व्यवसाय कोणताही असो, त्यात यश मिळवण्यासाठी अंगी आत्मविश्वास असावा लागतो. त्याचसोबत विक्रीकौशल्य हे सगळ्याच व्यवसायांची आद्य गरज आहे. ज्याच्या अंगात ते कसब आहे, तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वीच होतो. उल्हासनगर येथील एक तरुण उद्योजिका वृषाली राजेंद्र महाजन हिच्याबाबतीतही ही गोष्ट तंतोतंत लागू होते.
आपल्यातील आत्मविश्वास आणि विक्रीकौशल्य या गुणांची तिला जाणीव होती त्यातून तिने हेअर ऑइल आणि ब्युटी प्रॉडक्टस या व्यवसायात प्रवेश केला आणि आज यशस्वी घोडदौड करते आहे.
लहानपणापासूनच वृषालीच्या अंगी वाकपटुत्व, हुशारी, चुणचुणीतपणा होता. तिच्या कुटुंबाला कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे कुटुंबियांचे मत वृषालीने डी.एड.सारखा कोर्स करून शिक्षिका व्हावे असे होते. परंतु तिने स्वत:च्या गुणांच्या आणि क्षमतेच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला होता.
वृषाली राजेंद्र महाजन
दरम्यान तिला तिच्या एका केरळीय मैत्रिणीकडून एका उत्तम हेअर ऑइलबद्दल कळले. घरगुती पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक हेअर ऑइलने कोणाला केसगळती असेल तर ती पूर्णपणे थांबायचीच, शिवाय त्यांचे केस जोमाने वाढू लागायचे. काही महिलांनी तिच्याकडे त्या तेलाची मागणी केली. वृषालीने ती मागणी पूर्ण केली.
त्या महिलांना झालेला लाभ बघून त्यांच्या नातेवाईक, मैत्रिणी अशा अनेकांनी त्या तेलासाठी आर्डर नोंदवली. यातूनच वृषालीला आपल्या व्यवसायाची दिशा मिळाली. नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती यातून वृषालीने प्रयत्नपूर्वक आपला व्यवसाय वाढवला. त्यासाठी आवश्यक तो आयुर्वेदिक ग्रंथांचा अभ्यास केला.
प्रत्येक घटकद्रव्याचे प्रमाण निश्चित केले. अनेक प्रयोग केले. त्या हेअर ऑइलमध्ये वेगवेगळे घटक कमी-अधिक वापरून त्याचे परिणाम काय होतात त्यांच्या नोंदी घेतल्या. शेवटी एक आदर्श फार्म्युला विकसित केला. वृषालीने यासाठी नॅचरोथेरपीचा पूरक कोर्सही केला.
आपल्या व्यवसायवाढीसाठी वेबसाईट, WhatsApp, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडियाचा वापर केला. सर्व तऱ्हेच्या डिजिटल मार्केटिंगवर भर दिला. अमेझोन, फ्लिपकार्ट, वगैरे विक्री प्लॅटफार्मसवर आपली उत्पादने उपलब्ध केली. आज त्यांचा बहुतांशी व्यवसाय आनलाईनच चालतो. त्याचबरोबर वृषालीने निरनिराळी इतर उत्पादने विकसित केली.
ग्राहकांच्या गरजांनुसार मुरूमांवरील तसेच चेहरा काळा पडू नये म्हणून लागणारे फेसपॅक, अकाली केस पांढरे होणे, केसगळती, केसातील कोंडा रोखण्यासाठीची वेगवेगळी आईल्स, शॅम्पू, बाळंतपण, केमोथेरपी यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठीची औषधे बनवली.
वृषालीकडे सध्या हेअर ऑइलचे पाच प्रकार उपलब्ध आहेत. वृषालीची सर्व उत्पादने सेंद्रिय म्हणजेच ऑरगॅनिक आहेत. त्यातील घटक नैसर्गिक असतात. कोणतेही सौंदर्यप्रसाधन बाजारात आणण्यापूर्वी त्यांना एक वर्षभर संशोधन-प्रयोग करावे लागतात. त्यांची सर्व उत्पादने ‘लतिका’ या नावाने आहेत.
अगदी अलिकडे वृषाली महाजन यांनी उल्हासनगर, कॅम्प नं ४ येथे एक गाळा घेतला आहे. तसेच काही महिला कर्मचारी कामाला ठेवून आपल्या व्यवसायाला अधिक स्थिर नियोजनबद्ध स्वरूप दिले आहे.
वृषालीच्या यशाचे खरे भागीदार हे तिचे ग्राहकच आहेत. ‘लतिका’ हेअर ऑइल आणि इतर प्रॉडक्ट्स वापरून त्यांना जे लाभ होतात त्यातून तेच इतरांना ही प्रॉडक्ट्स refer करतात. अशाप्रकारे ‘लतिका’ हेअर ऑइलला आता एक मोठी मौखिक प्रसिद्धी मिळाली आहे. दिल्ली, आसाम, छत्तिसगडसहित देशभरात वृषालीची प्रॉडक्ट्स पोहोचली आहेत आणि भविष्यात तिला परदेशातही आपली प्रॉडक्ट्स पोहोचवायची आहेत.
वृषाली म्हणते, स्त्रीकडे सृजनाची शक्ती आहे. तिने स्वत:लाच नव्या रूपात अवतरलं पाहिजे. जणू कात टाकली पाहिजे. ती नवीन गोष्टींची निर्मिती करू शकते. घराचे व्यवस्थापन करण्याचे अंगभूत कौशल्य स्त्रीवर्गाकडे असतेच. कोणत्याही स्त्रीने आर्थिक पायावर सक्षम झाल्याशिवाय लग्न वगैरे गोष्टींचा विचार करू नये.
आयुष्यात काही वेळा बिकट प्रसंग येतात. तेव्हा डगमगून जाऊ नये. स्वत:वर विश्वास ठेवावा. विक्रीकौशल्य, ग्राहकांशी संवाद साधण्याची कला हाच सगळ्या प्रकारच्या व्यवसायांचा पाया आहे. जर तुमच्याकडे आपले उत्पादन दुसऱ्याला विकण्याची कला, कसब असेल तर कुठल्याही व्यवसायात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
संपर्क : वृषाली महाजन – 8999331655
संकेतस्थळ : www.latikacare.com
The post आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणारी वृषाली महाजन appeared first on स्मार्ट उद्योजक.