सोयाबीन काढणीपश्चात तंत्रज्ञान

शेती हा व्यवसाय सतत अनिश्चित मानला जातो. यामुळे शेतकरी सतत ज्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे, त्याच्या मागे धावत असतो. यानुसारच यंदा सोयाबीन पिकाची लागवड उत्तरोत्तर वाढत आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात, कमी कष्टात आणि हमखास बाजारभाव मिळण्याच्या शाश्वतीमुळे शेतकरी सोयाबीनकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.

शेतीमालाला किफायतशीर भाव मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे शेती तोट्यातच जाते. शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. त्यांच्या आयुष्याला स्थैर्याचा आधार मिळण्याची आशा मावळते. एखाद्या शेतीमालाला बाजारात सुदैवाने चांगला भाव मिळत असेल आणि भविष्यातही चांगल्या भावासंबंधीचा अंदाज असेल तर शेतकरी त्या शेतीमालाच्या उत्पादनाला प्राधान्य देतात.

सध्या सोयाबीन पिकाची लागवड उत्तरोत्तर वाढत आहे. मराठवाडा भागात सोयाबीनचे भरमसाठ उत्पादन होत असताना कमी कालावधीत, कमी खर्चात, कमी कष्टात आणि हमखास बाजारभाव मिळण्याची शाश्वती यामुळे आता इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीन लागवडीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे. सध्याच्या खरीप हंगामात उच्चांकी स्वरूपात म्हणजे मागील वर्षीच्या दुप्पट क्षेत्रापर्यंत सोयाबीनची लागवड झाली आहे.

महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून मानले जाणारे सोयाबीन हे कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते.

सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असते. एकूण प्रथिनांपैकी ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून तयार होतात. सोयाबीन पीक घेतल्यानंतर राहिलेला उर्वरित भाग पशुपक्ष्यांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोगात आणला जातो. सोयाबीनपासून बिस्कीट, सोयामिल्क, सोयावडीसारखे अनेक उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनचा पालापाचोळा शेतात जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.

काढणी (कापणी) : सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्क झाल्यापासून पिकाची कापणी करेपर्यंतची हवामानाची स्थिती ही उत्पादित होणार्‍या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्चाची असते. पिकाच्या या अवस्थेत शेंगा पक्‍व होत असताना बियांतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असते. या काळात सतत व दीर्घकाळ पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो.

अशा पावसात पीक भिजून पुन्ह्या वाळते; त्यामुळे बियाण्याच्या उगवणीवर विपरीत परिणाम होती. जर पक्‍व अवस्थेत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी. मात्र, अशा वेळी कापलेले पीक वाळविण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक आहे. यामुळे बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते; शिवाय शेंगा फुटून उत्पादनात घटदेखील येत नाही.

पीक तयार होण्याच्या दहा दिवस अगोदर हेक्टरी चार किलोग्रॅम डायथेन-एम-४५ या बुरशीनाशकांची ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन उगवणशक्ती सुधारते. पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे. ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पेंशाची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बायन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते. कापणी करताना पाते जमिनीच्यावर ८ ते १० सेंमी राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी. ब्रश कटरचा वापर करूनदेखील सोयाबीनची कापणी करता येतें व कापणी केलेले सोयाबीन एक किंवा दोन मजुरांद्वारे गोळा केले जाते. या कापणी पद्धतीमुळे वेळ व मजूर यांची बचत होते.

मळणी : मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी.

बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी. मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.

सोयाबीनची प्रतवारी करणे : महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच शेतकरी सोयाबीन काढणी केल्यानंतर आहे असे सोयाबीन व्यापार्‍यांना विक्री करतात. तर असं न करता आपण सोयाबीनची प्रतवारी करणे गरजेचे आहे. तसेच सोयाबीन क्लीनर कम ग्रेडर या मशीनचा वापर करून सोयाबीन मधील काडीकचरा, माती, खडे बाजूला काढणे गरजेचे आहे. तसेच मळणी करत असताना काही सोयाबीनचे तुकडे झाले असतील हेदेखील बाजूला काढणे गरजेचे आहे.

स्वच्छ केलेल्या सोयाबीनची प्रतवारी करणे गरजेचे आहे. प्रतवारी करण्यासाठी आपण सोयाबीन सेपरेटर किंवा सोयाबीन ग्रेडर कम क्लीनर या मशिनचा वापर करणे आवश्यक आहे. अशा मशीनचा वापर करून शेतकर्‍यांनी सोयाबीनची प्रतवारी केली आणि सोयाबीन स्वच्छ करून त्याची साठवण करून ठेवलं तर निश्चितपणे या सोयाबीनचा दर हा इतर सोयाबीन पेक्षा चांगला मिळू शकतो.

सोयाबीन क्लीनर कम ग्रेडर मशीन मधून किंवा सोयाबीन सेपरेटर या मशीनमधून सोयाबीनमधील काडीकचरा, माती, दगड आणि फुटलेले सोयाबीन हे बाजूला काढले जाते तसेच प्रतवारी केली जाते आणि अशा सोयाबीनला दर चांगला मिळू शकतो. सोयाबीन आहे अशी बाजारात विक्रीसाठी नेले तर व्यापारी या सोयाबीनला दर कमी देतात आणि प्रतवारी केलेल्या सोयाबीनला निश्चित दर जास्त मिळतो.

हाताळणी व साठवणूक : ताडपत्रीवर एकसारखे पसरवून बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्के काड्या, कचरा, माती, खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी ४ मि.मी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा. बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

स्वच्छ केलेले बियाणे कोरड़या जागेत स्वच्छ, कोडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवण करायच्या बियाण्याची आद्रता ८-१० टक्के असावी. बियाण्यातील आर्द्रता 6 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे.

सोयाबीनचे बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते, त्यामुळे साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी व उन्हाळ्यात बियाणे साठवण केलेल्या खोलीतील तापमान ४२अंश से पेक्षा जास्त असू नये. बियाणे १ किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना ४ पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोंच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास ८ पोत्यांपेक्षा जास्त थप्पी लावू नये.

अन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. पोत्यांची रचना उभी-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणक्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.

आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये उंदरांचा उपद्रव होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण : सोयाबीन साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोडाउनमध्येदेखील शासनाने सोय करून ठेवलेली आहे. ज्यांच्याकडे सोयाबीन उत्पादन जास्त होणार आहे आणि त्यांना साठवण्यासाठी जागा कमी आहे. अशा शेतकर्‍यांनी महाराष्ट्र शासनाचे वखार महामंडळाची गोडाऊन यामध्ये आपण साठवण करावी.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण केल्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या तारणावर कर्ज मिळू शकते. सोयाबीनची प्रतवारी करणे तसेच सोयाबीनची साठवून ठेवणं हे सर्व काळजीही वखार महामंडळाचे असते. त्या दृष्टीने आपण इथून पुढच्या काळामध्ये सोयाबीन साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनचा वापर करणे आवश्यक आहे.

बहुतांश करून व्यापारी या वखार महामंडळाच्या जास्त वापर करतात. परंतु शेतकरी कमी प्रमाणात वापर करत आहेत. शेतकर्‍यांमध्ये याची जनजागृती होणे आवश्यक आहे, महाराष्ट्र शासनामार्फत वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनमध्ये आपण धान्य साठवून ठेवू शकतो. जेव्हा सोयाबीनचा दर चांगला असेल त्यावेळेस आपण सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून घेऊन बाजारात विक्री केल तरी आपल्याला फायदा होऊ शकतो.

ज्या वेळेस दर बाजारात नसतो त्या वेळेस आपण त्याची साठवण करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना पैशाची जास्त आवश्यकता असेल त्या शेतकर्‍यांनी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनमधून सोयाबीन तारण पावती मिळते आणि सोयाबीन तारण पावती आपण बँकेत जमा केल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देते आणि सदर कर्जाचा वापर आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करावा. ज्या वेळेस बाजारामध्ये सोयाबीनला दर जास्त येईल त्यावेळेस आपण सोयाबीनची विक्री करावी.

सोयाबीन मूल्यवर्धन : सोयाबीनच्या मूल्यवर्धनमध्ये आपण लक्ष देणे गरजेचे आहे. बरेच शेतकरी सोयाबीन काढल्यानंतर त्याची विक्री करून टाकतात आणि त्याचे मूल्यवर्धन करत नाही. असे न करता आपण सोयाबीनचे मूल्यवर्धन करून सोयाबीनपासून तेल काढणे, सोयाबीनपासून सोया पनीर काढणे, सोयाबीन पासून दूध तयार करणे, सोयाबीन पासून सोयीने, तयार करणे, सोयाबीन पासून इतरही मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येऊ शकतात.

आपण सोयाबीनपासून पशुखाद्य तयार करू शकतो. या सर्व गोष्टीचा आपण विचार करणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनी सोयाबीनची लागवड केल्यानंतर मूल्यवर्धनकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. सोयाबीनचे मूल्यवर्धन करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या भांडवलासाठी आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत प्रकल्प दाखल करून चांगल्या पद्धतीने आपण सोयाबीन उद्योग चालू करू शकतो.

सोयाबीनचे मूल्यवर्धन गाव पातळीवर होणे आवश्यक आहे आणि जेव्हा आपण सोयाबीनचे मूल्यवर्धन गावपातळीवर करू त्यावेळेस निश्चितपणे सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणखीन वाढ होणार आहे. ग्रामीण युवकांनी सोयाबीन मूल्यवर्धन साठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सोयाबीनचे मूल्यवर्धन काळाची गरज बनणार आहे.

– डॉ. दादासाहेब खोगरे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,
तडसर ता. कडेगाव जि. सांगली
मोबाईल नंबर: 9370006598

The post सोयाबीन काढणीपश्चात तंत्रज्ञान appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment