महिना ₹१०,००० कमावणारा पुढच्या बारा वर्षांत उभी करतो देशातील टॉप-१० पैकी एक कंपनी | वाचा विजय शेखर शर्मांचा गेल्या बारा वर्षांचा प्रवास

त्याचे वडील एका छोट्याशा गावात शाळामास्तर होते आणि आई एक ग्रुहिणी. घरात मध्यमवर्गीय वातावरण आणि वडील शाळेत शिकवत असल्यामुळे साहजिकच घरात शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. तो स्वतः एक संस्कारी मुलगा होता आणि कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय तरुणांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याच समस्या त्याच्या समोरही होत्या. कोणताही तरुण पाहतो तशी स्वप्न त्यानेसुद्धा पाहिली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अर्थातच नोकरी करावी आणि एक ठराविक रक्कम कमवावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्या तरुणाला करायचा होता स्वतःचा व्यवसाय आणि तो त्याने सुरूदेखील केला; नफा मिळाला महिन्याला फक्त १० हजार रुपये.

उत्तर प्रदेश हे जरी भारतातील सर्वात मोठं राज्य असलं, तरी तो तरुण एका छोट्याशा गावात राहत असल्यामुळे त्याच्या कमाईचा आवाकासुद्धां लहान होता. तो तरुण २७ वर्षाचा झाल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.

त्यांना वाटत होतं की आता आपल्या मुलाने लग्न करावं आणि स्थिरस्थावर आयुष्य जगावं, परंतु तो महिना फक्त १० हजार रुपये कमवतो हे ऐकल्यावर बऱ्याच स्थळांनी त्याला नकार दिला. तो तरुण मुलगा म्हणजे आजचे ४३ वर्षीय विजय शेखर शर्मा, एका यशस्वी स्टार्टअप कंपनीचे, ‘पेटीएम’चे संस्थापक.

विजय शेखर शर्मा यांना २०१० मध्ये पहिल्यांदा आपण यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास वाटू लागला; जेव्हा त्यांनी डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’ची स्थापना केली. ते एक प्रशिक्षित अभियंता होते आणि त्यावेळी एका छोट्या कंपनीद्वारे मोबाइल सामग्री विकत होते. मुळात ‘पेटीएम’ची सुरुवात मोबाईल रिचार्ज कंपनी म्हणून झाली होती.

‘पेटीएम’ वॉलेट

पेटीएम ही डिजिटल पेमेंट सिस्टिम आहे, जिचं नाव ‘पे थ्रू मोबाईल’ याचं संक्षिप्त स्वरुप आहे. ई-कॉमर्स आणि वित्तीय सेवांमध्ये कार्यरत असलेली ही भारतीय बहुराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान कंपनी नोएडा येथे स्थित आहे. २०२० मध्ये ‘पेटीएम’ची ब्रँड व्हॅल्यू ६.३ बिलियन अमेरिकन डॉलर होती, ज्यामुळे ही कंपनी भारतातील टॉप-१० सर्वात मूल्यवान ब्रॅण्डपैकी एक बनली.

‘पेटीएम’ या कंपनीची स्थापना ऑगस्ट २०१० मध्ये नोएडा, दिल्ली एनसीआर येथे विजय शेखर शर्मा यांनी १५ कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह केली होती; मूळ कंपनीचं नाव होतं ‘वन९७ कम्युनिकेशन्स’. याची सुरुवात प्रीपेड मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज प्लॅटफॉर्म म्हणून झाली आणि २०१३ मध्ये डेटा कार्ड, पोस्टपेड मोबाइल आणि लँडलाइन बिल पेमेंट या सुविधा देण्यात आल्या.

आज ‘पेटीएम’कडे विविध व्यवसाय आणि उपकंपन्या आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स गेटवे, पेटीएम पेआउट, पेटीएम मनी, पेटीएम इनसाइडर, पेटीएम विमा, पेटीएम पोस्टपेड, व्यवसायासाठी पेटीएम, पेटीएम क्रेडिट कार्ड आणि पेटीएम फर्स्ट गेम्स.

ऑक्टोबर २०११ मध्ये सफायर व्हेंचर्सने ‘वन९७ कम्युनिकेशन्स’मध्ये १५० कोटींची गुंतवणूक केली. जानेवारी २०१४ पर्यंत कंपनीने पेटीएम वाॅलेट लाँच केले, जे भारतीय रेल्वे आणि उबरने पेमेंट पर्याय म्हणून स्वीकारले होते. ऑनलाइन डील आणि बस तिकिटासह ते ई-कॉमर्समध्ये लॉन्च झाले. २०१५ मध्ये त्यात शिक्षण शुल्क, मेट्रो रिचार्ज, वीज, गॅस आणि पाण्याचे बिल उपलब्ध झाले. पेटीएमचा नोंदणीकृत यूजर बेस ऑगस्ट २०१८ मध्ये १.१८ कोटी झाला.

मार्च २०१५ मध्ये अलिबाबा ग्रुपशी संलग्न असलेल्या अँट फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुपने धोरणात्मक कराराचा भाग म्हणून पेटीएममध्ये ४०% गुंतवणूक केली. लवकरच ‘टाटा सन्स’चे एमडी रतन टाटा यांच्याकडूनदेखील कंपनीला पाठिंबा मिळाला.

ऑगस्ट २०१६ मध्ये पेटीएमने तैवानच्या ‘माउंटन कॅपिटल’कडून निधी उभारला, ज्याचे मूल्य ५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. २०१६ मध्ये कंपनीने चित्रपट, कार्यक्रम आणि मनोरंजन पार्कचे तिकीट तसेच फ्लाइट तिकीट बुकिंग लाँच केले. तसेच त्या वर्षाच्या उत्तरार्धात रेल्वे बुकिंग आणि भेटकार्डे सुरू केली.

मे २०१७ मध्ये पेटीएमला ‘साॅफ्ट बॅंके’कडून सर्वात मोठे भागभांडवल प्राप्त झाले, त्यामुळे कंपनीचे मूल्य अंदाजे १० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचले. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘बर्कशायर हॅथवे’ने पेटीएममध्ये ३५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवले.

२०१७ मध्ये १० कोटींहून अधिक डाउनलोड होणारे ते भारतातील पहिले पेमेंट ॲप बनले. त्याच वर्षी कंपनीने पेटीएम गोल्ड लाँच केले, ज्यामुळे वापरकर्ते ₹१ इतक्या कमी किंमतीचे शुद्ध सोने ऑनलाइन खरेदी करू शकत होते. नंतर पेटीएम पेमेंट्स बँक आणि ‘इनबॉक्स’, इन-चॅट पेमेंटसह मेसेजिंग प्लॅटफॉर्मदेखील सुरू केले.

२०१८ मध्ये व्यापार्‍यांना शून्य टक्के शुल्क आकारून पेटीएम, यूपीआय आणि कार्ड पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यात स्वीकारण्याची परवानगी देणे सुरू केले आणि ‘व्यवसायासाठी पेटीएम’ ॲप ‘बिझनेस विथ पेटीएम’ लाँच केले, जे व्यापार्‍यांना त्यांची देयके आणि दैनंदिन सेटलमेंटचा मागोवा घेण्याची सोय करून देते.

पुढे पेटीएमने दोन नवीन संपत्ती व्यवस्थापन उत्पादने लॉन्च केली. पेटीएम गोल्ड सेव्हिंग्ज प्लॅन आणि दीर्घकालीन बचतीसाठी गोल्ड गिफ्टिंग. जानेवारी २०१८ मध्ये मोबाइल गेमिंग प्लॅटफॉर्म लाँच करण्यासाठी ‘अलीबाबा ग्रुप’च्या मालकीची गेमिंग कंपनी ‘एजीटेक होल्डिंग्स’सह संयुक्त उपक्रमात प्रवेश केला; ज्याचे जून २०१९ मध्ये ‘पेटीएम फर्स्ट’ गेम्स म्हणून पुन्हां ब्रॅण्डिंग करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये पेटीएमने ‘पेटीएम वेल्थ अकादमी’ सुरू केली.

भारतातील कोविड-१९ महामारी दरम्यान पेटीएमने त्यांच्या ॲपद्वारे पीएम केअर फंडाला पैसे देणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्यामागे ₹१० चे योगदान दिले; दहा दिवसांत त्यांनी त्यांच्या ॲपद्वारे १०० कोटी रुपये उभे केले.

कंपनीच्या १२०० कर्मचार्‍यांनी त्यांचे १५ दिवस किंवा काही महिन्यांचे पगार या निधीसाठी दिले. कंपनीच्या प्लॅटफॉर्मद्वारे पेटीएमने गरजू लोकांसाठी २१,००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आणि रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास मदत करण्यासाठी १३ सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये ऑक्सिजन प्लांट दान केले.

– चंद्रशेखर मराठे

The post महिना ₹१०,००० कमावणारा पुढच्या बारा वर्षांत उभी करतो देशातील टॉप-१० पैकी एक कंपनी | वाचा विजय शेखर शर्मांचा गेल्या बारा वर्षांचा प्रवास appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment