इमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी

प्रत्येक अभियंत्याचं स्वप्न असतं की नवनवीन आणि मोठ्यात मोठ्या इमारती उभ्या करायच्या, पण या उभ्या राहिलेल्या इमारतींची कधी ना कधी दुरुस्ती ही निघणारच आहे. मग ही दुरुस्ती करायला कोणाला बोलावलं जातं तर रस्त्यावरच्या कडियाला. मुंबईमध्ये पहिल्यांदा हे चित्र बदलणार्‍या अभियंत्याचं नाव आहे रत्नाकर चौधरी.

रत्नाकर चौधरी हे पेश्याने सिव्हिल इंजिनिअर. आपलं इंजिनिअरिंग पूर्ण करून त्यांनी एका ख्यातनाम बिल्डरकडे नोकरी स्वीकारली. म्हणतात ना नाम बडे और दर्शन खोटे, त्यातलीच गत. इमारती बांधताना किती गोष्टींशी तडजोड केली जाते हे बघून रत्नाकर नोकरीत अस्वस्थ होत होते. कारण त्यांना लक्षात येत होतं की आज आपण म्हणजे आपली कंपनी ज्या इमारती उभ्या करत आहे लवकरच त्यामध्ये अडचणी येणार आहेत.

एक अभियंता म्हणून आपणच या अडचणी सोडवल्या तर? असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. पण त्या काळात हे काम करणार्‍यांना समाजात प्रतिष्ठा नव्हती. एखाद्या कडियाला बोलवायचं आणि डागडुजी करून घ्यायची हेच रूढ होतं. रत्नाकर चौधरी यांनी हे चित्र बदलायचं ठरवलं आणि नोकरी सोडून ते या क्षेत्रात उतरले.

चौधरी यांनी बिल्डिंग रिपेअर आणि मेंटेनन्स या क्षेत्रात खर्‍या अर्थाने प्रोफेशनलिझम आणला. एखाद्या इमारतीची डागडुजी सुरू असताना त्याची बोर्ड लावून माहिती देण्याची पद्धत त्यांनीच सुरू केली. पुढे हाच ट्रेण्ड होऊ लागला आणि बरेच सिव्हिल इंजिनिअर या क्षेत्राकडे वळू लागले. रत्नाकर चौधरी या माणसानेच खर्‍या अर्थाने बिल्डिंग रिपेअर या धंद्याला ग्लॅमर मिळवून दिले आहे.

चौधरी यांची कंपनी बिल्डिंग रिपेअर आणि कन्स्ट्रक्शन अशा दोन्ही क्षेत्रात आहे. बिल्डिंग रिपेअरमध्ये तर भारतभरात कुठेही ते काम घेतात. एखादी इमारत पडेल असं जेव्हा सगळ्यांना वाटतं तिलाही रिपेअर करून जीवनदान देण्याची ताकद रत्नाकर चौधरींच्या कामात आहे आणि हीच याच त्यांच्या कामामुळे ते मुंबईमध्ये ओळखले जातात.

रत्नाकर हे १९८५ साली अभियंता झाले. पुढे सहा वर्षे नोकरी करून १९९१ पासून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज जरी रत्नाकर चौधरी हे बिल्डिंग रिपेअर क्षेत्रात एक प्रतिथयश नाव असलं तरी व्यवसायाच्या सुरुवातीचा काळ त्यांनाही खूप कठीण गेला होता. त्यांचा सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठीचा सांगितलेला एक किस्सा त्यांचा संघर्ष सांगण्यासाठी खूप बोलका आहे.

तेव्हा ते राहायला डोंबिवलीला होते, पण त्यांना अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या भागातच आपलं कार्यक्षेत्र निर्माण करायचं होतं. कारण खर्च करून बिल्डिंग मेन्टेन करायची मानसिकता या भागातल्या लोकांची जास्त होती. विलेपार्ले येथे त्यांनी एका सोसायटीचे कोटेशन भरले.

सोसायटीच्या लोकांनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं. मुलाखत खूप चांगली झाली. लोक त्यांना काम द्यायला तयारही होते, पण रात्री अपरात्री काम निघालं तर डोंबिवलीपासून ते विलेपार्ल्यात येणार कसं, या एकमेव अडचणीमुळे त्यांना त्या सोसायटीचं काम मिळालं नाही.

रत्नाकर चौधरी या अनुभवाने खूप अस्वस्थ झाले. तीन दिवस ते या गोष्टीचा विचार करत राहिले. तीन दिवसांनंतर ते पुन्हा त्या सोसायटीत जाऊन त्याचा सेक्रेटरींना भेटले आणि आपली अडचण त्यांना समजावून दिली. आपण मुंबईबाहेर राहतो म्हणून मुंबईत कधी काम करूच शकणार नाही का? यावर चौधरींना तोडगा हवा होता आणि त्यांना तो तिथेच मिळाला. त्यांनी स्वतःच्या लेटरहेडवर विलेपार्लेचा पत्ता आणि फोन नंबर टाकण्याची व्यवस्था केली.

आपल्या नकार दिलेल्या त्याच सोसायटीच्या सेक्रेटरींकडून त्यांनी त्यांचा पत्ता आणि फोन नंबर काही काळ वापरण्याची परवानगी मिळवली होती. पुढे पाच सहा नवी काम मिळाल्यावर त्यांनी विलेपार्ले इथे ऑफिस भाड्याने घेतले आणि लेटरहेडवर स्वतःच्या ऑफिसचा पत्ता लिहिला.

लवकरच ते राहायला ही डोंबिवलीहून गोरेगावला आले. चारच वर्ष गोरेगावात राहून त्यांनी जुहू या अतिश्रीमंत लोकांच्या वस्तीत स्वतःचे घर घेतले आणि गोरेगाव आणि विलेपार्ले अशी आपली दोन ऑफिसेस केली.

माणसं सांभाळणे हेसुद्धा चौधरी यांचं एक वैशिष्ट्य आहे. १९९१ सालापासून जो माणूस त्यांच्याकडे कामाला लागला, तोच आजही आहे. तेव्हा त्याला २७-२८ रुपये रोजंदारी मिळत होती ती आता बाराशे ते तेराशे आहे. १९९८ पासून सोबत असलेले इंजिनिअर्स आजसुद्धा त्यांच्याकडे नोकरी करतात.

कामातला प्रामाणिकपणा हीच त्यांनी ओळख आहे. एखाद्या कामासाठी दिलेला वेळ आणि खर्च यातच ते पूर्ण करून देणं हे ते स्वतःसाठी बंधनकारक मानतात. काम सुरू असताना लोक त्या इमारतीत राहत असतात, त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी ते आणि त्यांचे सहकारी घेतात.

२००२ पासून या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, ही बाब सांगताना आम्ही फक्त गुणवत्तेवर भर देतो. म्हणजे ज्या लोकांना कामात गुणवत्ता हवी आहे, तीच कामे घेतो. हे सूत्र ठेवले असेल तरी आजपर्यंत कधी कामांची कमतरता आलेली नाही, हे चौधरी निक्षून सांगतात.

बिल्डिंग रिपेअर सोबत रत्नाकर यांनी लाकडी घाण्याच्या तेलाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. नाशिकमध्ये याची फॅक्टरी आहे आणि विलेपार्ले इथेच याचेही ऑफिस आहे. रत्नाकर चौधरी यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यांची स्वतःची ३,००० पुस्तकांची लायब्ररी आहे.

आपल्या व्यावसायिक यशासोबत रत्नाकर चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाने सामाजिक भानही जपलं आहे. या कुटुंबाने कसार्‍याजवळ दोन छोटी गावं दत्तक घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी मस्वल्पविरामम नावाचा ट्रस्ट सुरू केला. या ट्रस्टच्या माध्यमातून या गावातील प्रत्येकाचा विकास करणे आणि त्यांना प्रगतीपथावर आणण्याचे काम केले जाते.

शून्यातून उभे राहिलेले रत्नाकर चौधरी नवोदित उद्योजकांना मार्गदर्शनही करतात. ‘मी उद्योजक’ या नेटवर्किंग फोरमचे ते सन्माननीय सदस्य आहेत.

संपर्क : रत्नाकर चौधरी – 9820231487

The post इमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment