खादी उत्पादक संस्थांनी कापडाचे डिझाईन्स नवीन विपणन धोरण आणि तंत्रांचा वापर करून निर्माण केल्यास या संस्था खादी उत्पादने तसेच कपडे यांच्या विक्रीत मोठी वाढ करू शकतात, असे मनोगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे विपणन तज्ज्ञ सदस्य मनोज कुमार गोयल यांनी व्यक्त केले.
विदर्भातील खादी आणि ग्रामोद्योग युनिटशी संबंधित कारागीर, विणकर आणि कामगार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता तसेच खादी युनिट्सद्वारे उत्पादनातील वाढ पाहण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी गोयल २९ ते ३० मार्च दरम्यान विदर्भ दौऱ्यावर होते. आपल्या दोन दिवसीय दौ-यादरम्यान त्यांनी प्रारंभी ‘नागविदर्भ चरखा संघा’द्वारे संचालित सीताबर्डी नागपूर येथे चालणाऱ्या खादी विक्री दुकानाला भेट दिली.
या दरम्यान गोयल यांनी या संस्थेच्या इमारतीच्या सुसज्जतेची प्रशंसा करून उपलब्ध कपडे व वस्तूंच्या विविधतेची आणि देखभालीचे निरिक्षण करून विक्री वाढवण्यासाठी नवीन विपणन तंत्रांचा वापर करण्यास सुचवले. त्यानंतर सेवाग्राम वर्धा येथील बापूकुटी येथे जाऊन बापू महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित इतिहासाची माहिती त्यांनी घेतली तसेच वर्धा येथील ग्राम सेवा मंडळ गोपुरी येथे जाऊन खादीच्या कामांचे निरीक्षण केले.
संस्थेने तयार केलेल्या खादी जॅकेटचा नवी दिल्ली येथील खादी भवन येथे पुरवठा केल्यास त्याचा मुबलक लाभ घेता येईल असे गोयल यांनी यावेळी सुचवले तसेच संस्थेने मांडलेल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यानंतर वर्धा येथील खादी संस्था मगन संग्रहालय समितीला भेट देण्यात आली, जिथे संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या चरख्यावर तसेच हातमागावर काम करणाऱ्या कारागिरांना व विणकरांना प्रोत्साहन देण्यात आले.
त्यानंतर चंद्रपूरच्या भद्रावती येथे कार्यरत असलेल्या कुंभार उद्योग प्रशिक्षण केंद्रासही त्यांनी भेट दिली. नागविदर्भ चरखा संघ, मुल चंद्रपूरच्या सावली गावात चालणाऱ्या खादी उत्पादन केंद्राची पाहणी करण्यात आली. यावेळी ‘खादी पंचायत’देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये खादी उत्पादक संस्थामधील विणकर महिला तसेच कारागीर मोठया संख्येने उपस्थित होते, त्यांच्यांशी मनोज कुमार गोयल यांनी संवाद साधला.
The post खादी उत्पादकांनी नवीन मार्केटिंग धोरण लक्षात घेऊन कापडाचे डिझाईन्स तयार केल्यास विक्रीमध्ये लक्षणीय वाढ : मनोज कुमार गोयल appeared first on स्मार्ट उद्योजक.