गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येक उभी राहणारी अर्थव्यवस्था एक नवीन गरज निर्माण करते. या गरजांमध्ये संधी दडलेली असते आणि ही गरज शोधून भागवता आली तर एक नवीन उद्योग निर्माण होऊ शकतो. याची उदाहरण आपण पहिल्या दोन्ही भागांत पाहिली.
आजच्या भागात आपण अर्थव्यवस्था गरज कशी निर्माण करते आणि ती भागवल्यावर कसा एखादा उद्योग उभा राहू शकतो याची काही उदाहरणे पाहू. उभी राहणारी अर्थव्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी गरज आणि संधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अर्थव्यवस्थेतून गरज निर्माण होते आणि गरजेतून नवीन संधी.
मुंबई शहर एक चालतीबोलती किंबहुना धावती अर्थव्यवस्था आहे. इथे सर्व भाषिक कुटुंब आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाच्या अनेक गरजा आहेत आणि त्या गरजा म्हणजेच संधी आहेत. अगदी साधे उदाहरण पाहूया.
मुंबईमध्ये नवरा-बायको दोघांनीही पैसा कमावणे ही तिकडच्या जीवनव्यवस्थेची गरज आहे. आता या कुटुंबाच्या अनेक छोट्या-छोट्या गरजा आहेत. सकाळी लवकर उठून कामाला निघायचं, त्याआधी जेवणाची तयारी करायची, या गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सकाळी उशीर झाल्यास नाश्ता पार्सल मिळतेच, शिवाय दुपारी पोळीभाजीसुद्धा पार्सल मिळते.
ज्यांना तयार भाजी विकत घ्यायची नसेल तर हल्ली बाजारात निवडून, कापून किंवा चिरून ठेवलेल्या भाज्या चांगल्या पॅकेटमध्ये मिळतात. त्यामुळे सकाळी भाजी करण्यातला बराचसा वेळ वाचू शकतो आणि बाहेरून घेवून खाण्यापेक्षा घरचे अन्न खाल्ल्यामुळे आरोग्याची काळजीसुद्धा घेतली जाते.
रोजच्या रोज अशा भाज्या विकत आणून निवडणे आणि व्यवस्थित कापून त्या चांगल्या पाकिटात बांधून विक्रीला उपलब्ध करून देणे ही एक नवीन संधी कोणीतरी शोधली आणि आता तो एक व्यवसाय झालेला आहे.
लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय बंद झाला असेल, परंतु हा व्यवसाय परत सुरू होणार यात शंकाच नाही. पण लॉकडाऊनमध्ये अजून एक वेगळीच गरज निर्माण झाली घरात असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवून बघणे आणि त्यातूनच आपल्याला येणारे चांगले पदार्थ तयार करून त्याचा युट्युब व्हिडीओ बनवणे आणि लोकांपर्यंत पोचवणे ही एक नवीनच संधी निर्माण झाली आणि समस्त खाद्यप्रेमी वर्गाने याचा पुरेपूर फायदा घेतला. प्रत्येक घरात लॉकडाऊनमध्ये असे बरेच खाद्यप्रयोग झाले.
हा झाला रोजचा व्यवहार. आता श्रावण झाला, गणपती झाले, दसरा दिवाळी येऊ घातलेले आहेत. सणासुदीला गोड-धोड (विशेषत: नैवेद्य) करणं ही आपली संस्कृती आहे. मात्र रोजच्या कामाच्या गडबडीत आणि सुट्ट्या नसल्यामुळे या सर्वांची तयारी करून हे पदार्थ करणे फार कठीण काम. यातला एक उद्योग उभा राहताना मी अनुभवलेला आहे.
साधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या आत्याने ही संधी ओळखली आणि पंचवीस पुरणपोळ्या बनवून आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. २५ पुरणपोळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता सणासुदीच्या काळात साधारण ३० हजार पुरणपोळ्या, साधारण तेवढ्याच गुळपोळ्या इथपर्यंत येऊन पोचला आहे. शिवाय वर्षभर अनेक प्रकारचे लाडू, चकली, विविध प्रकारची शेव, पोहे, कुरमुरे यांचा चिवडा या सर्व पदार्थांपर्यंत येऊन पोहोचला आहे. तिने वसईला स्वत:ची फॅक्टरी उभी केली. आत्या आता नसली तरीसुद्धा तिची दोन्ही मुले हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. हल्लीच त्यांनी याचा अॅपसुद्धा बाजारात आणला आहे.
आज अनेक गृहिणी हा व्यवसाय विशेषत: दिवाळीमध्ये करत आहेत आणि आणि त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउनमध्ये मी पाहिलेलं आणखी एक उदाहरण म्हणजे करोना पेशंटना घरी डबे पोचवणे. अनेकांनी ही सेवा पुरवल्यामुळे त्यांनाही या काळात रोजगार उपलब्ध झाला आणि त्यांचे उत्पन्न सुरू राहीले.
एखादी गरज भागवणे ही कोणासाठी तरी एक संधी असतेच. ती संधी आपण किती लवकर शोधतो आणि त्यातून छोट्या प्रमाणावर का होईना पण उद्योग सुरू करतो हे महत्त्वाचे आहे. कदाचित हेच उद्योजक म्हणून पहिलं पाउल ठरू शकतं.
अशी अनेक उदाहरणं नक्कीच देता येतील. यातलं मोठ आणि सर्वांना ज्ञात असलेलं उदाहरण म्हणजे एप्रिल-मे महिन्याच्या आसपास होणारा आंब्यांचा व्यवसाय. त्यामध्ये असलेले संपर्क वापरले जातातच, त्याशिवाय नवीन संपर्कसुद्धा प्रस्थापित होतात. याचा वापर पुढे जाऊन केला तर उद्योग मोठा होऊ शकतो. त्याविषयी बोलूया पुढच्या भागात.
– सीए तेजस पाध्ये
(लेखक मुंबईस्थित सनदी लेखापाल आहेत.)
संपर्क : 9820200964
The post लोकांची गरज ओळखा, त्यातून उभा राहील तुमचा यशस्वी व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.