बांधकाम क्षेत्रामध्ये चौफेर कामगिरी बजावणारी पारशी माणसाची भारतीय कंपनी

मुंबई शहराचा अविभाज्य भाग आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेल्या हाँगकाँग बँक, ग्रिंडलेज बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ताज इंटरकॉन्टिनेंटल अशा अनेक इमारतींमध्ये काय साम्य आहे असं विचारलं, तर एकच नाव समोर येईल; शापूरजी पालनजी.

शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे. ही कंपनी रिअल इस्टेट, कापड, अभियांत्रिकी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, शिपिंग, प्रकाशने, उर्जा आणि जैवतंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य करते. कंपनीचे संस्थापक पालनजी शापूरजी मिस्त्री यांचे नातू, ज्याचे नावदेखील पालनजी मिस्त्री होते, २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यांचा मुलगा शापूर मिस्त्री उत्तराधिकारी बनला.

पालनजी शापूरजी मिस्त्री यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. ते भारतीय वंशाचे आयरिश अब्जाधीश बांधकाम व्यवसायिक आहेत आणि शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष आहेत ज्यांची गणना सर्वात श्रीमंत आयरिश व्यक्तींमध्ये होते.

त्यांच्या वडिलांनी १९३० च्या दशकात टाटा सन्समध्ये पहिल्यांदा शेअर्स खरेदी केले होते, ज्यामुळे मिस्त्री हे टाटा सन्समधील सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर बनले आहेत. पालनजी मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष आहेत. ते शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड, फोर्ब्स टेक्सटाइल्स आणि युरेका फोर्ब्स लिमिटेडचे मालक आहेत.

त्यांचा मुलगा सायरस मिस्त्री नोव्हेंबर २०११ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत टाटा सन्सचा अध्यक्ष होते. २०२२ मध्ये सायरस यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

पालनजी शापूरजी मिस्त्री यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांचा मोठा मुलगा शापूर मिस्त्री हा शापूरजी पालनजी समूह चालवतो, तर त्यांचा धाकटा मुलगा सायरस मिस्त्री याने काही वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले. मिस्त्री यांची मोठी मुलगी लैला आणि त्यांची धाकटी मुलगी आलू हिचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाले.

शापूरजी पालनजी समुह भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी उद्योगांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हाँगकाँग बँक, ग्रिंडलेज बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत आणि ताज इंटरकॉन्टिनेंटल यासह मुंबईमधील फोर्ट परिसरातील काही महत्त्वाच्या इमारतींच्या बांधकामासाठी कंपनी ओळखली जाते.

या व्यतिरिक्त, कंपनीने १९७१ मध्ये ओमानच्या सुलतानसाठी एक दगडी राजवाडा बांधला आहे. २००८ च्या मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर कंपनीने ताज हॉटेल आणि टॉवरच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम केले होते. कंपनीच्या इतर उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये मुंबईतील द इम्पीरियल, दुबईतील जुमेरा लेक टॉवर्स आणि मॉरिशसमधील एबेने सायबर सिटी यांचा समावेश आहे.

कंपनीची स्थापना ‘लिटलवुड पालनजी’ ही भागीदारी फर्म म्हणून १८६५ मध्ये करण्यात आली होती. पहिला प्रकल्प गिरगाव चौपाटीवर फुटपाथ बांधण्याचा होता, त्यानंतर मलबार हिलवरील ज्या जलाशयाने मुंबईला शंभर वर्षांहून अधिक काळ पाणीपुरवठा केला, त्याचे बांधकाम केले. कंपनीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमही बांधले.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन त्यांनी १.६ कोटी खर्चून बांधले आणि २१ महिन्यांत काम पूर्ण केल्याबद्दल मुंबईच्या तत्कालीन राज्यपालांनी कंपनीचे कौतुक केले होते. शिवाय दिल्लीतील बाराखंबा अंडरग्राउंड स्टेशन आणि गयानामध्ये प्रॉव्हिडन्स स्टेडियम बांधले आहे. कंपनीने भारतातील सर्वात उंच इमारत, द इम्पीरियल हा मुंबईतील एक निवासी टॉवर बांधला.

१९३६ मध्ये शापूरजी पालनजी यांनी एफ. ई. दिनशॉ अँड कंपनी विकत घेतली. एफ. ई. दिनशॉ अँड कंपनी ही एक प्रस्थापित भांडवल पुरवणारी कंपनी होती. कंपनीने १९२४ मध्ये ग्वाल्हेरच्या महाराजांकडून टाटा स्टीलसाठी (तत्कालीन टिस्को) कर्जाची व्यवस्था करणे आणि एसीसी सिमेंट कंपनीच्या निर्मितीसाठी स्थानिक सिमेंट कंपन्यांचे विलीनीकरण करणे यासारखे हाय-प्रोफाइल व्यवहार केले होते.

एफ. ई. दिनशॉ अँड कंपनी विकत घेतल्यामुळे त्यांचा टाटा सन्समध्ये जो १२.५ टक्के हिस्सा होता, तो शापूरजी पालनजी यांच्याकडे आला. २००२ मध्ये शापूरजी पालनजी यांनी पवनकुमार संवरमल समूहासोबत टेकओव्हरचा यशस्वी सौदा केल्यानंतर टाटा समूहाकडून फोर्ब्स आणि कंपनी ताब्यात घेतली.

शापूरजी पालनजी यांनी बॉलीवूडमध्येही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १९६० मध्ये रिलीज झालेला, के. आसिफचा उत्कृष्ट संगीत, सर्वात लोकप्रिय आणि समीक्षकांची प्रशंसा प्राप्त केलेल्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक अशा मुघल-ए-आझम या चित्रपटाला त्यांनी १.५ कोटीचा निधी दिला होता, ज्यामुळे तो सर्वात महाग चित्रपट ठरला. या चित्रपटाने अनेक विक्रम केले.

इतकंच नव्हे, तर चार दशकांहून अधिक काळानंतर १२ नोव्हेंबर २००४ रोजी प्रदर्शित झालेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाच्या डिजिटल रीमास्टरिंगसाठी ५ कोटींचा निधी दिला. हा निधी म्हणजे शापूरजी पालनजी मिस्त्री यांचे नातू शापूर मिस्त्री यांना त्यांच्या आजोबांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी योग्य श्रद्धांजली वाटली.

विशेष म्हणजे त्यांच्या आजोबांनी मूळ मुघल-ए-आझम चित्रपटाची कल्पना केल्याप्रमाणे चित्रपट रंगीत करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. २०१६ मध्ये शापूरजी पालनजी ग्रुपने नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या (इंडिया) सहकार्याने, फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ब्रॉडवे-शैलीतील संगीतमय मुघल-ए-आझमची सह-निर्मिती केली, जो १९६० च्या बॉलीवूड चित्रपट मुघल-ए-आझमवर आधारित होता.

शापूरजी पालनजी यांच्या उपकंपन्या :

एसपी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन
फोर्ब्स अँड कं.
युरेका फोर्ब्स
एसपी इन्फ्रास्ट्रक्चर
एसपी इन्व्हेस्टमेंट
एसपी तेल आणि वायू
एसपी रिअल इस्टेट
फकॉन्स इंन्फ्रास्ट्रक्चर
फॉर्वाल इंटरनॅशनल सर्व्हिसेस
स्टर्लिंग अँड विल्सन
एसडी कॉर्पोरेशन
ओमान शापूरजी कं.
नेक्स्टजेन पब्लिशिंग

अशा तर्‍हेने शापूरजी पालनजी या कंपनीची विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी घोडदौड सुरू आहे आणि कंपनी संपूर्ण जगात काही भविष्यकालीन योजना आखत आहे.

– चंद्रशेखर मराठे

The post बांधकाम क्षेत्रामध्ये चौफेर कामगिरी बजावणारी पारशी माणसाची भारतीय कंपनी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment