आता सांगली, नाशिक या शहरांपर्यंत पोहोचला आहे. अशी यशस्वी व्यावसायिक घोडदौड करणाऱ्या ‘प्राप्ती हाऊसकीपिंग’च्या वैशाली दीपक कुऱ्हे या अहमदनगरच्या. एम.कॉम., जी.डी.सी.ए. असलेल्या वैशाली एकत्र कुटुंबातून येतात. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायक आहे.

व्यवसायाची सुरुवात झाली ती अनपेक्षितपणेच. झालं असं की, पूर्वी मी सर्व प्रकारचे क्लिनिंगसाठी लागणारे फिनेल, टॉयलेट क्लिनर, डिश वॉश लिक्वीड, हॅण्ड वॉश तयार करून हॉटेल, हॉस्पिटलला पुरवठा करायचे. परंतु माझ्या बऱ्याच ग्राहकांचे म्हणणे असायचे की, तुम्ही हे साहित्य देताय, परंतु आमच्याकडे साफसफाईसाठी विशेष प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.

बरेच दिवस त्यावर अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की या प्रकारे आपण सेवा देण्यास सुरुवात केली तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना याचा लाभ होईल, असा विचार करून सुरुवातीला एक-दोन हॉटेलला हाऊसकीपिंग सर्व्हिसेस देऊन व्यवसायाचा श्री गणेशा केला.

मग पुढे प्रश्न पडला की, व्यवसायाला नाव काय द्यावं. मग ठरवले की माझी लहान मुलगी प्राप्ती. तिच्या नावाने सुरू करुयात आणि व्यवसायाला ‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ हे नाव दिले.

‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’मार्फत आम्ही स्वच्छतेसंबंधी सर्व प्रकारच्या सेवा पुरवतो. जसे की, नामांकित कंपन्या, शोरुम, शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये, हॉटेल, हॉस्पिटल, बँका या ठिकाणी साफसफाईची कामे करतो. तसेच घरगुती प्रकारामध्ये घर, बंगलो, फ्लॅट, रो हाऊस यांची डीप क्लीन करून देतो. तसेच घर कामासाठी मेड सर्व्हिस देतो.

आमच्या व्यवसायाचे वेगळेपण म्हणजे आज हाऊसकिपिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्या आणि संस्था आहेत, परंतु त्यांची जुनी ठेकेदारी पद्धतीची मानसिकता तशीच आहे. म्हणजे एखाद्या ग्राहकाने एखादे काम दिले तर ते एखाद्या ओळखीतल्या अकुशल कामगारामार्फत करून दिले जाते.

त्याचा परिणाम असा होतो की, त्या कामात गुणवत्ता राहत नाही त्यामुळे ग्राहकाला कुठल्याही प्रकारे समाधान मिळत नाही. परंतु आमच्या ‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’मार्फत तेच काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करून आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिन्सचा वापर करून ते काम पूर्ण करून देतो. त्यामुळे ग्राहकाला समाधान मिळते तसेच त्यांच्या वेळेचीदेखील बचत होते त्यामुळे ग्रहकांचा आमच्यावरील विश्वास वाढला.

यातूनच अनेक व्यावसायिकांची आमच्या सेवेची मागणी येऊ लागली. त्यामुळे आम्ही आता मोठ्या प्रमाणावर विस्तार वाढवून अधिकाधिक ग्राहकांना आपल्या मागणी नुसार सेवा पुरवतो. त्यामुळे आम्ही परिसरातील अनेक युवक युवतींना नोकरी उपलब्ध करून दिली.

सुरुवातीला आम्ही स्वतः ग्राहकांकडे काम मागायला जायचो. ते काम आम्ही मनापासून पूर्ण करून द्यायचो. असे करत असताना कामाची पद्धत आणि गुणवत्ता टिकून राहील याची नेहमी काळजी घेतली आणि त्यामुळेच आज अनेक ग्राहक आज स्वतःहून पुढे येऊन आम्ही त्यांच्याकडे सेवा द्यावी यासाठी आग्रही असतात.

त्याचबरोबरीने अहमदनगर येथील अनेक घरांची, बंगलो, फ्लॅट, रो हाऊस यांचीदेखील साफसफाई उत्तोत्तमरित्या आम्ही करत आहोत. यापूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत ग्राहक तितकेसे जागरुक नव्हते, परंतु आता चित्र बदलले आहे. लोक अधिक जागरुक झाले आहेत. लोक आता आपल्या घरातील सोफा, बेडरूम, किचनपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सर्व गोष्टींची सफाई आमच्याकडून हक्काने करून घेतात. आम्हालादेखील सेवा देताना खूप खूप आनंद मिळतो.

आमच्या व्यवसायाचा विस्तार करताना आम्ही आमच्या शाखा सांगली आणि नाशिक येथे सुरू केल्या असून तेथील ग्राहकांचादेखील मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. अशाच प्रकारे आम्हाला प्रत्येक शहरांमध्ये या सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने अत्यंत नियोजनपूर्वक आमची वाटचाल सुरू आहे.

२०१५ पासून मी या व्यवसायात आहे. आजमितीला आमच्याकडे ५५ कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग आहे तर कंत्राटी स्वरूपात ७० ते ७५ कर्मचारी आहेत.

एक महिला असल्याने सुरुवातीला खूप खूप अडचणी आल्या. जसे की, माझी मुले लहान असल्याने सुरुवातीला त्यांना सांभाळायचे की व्यवसायाकडे लक्ष द्यायचे यात तारांबळ उडायची, परंतु माझ्या पतीने मला या काळात खूप मोलाची साथ दिली. त्यामुळेच मी आज माझ्या या व्यवसायात खंबीरपणे उभी राहू शकले.

असे म्हणतात की, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रिचा हात असतो. पण खरे सांगायचे तर माझ्याबाबतीत हीच गोष्ट उलट आहे, कारण इथे माझ्या पतीने मला खूप मोलाची साथ दिली. ते माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले.

कुटुंबाला वेळ देण्यात सुरुवातीला व्यवसायवाढीच्या काळात मला खूप अडचणी आल्या. हळूहळू ती वेळ मागे पडली. पण आज मी काही वेळ आवर्जून काढते. वेळेचे योग्य ते नियोजन करून आम्ही सर्वजण बाहेर फिरायला जातो तसेच अनेकदा एकमेकांशी संवाद साधतो.

असे म्हणतात की, व्यवसाय करताना फक्त प्रॉफिट कमावणे हाच मुख्य हेतू नसावा. ज्या समाजातून आपण काही तरी उत्पन्न कमावतो त्या समाजासाठीदेखील आपण काही योगदान देणे गरजेचे असते आणि त्यामुळेच आम्ही मागील कोविड कालावधीत अनेक कोरोना सेंटरवर मोफत सेवा देऊ केली. भविष्यात विविध सार्वजनिक विभाग जसे की मोठ्या महानगरपालिका आणि त्याच प्रकरचे मोठे प्रतिष्ठान यांना सेवा देण्याचा विचार आहे.

– वैशाली कुऱ्हे
8625099826

The post या उद्योजिकेने अहमदनगरमध्ये सुरू केलेला हाऊसकीपिंग व्यवसाय आता नाशिक, सांगलीपर्यंत पोहोचला appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment