Ridhi Karan & Associates

आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा धोका घेवून तर बघा!

प्रत्येकजण व्यवसाय करायला लागला तर त्याकडे नोकरी कोण करणार? असे जर आपले विचार असतील तर मग आपण नोकरीच करावी. उद्योग करायचा म्हणजे ध्येय लागते, हिंमत लागते, वाट पाहायची तयारी ठेवावी लागते, प्रत्येक कामासाठी तयार राहावे लागते, काळ-वेळ विसरून काम करावे लागते.

मराठी कुटुंबातील आहात? तर तुम्हाला सर्वात आधी कुटुंबाचा विरोध सहन करावा लागेल. समाजाचे टोमणे ऐकावे लागतील. प्रसंगी नाती दुरावतील. कोणी साहाय्य करणार नाही. एकट्याने सर्व करावे लागेल.

इतके करूनही अपयश आले तर, पुन्हा राखेतून उभे राहून योद्ध्याप्रमाणे झुंझावे लागेल, स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू पाहुयात.

यश हे काही सहज मिळत नाही अन जे सहज मिळते ते फार काळ टिकतही नाही! पण इतके सर्व कष्ट घेवून जर यशस्वी झालात तर तेच कुटुंब, तोच समाज, तुमचा उदो उदो ही करायला लागतो.

आयुष्याची चार-पाच वर्षे तुम्हाला झोकून द्यावी लागतात. सातत्यपूर्ण प्रयत्न करून, रोज शिकून, हार पत्करून, सुधारणा करून, नावीन्य, नम्रता, बोलणे, चालणे, वागणे, बदलणे सर्व काही. नियोजन, अभ्यास, मार्केटिंग, व्यवहार, हिशोब, माणसांची निवड, त्यांच्याकडून कामं करून घेणे, प्रसंगी कर्ज घेणे, ते फेडणे, तोटा सहन करणे, नफ्याची हवा डोक्यात न जाऊ देणे असे कित्येक काही. यालाच तर व्यवसाय म्हणतात. हीच तर उद्योजकता असते. आधुनिक काळातील खरे योद्धे हेच तर असतात.

जिंकलात तर, त्या कर्तृत्वाला दुनिया सलाम ठोकते. जे तुमच्या पुढच्या पिढीलाही उत्पन्नाचे साधन देईल. कित्येकांना रोजगार देईल. हारलात तर त्यातून नवे काही शिकायला मिळेल, पण हे क्षण जगून पाहा. यात मजा आहे. जे तुमचे स्वत:चे आहे. यात काही तरी करतो आहोत हा फील आहे. जे तुम्हाला नोकरीत लाखोंचे पॅकेज घेवूनही कधीच मिळत नाही.

जन्माला येताना रिकाम्या हाती आलोय आणि जाणारही रिकाम्या हातीच, परंतु इथे काही तरी केल्याचं समाधान मिळणं गरजेचे नाही का?

– तुषार कथोरे
7021631848

The post आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा धोका घेवून तर बघा! appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment