असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे.

ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.

योजनेचे लाभ :

● असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

● शासन असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.

● शासनाला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबवण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.

● कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल. तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.

असंघटित कामगार म्हणजे कोण?

लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर, पशुपालन करणारे, सेल्समन, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, किराणा / बेकरी / पानपट्टी / इत्यादी सर्व दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते,फळविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षाचालक, घरकाम करणारे कामगार, आशा वर्कर, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खाजगी क्लासेस संचालक, विडी कामगार यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांची शासनाकडे नोंद नाही.

त्यामुळे आपत्ती आली असता किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही, म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर) देणार आहे. ई-श्रम (E-SHRAM) कार्ड (आधारकार्डसारखे कार्ड) देणार आहे. ज्यामुळे या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.

ई-श्रम नोंदणीसाठी निकष :

● संबंधित व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.

● ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी.

● ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी.

● वर नमूद कामगार क्षेत्रात काम करणारी असावी.

ई- श्रम नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :

● आधार कार्ड ● मोबाइल नंबर ● बँक पासबुक ● शैक्षणिक माहिती

The post असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे appeared first on स्मार्ट उद्योजक.