आंब्याचा व्यवसाय

कोकणचा राजा आपल्याला फक्त उन्हाळ्यातले दोन-तीन महिनेच खायला मिळतो. गरीब असो, श्रीमंत असो की मध्यमवर्गीय प्रत्येक घराच्या वार्षिक बजेटमध्ये या दोन महिन्यांमध्ये आंबा खरेदीची तरतूद करून ठेवलेली असते.

हापूस, पायरी, केशर, दशहरी असे हजारो प्रकारचे आंबे आपल्या देशात पिकतात आणि विकलेही जातात. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात.

फक्त दोन महिन्यांसाठी असला तरी वर्षभराचा फायदा करून देणारा हा धंदा आहे. तुम्ही हा कितीही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात करू शकता. अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकता. गरज आहे ती फक्त फळ म्हणून आंब्याच्या जपणुकीविषयी थोडी माहिती मिळवण्याची.

तुम्ही दोन प्रकारे आंब्याची घाऊक खरेदी करू शकता. एक म्हणजे थेट शेतकऱ्याकडून किंवा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मंडीमधून.

हापूस आंबा हा सगळ्यात जास्त विकला जातो आणि या आंब्याला भावही खूप चांगला मिळतो. कोकण किंवा आसपासच्या परिसरात तुमच्या ओळखीची लोकं असतील तर तुम्ही आंबा शेतकरी म्हणजे ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांच्याकडून थेट खरेदी करू शकता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे बागायतदार आणि शेतकरी आंबे विक्रीसाठी घेऊन येतात. पण इथे व्यापार करणं वाटत तितकं सोपं नाही. तुम्ही धंद्यात थोडे मुरलेले असाल तरच मंडीतून थेट खरेदी करू शकाल.

कोकणातल्या हापूसच्या खालोखाल पायरी, कर्नाटक हापूस, वलसाड हापूस आणि केशर या आंब्यांनाही चांगली मागणी असते.

घरच्या घरी दोन-दोन डझनचे बॉक्स किंवा पाच डझनची लाकडी पेटी तयार करून लोकांना घरपोच डिलिव्हरी देऊ शकता. व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आंब्याचे आकर्षक फोटो टाकून ओळखीतल्या लोकांना तुमच्याकडून आंबे घेण्यासाठी आकृष्ट करू शकता.

दर वर्षी हा धंदा करा. फक्त दोन ते तीन महिन्यात लाखोंची कमाई होईल. त्यांनतर महिनाभर आराम केला की मग श्रावणासोबत माळेने गणपती, नवरात्र, दिवाळी असे सगळे सण येतातच आहेत. एकेका सिझनला एक धंदा केला तर वर्षाकाठी बारा ते पंधरा लाख रुपये सहज कमवू शकाल.

– शैलेश राजपूत

The post आंब्याचा व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.