ई-कॉमर्स क्षेत्रात उतरण्याचं धाडस दाखवून यशस्वी होणाऱ्या तरुणांची गोष्ट

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरीत एक राजकुमार रहात होता… अशी परीकथेसारखी सुरुवात असलेली एखादी गोष्ट प्रत्यक्षात उतरली तर? भारतात इंटरनेटचे आगमन झाले होते, परंतु ऑनलाइन बिझनेस हा उपक्रम कमकुवत मानला जात होता आणि त्याला काही भवितव्य असेल यावर फार कुणी विश्वास ठेवत नव्हतं. मुख्य म्हणजे त्या काळात इंटरनेटचा मर्यादित वापर केला जात असे; तोदेखील टेक्नॉलॉजी कंपन्यांकडून.

अशाच एका टेक्नॉलॉजी कंपनीत ते दोघं नोकरी करत होते; कंपनीचं नांव होतं ॲमेझाॅन. तिथेच दोघांची ओळख झाली आणि त्यांनी ॲमेझाॅनसारखीच दुसरी कंपनी स्थापन करण्याचं ठरवलं, पण त्यासाठी लागणारा फंड मात्र त्यांच्याकडे नव्हता.

त्यांच्या कंपनीत सुरुवातीला फक्त दोन माणसं होती; एक होता पॅकेजिंगमध्ये काम करणारा ज्याची आधीची नोकरी गेली होती आणि दुसरा होता कुणी भणंग वाटेल असा, कारण त्याच्याकडे होता व्यवस्थित चालणारा लॅपटॉप. २००९ मध्ये मात्र परिस्थिती बदलू लागली. अनेक व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी नकार दिल्यानंतर एका माणसाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि १ कोटी रुपयांचा निधी दिला. पुढे ‘टायगर ग्लोबल’ नावाच्या तुलनेने अपरिचित व्हेंचर कॅपिटल कंपनीने १० कोटी रुपये उभे केले.

सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी इंटरनेट उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचं धैर्य दाखवलं आणि त्यात यशस्वी होता येतं याचा परिपाठ घालून दिला.

जेव्हा फ्लिपकार्ट लाँच करण्यात आली तेव्हा ग्राहकांच्या मनात कोणत्याही वस्तूंची ऑनलाईन खरेदी ही श्रीमंतांची मिरासदारी आहे, असा समज होता. त्या काळात ई-कॉमर्स कंपनीला दोन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. एक म्हणजे ऑनलाइन पेमेंटची समस्या. बऱ्याच लोकांना ऑनलाइन पेमेंट करणं धोकादायक वाटत असे. पेमेंटचा गेटवे सेट करणे हे काम सोपे नव्हते.

फ्लिपकार्टने ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुरू करून ही समस्या सोडवली. लोकप्रिय ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधेची अंमलबजावणी करणारे फ्लिपकार्ट पहिले होते. दुसरी समस्या होती सप्लाय चेन मॅनेजमेंट. वेळेवर वस्तू वितरीत करणे हा ई-कॉमर्स कंपनीचे यश निश्चित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. फ्लिपकार्टने वेळेवर ऑर्डर वितरीत करण्यासाठी त्यांची स्वतःची सप्लाय चेन मॅनेजमेंट सुरू करून या समस्येचे निराकरण केले.

फ्लिपकार्ट ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे, आणि तिचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. फ्लिपकार्टची सिंगापूरमध्ये खाजगी मर्यादित कंपनी म्हणून नोंदणी झालेली आहे. सुरुवातीला फ्लिपकार्ट ऑनलाइन पुस्तक विक्री करत असे; आता मात्र त्यावर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरातील अत्यावश्यक वस्तू, किराणा सामान आणि लाईफस्टाईल उत्पादने उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत ॲमेझाॅन आणि स्नॅपडील. फोनपे ह्या मोबाइल पेमेंट सेवेची मालकीदेखील फ्लिपकार्ट कडे आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये अमेरिकन कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील ७७ टक्के मालकी हक्क १६ बिलियन अमेरिकन डॉलर इतक्या किंमतीला विकत घेतले, ज्यामुळे त्याचे मूल्य सुमारे २० बिलियन अमेरिकन डॉलर इतके झाले.

फ्लिपकार्टची स्थापना दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि ॲमेझॉनचे माजी कर्मचारी सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ऑक्टोबर २००७ मध्ये केली होती. फ्लिपकार्टने सुरुवातीला ऑनलाइन पुस्तक विक्रीवर लक्ष केंद्रित केले होते. कंपनीला हळूहळू प्रसिद्धी मिळत गेली. २००८ पर्यंत फ्लिपकार्टला दररोज १०० ऑर्डर मिळत होत्या. २०१० मध्ये फ्लिपकार्टने Lulu.com कडून बंगळुरूमधील सामाजिक पुस्तक शोध सेवा Weread विकत घेतली. २०११ मध्ये फ्लिपकार्टने Mime360.com डिजिटल वितरण आणि चकपाक या बॉलीवूड पोर्टलची डिजिटल लायब्ररी विकत घेतली.

भारताच्या रिटेल बाजारावर लक्ष ठेवून फ्लिपकार्टने २०१२ मध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक्स विक्रेते ‘लेट्सबाय’ आणि ‘मिन्त्रा’ या ऑनलाइन फॅशन रिटेलरला २८० दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेतले. एप्रिल २०१५ मध्ये फ्लिपकार्टने ‘ॲपिरेट’ ही दिल्लीमधील मोबाईल मार्केटिंग ऑटोमेशन फर्म ताब्यात घेतली. त्याच वर्षी डिजिटल मॅपिंग प्रदाता MapmyIndia मध्ये भागभांडवल खरेदी केले.

२०१६ मध्ये फ्लिपकार्टने रॉकेट इंटरनेटकडून ऑनलाइन फॅशन रिटेलर Jabong.com आणि UPI मोबाइल पेमेंट स्टार्टअप फोनपे ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या किंमतीला विकत घेतले. त्यानंतर अरविंद फॅशन्स लिमिटेडच्या नव्याने स्थापन झालेल्या अरविंद युथ ब्रॅण्ड्समध्ये कंपनीतील २७ टक्के स्टेकसाठी ३५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली.

त्यापुढे फ्लिपकार्टने आपले ऑनलाइन म्युझिक स्टोअर Flyte लाँच केले. विनामूल्य स्ट्रीमिंग साइट्सच्या उपलब्धतेमुळे Flyte अयशस्वी झाले. फ्लिपकार्टचे सिट्राॅन, डिजिफ्लिप, बिलियन, स्मार्टबाय, आणि मारक्यू असे स्वतःचे काही ब्रॅण्ड्स आहेत.

इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राकडून सचिन बन्सल यांना २०१२-१३ या वर्षातील सर्वोत्तम उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले. सप्टेंबर २०१५ मध्ये सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोन संस्थापक फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रत्येकी १.३ अब्ज अमेरिकन डॉलर संपत्तीसह ८६ व्या स्थानावर झेप घेतली. एप्रिल २०१६ मध्ये सचिन आणि बिन्नी बन्सल यांचे नाव टाईम मासिकाच्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक यादीत समाविष्ट करण्यात आले.

ऑक्टोबर २०२० मध्ये फ्लिपकार्टने २०४ दशलक्ष डॉलर्समध्ये आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलमध्ये ७.८ टक्के हिस्सा विकत घेतला. फ्लिपकार्ट होलसेलने अलीकडेच किराणा आणि एमएसएमईसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

ज्या काळात इंटरनेटचा वापर एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता, तेव्हां भविष्यात संपूर्ण देशात इंटरनेटचा प्रसार होणार आहे याबद्दलचा पक्का अंदाज त्या दोन तरुणांना आला होता आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी एक मोठी कंपनी उभी केली.

– चंद्रशेखर मराठे

The post ई-कॉमर्स क्षेत्रात उतरण्याचं धाडस दाखवून यशस्वी होणाऱ्या तरुणांची गोष्ट appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment