कलेची आवड असणं, त्याचा ध्यास घेणं आणि शिक्षण घेता घेता कलेच्याच माध्यमातून आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणे, हे सगळे जमवून आणलंय नाशिकच्या एका तरुण उद्योजकाने! एका वर्षात हजाराहून अधिक डिजीटल पोर्ट्रेट प्रत्यक्षात चितारून एक विश्वविक्रम करणार्या आणि सध्या सोशल मीडियावर तरुण डिजिटल पोर्ट्रेट कलाकार म्हणून प्रचंड गाजत असलेल्या प्रणवची ही गोष्ट…
हल्ली सोशल मीडियावर जवळपास सगळ्याच मराठी आणि हिंदी कलाकारांचे डिजिटल पोर्ट्रेट झळकू लागले आहेत. ही सुंदर पोर्ट्रेट्स केवळ सेलिबीटींचीच नव्हे तर आपल्यासारख्या सामान्यांनाही अगदी माफक दरात तयार करून देणारा हा नाशिकचा तरुण कलाकार प्रणव सातभाई.
फोटोग्राफीचा छंद, प्रचंड हुशारी, तितकीच सृजनशीलता असलेल्या प्रणवने डॉक्टर व्हावे आणि फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणूनच पाहावे ही खरंतर घरच्यांची इच्छा होती, पण प्रणवला मात्र कलेचेच क्षेत्र खुणावत होते. म्हणतात ना, क्रिएटीव्हीटी आतूनच असावी लागते. त्याने घरच्यांना तयार करून तीन वर्षाच्या डिजिटल फोटोग्राफीच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबत व्यावसायिक पातळीवर फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवातही केली.
अशातच अचानक लॉकडाऊनचा फटका जसा इतर व्यवसायांना बसला तसाच फोटोग्राफी व्यवसायालाही बसला. प्रणवच्या आतला कलाकार त्याला काही केल्या स्वस्थ बसू देईनात. अशातच त्याला डिजिटल पोर्ट्रेटविषयी माहिती मिळाली. सुरुवातीला जवळपास १०० पोर्ट्रेट्स चुकली असतील.
एकदा त्याने सहज म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांचे पोर्ट्रेट तयार केले आणि त्यांना सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनाही ते आवडले आणि त्यांनी ते शेअर केले. ही त्याला त्याच्या कामाची मिळालेली पहिली पावती होती.
यानंतर त्याने नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटींचे पोर्टेट्स साकारले. यातील अनेकांनी त्याच्याशी प्रत्यक्षा संपर्क साधून त्याच्या कामाचे कौतुक केले. तसेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत प्रणवकडून पोर्ट्रेट साकार करून घेण्यासाठी आवाहन केले यामुळे प्रणवच्या या कलेसाठी नवीन संधी निर्माण झाली.
कोरोना काळात प्रत्येक जण आपल्या व्यवसायाविषयी चिंतेत असताना प्रणवने नवे कौशल्य आत्मसात करून डिजिटल पोर्ट्रेट विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. हे सगळे करत असताना फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर यांचा प्रभावी वापर करण्यास शिकला. तसेच सोशल मीडियावर चांगली पकड मजबूत केली.
एखादे आलेले काम प्रणव ग्राहकाला वेळेत पूर्ण करून त्याची सुयोग्य फ्रेम तयार करून गिफ्ट करण्यासाठी उपलब्ध करून देतो. तसेच त्याच्या कामाला पुन्हा सोशल मीडियावरून पसंती मिळते ही एक जमेची बाजू.
आज कोरोनानंतरच्या काळात एक प्रस्थापित फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेच. मॉडेलिंग असो वा समारंभांचे फोटो प्रणव तो क्षण हमखास अगदी अचूकपणे टिपतो आणि व्यावसायिकदृष्ट्या स्थिरावला फोटोग्राफीच्या क्षेत्रात आहे, तसेच डिजीटल पोर्ट्रेट म्हणले की सहजच प्रणव सातभाई हे नाव डोळ्यासमोर येते असे अढळ स्थान त्याने या नवीन क्षेत्रात निर्माण केले आहे.
– स्वरदा कुलकर्णी
संपर्क : प्रणव सातभाई – ७७४४८८३५२९
The post थांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे जगणारेच यशस्वी होतात; प्रणव सातभाई हे याचेच एक उदाहरण appeared first on स्मार्ट उद्योजक.