संवाद कौशल्य : उद्योजकांसाठी जादुई कौशल्य

ग्राहकांबरोबर संवाद साधून आपल्या व्यवसायाची प्रगती कशी साधायची याचे प्रशिक्षण घेणे ही बाब आज स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वाची झाली आहे. कम्युनिकेशन योग्य प्रकारे न झाल्यास गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे खूप नुकसान सहन करावे लागते.

आजच्या स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट जग किंवा अगदी उच्च शिक्षण घेण्यासाठी संवादकौशल्य आवश्यक आहे. कॉर्पोरेट जगात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणजे मुलाखत आणि जर तिथे तुम्हाला संवाद साधता आला नाही तर तुमच्या निवडीची शक्यता फार कमी आहे.

ग्राहक, वरिष्ठ, ग्राहक, सहकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कामाच्या स्वरूपानुसार दुसर्‍यांशी संवाद कमी-अधिक प्रमाणात होऊ शकतो.

कम्युनिकेशन व स्नेहसंबंध टिकवण्यासाठी खालीलप्रमाणे…

हॅप्पी कॉलिंग नावाची एक संकल्पना आहे. आपल्या ग्राहकाला फोन करायचा व त्यांची विचारपूस करायची. व्यवसायाबद्दल एकही शब्द काढायचा नाही. यालाच हॅपी कॉलिंग असे म्हणतात.

हॅप्पी कॉलिंगचे एक उदाहरण पाहू :

नमस्कार

सर/मॅडम कसे आहात?

मजेत ना? मी अमुक अमुक बँकेतून बोलतोय/बोलतेय.

आपण अनेक वर्षांपासून आमच्यासोबत व्यवहार करीत आहात हे आमच्यासाठी अभिमानासप्द आहे.

सहजच तुमची चौकशी करण्यासाठी फोन केला.

स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या! भेटू लवकरच…

तुमचं संवाद कौशल्य सुधारण्यासाठी तसेच या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी काही उपयुक्त टिप्स

नेहमी प्रथम समोरच्याला बोलायची संधी द्या.
स्वतःचं ज्ञान, वर्तमान घडामोडींबद्दल माहिती वाढवण्यासाठी विविध विषयांबद्दल वाचा. यामुळे शब्दसंग्रह तर वाढतोच, पण त्याचप्रमाणे वाक्यरचना कशी करावी हे समजण्यास मदत होते.
सुरुवात घरच्यांपासून करा. तुमच्या कल्पना, विविध विषयांवरील मतं याबाबत घरच्यांसोबत चर्चा करा आणि मग हळूहळू शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग करण्यापेक्षा व्हिडीओ कॉल करा अन्यथा त्यांना समोरासमोर भेटा. समोरासमोर बोलण्यानं आपण किती सहजतेनं बोलू शकतो हे समजतंच. त्याचबरोबर समोरच्याच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेण्याची चांगली संधी मिळते.
केवळ स्वतःच्या आवडीच्या नाही तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. समजा दुसर्‍या विषयांबाबत जास्ती माहिती नसेल तर निराश होऊ नका, माहितीसंग्रह वाढवण्यासाठी उत्सुक व्हा. दुसर्‍यांकडून नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.

लोकांशी चर्चेत सामील व्हा. स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल. त्याचप्रमाणे योग्य शब्दांची निवड करून संवाद कसा साधावा हेदेखील समजण्यास मदत होईल.
तुम्ही बोलायला उत्सुक आणि तयार आहात असे तुमच्या वागण्यातून दाखवून द्या. यामुळे दुसर्‍यांना तुमच्याशी बोलणं सोपं जाईल.
बोलताना नेहेमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोला.

संभाषण सुरू ठेवण्यासाठी त्यासंबंधित प्रश्न विचारा.
सुरुवातीस संवाद साधणं हे जरी त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटलं तरीसुद्धा सहज हार मानू नका.

सध्याचे जग हे वेगवान आहे आणि लोकांच्या आठवणीदेखील अल्पकालीन आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसर्‍यांवर छाप पाडणं अपरिहार्य आहे आणि अशी छाप पाडण्यासाठी संवादासारखे प्रभावी कौशल्य कोणतं नाही. लक्षात घ्या, आपण लहान वयात बोलायला शिकतो. पण, संवाद साधणं हे एक कौशल्य असून हे कौशल्य विकसित होण्यासाठी बराच कालावधी लागतो.

ग्राहकांबरोबर वाद न करता संवाद कसा साधला जाईल, हे पाहणे गरजेचे आहे. न बोलताही आपल्या हावभाव, हातवारे, नजरा नजर, बसण्याची पद्धत यातूनही आपण काही ना काही कम्युनिकेट करत असतो. म्हणजेच न बोलताही कम्युनिकेशन होत असते.

– डॉ. संतोष कामेरकर
7303445454
(लेखक उद्योजक असून प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक आहेत.)

The post संवाद कौशल्य : उद्योजकांसाठी जादुई कौशल्य appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment