व्यवसाय विश्‍लेषणापेक्षाही महत्त्वाचे स्व-विश्‍लेषण

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू असताना आपण व्यावसायिक विश्‍लेेषण करतोच. उद्योग, त्याची प्रक्रिया, मोबदला, खर्च आणि बरेच काही. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करतो. पण बर्‍याच वेळेस या सर्व गोष्टींचा उत्तम अभ्यास करूनसुद्धा आपणस व्यवसायात हवे तसे यश मिळत नाही. याची बरीच कारणे असू शकतात. एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवसाय आणि व्यावसायिकाची सुसंगती आणि वैचारिक मेळ.

जेव्हा व्यवसाय आणि व्यावसायिक एक होतो त्यावेळी व्यवसाय हीच त्याची ओळख असते. हीच ओळख निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो. हीच एकता, सुसंगती, मेळ व्यवसायाला आणण्यासाठी आपल्याला एकदा तरी स्व-विश्‍लेषण करणे क्रमप्राप्त आहे.

स्व-विश्‍लेषण करणे म्हणजे काय?

आपल्या वैयक्तिक गोष्टींचा प्रभाव आपल्या व्यवसायावर होत असतो. अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करणे. त्यातील चांगल्या गोष्टींचा व्यवसायावर सकारात्मक प्रभाव कसा पडेल आणि वाईट गोष्टींचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करता येईल याचा अभ्यास आणि व्यवस्थापन. अशा किती आणि कोणत्या गोष्टींचा प्रभाव आपल्या व्यवसायावर होतो याचा अभ्यास करणे. उदाहरणार्थ…

भावना : खूप भावनाप्रधान असणे व्यवसायासाठी चांगले नाही, असे जुने लोक सांगतात. प्रॅक्टिकल विचार करावा. हे सर्व सत्य असेलही पण आपल्या भावनांचा सकारात्मक प्रभाव आपल्या व्यवसायावर कसा करता येईल. भावना जसे राग, आनंद, भीती आणि सर्व भावनांचा एक व्यावसायिक घटक म्हणून उपयोग करता येईल का? व्यवसायप्रक्रियेतील कोणती गोष्ट आपल्याला आनंद देणारी आहे. कोणत्या गोष्टींची भीती जास्त आहे, त्यावरील उपाय काय? कोणत्या गोष्टींचा राग येतो. ती गोष्ट आपण कशी दूर ठेऊ शकतो. याचे विश्‍लेषण अपेक्षित आहे.

‘लेखन’ ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. याचा मी व्यवसायात खूप उपयोग करतो. याने मला आनंदी राहण्यास मदत होते आणि व्यवसायातसुद्धा मदत होते.

नैतिक मूल्ये : मानवी जीवनाचा सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे नैतिक मूल्ये. माझ्या मते आपला व्यवसाय आपली वस्तू किंवा सेवा चालवत नाही, तर आपले मूल्ये आपला व्यवसाय चालवत असतात. म्हणून व्यवसायात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला प्रामाणिकपणा, निश्चय, प्रेम, निष्ठा याच गोष्टी आपल्या व्यवसायाचा पाया आहेत, मग त्यांचा अभ्यास करायला नको?

हातात घेतलेल्या कामाबद्दल आपण निश्चयी आहोत का? ग्राहकाप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल आपण निष्ठावान आहोत का? व्यवसायात दिल्या जाणार्‍या सेवेसाठी आपण सहृदयी आहोत का? हे सर्व आपल्याला तपासून बघावेच लागेल. या सर्व चांगल्या-वाईट उत्तरांचा आपल्या व्यवसायात कसा उपयोग केला जाऊ शकतो ते बघा.

शिक्षण आणि कौशल्य : याचे तर विश्‍लेेषण करावेच लागेल; किंबहुना व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू असताना आपण ते केलेही असेलच. आपल्या कौशल्याचा सकारात्मक प्रभाव कसा करून घेता येईल याचा विचार करावा. कधी कधी याचा शून्य किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो का ते तपासा. कौशल्यआधारित व्यवसाय आपल्याला कमी गुंतवणुकीत जास्त नफा देऊ शकतो. माझे टेक्निकल ज्ञान चांगले आहे. मी त्याचा पुरेपूर उपयोग माझ्या व्यवसायासाठी करतो का? याचे विश्‍लेषण करा.

प्रेरणा : व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि मोठा करण्यासाठी आपल्याला कोणती तरी प्रेरणा कार्यान्वित असते. आपली वैयक्तिक प्रेरणा काही. ती मला व्यवसायात उपयोगात आनंद देईल का? प्रत्येक वेळेला पैसे किंवा नफा हीच प्रेरणा असेल असे नाही. प्रशस्ती, अभ्यास किंवा आनंद हीसुद्धा प्रेरणा असू शकते. प्रत्येकाची काम करण्यामागची प्रेरणा वेगळी आहे. आपली कोणती आहे ते ओळख आणि त्याचा उपयोग व्यवसायात करा.

– मयूर देशपांडे
संपर्क – 7721005051
(लेखक व्यवसाय विश्‍लेेषक आहेत.)

The post व्यवसाय विश्‍लेषणापेक्षाही महत्त्वाचे स्व-विश्‍लेषण appeared first on स्मार्ट उद्योजक.