ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार घराघरात पोहोचवणाऱ्या ‘फोनपे’ची कथा

वर्ष होतं २०१५ आणि महिना होता अखेरचा; डिसेंबर. नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतलेल्या भारतीय जनतेला माहीत नव्हतं की येणारं वर्ष पैशाची देवाणघेवाण सोपं करणार होतं. त्या काळात जर कुणी लोकांना सांगितलं असतं की पैसे घ्यायला किंवा द्यायला तुम्हाला बँकेत जाण्याची गरज लागणार नाही, तर कुणीच त्यावर विश्वास ठेवला नसता.

मुळात लोकांना बँकेत जाण्याचा येतो कंटाळा आणि आजदेखील त्यात विशेष असा फरक पडलेला नाही. इंटरनेटचा वापर तेव्हा चांगलाच वाढला होता, पण पैसे ही गोष्ट अशी आहे, की लोक आजही खूपच काळजीपूर्वक विचार करून त्याचे व्यवहार करतात. त्यात प्रत्यक्ष बँकेत न जाता पैशाचे व्यवहार करायचे म्हणजे एक प्रकारचा धोका, असा सर्वसाधारण समज होता.

त्यामुळे पैसे ऑनलाईन पाठवण्यासाठी बरेच लोक तयार नसत. पण हळूहळू लोकांच्या विचारात फरक पडायला सुरुवात झाली आणि ऑनलाईन पेमेंट सिस्टिमने भारतात मूळ धरलं. ‘फोनपे’ या स्टार्टअपची स्थापना २०१५ च्या डिसेंबर महिन्यात झाली. ही एक भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे ज्याचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे.

समीर निगम

‘फोनपे’ची स्थापना समीर निगम, राहुल चारी आणि बुर्झिन इंजिनियर यांनी केली. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर (युपीआय) आधारित ‘फोनपे’ ऑगस्ट २०१६ मध्ये लाइव्ह झाले. सध्या ‘फोनपे’ची मालकी फ्लिपकार्टकडे आहे, जी वॉलमार्टची उपकंपनी आहे.

‘फोनपे’ अकरा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यावर ग्राहक मोबाइल रिचार्ज करू शकतात, डीटीएच, डेटा कार्ड्स, युटिलिटी पेमेंट करू शकतात, दुकानात किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतात, टॅक्स सेव्हिंग फंड्स, लिक्‍विड फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतात, विमा, म्युच्युअल फंड, सोने आणि चांदी खरेदी करू शकतात. याशिवाय त्यांच्या स्विच प्लॅटफॉर्मद्वारे ओला राइड्स आणि रेडबस तिकिटांचे बुकिंग, आणि फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक करता येतात.

‘फोनपे’ हा भारतातील १५ हजार ७०० शहरे आणि गावामधील २.५ कोटी ऑफलाइन आणि ऑनलाइन व्यापारी आउटलेटवर पेमेंट पर्याय म्हणून स्वीकारला जातो. ‘फोनपे’चे सध्या १५ कोटींहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते असलेले ३५ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

लॉन्च झाल्यानंतर तीनच महिन्यांत हे १ कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केले. २०१८ मध्ये ‘फोनपे’ हे गुगल प्ले स्टोअरवर सर्वात जलद ५ कोटींचा बॅज मिळवणारे भारतीय पेमेंट अ‍ॅप बनले.

‘फोनपे’ कंपनीने जानेवारी २०१८ मध्ये ‘फ्रीचार्ज’सोबत भागीदारी केली. या भागीदारीमुळे ‘फोनपे’ वापरकर्त्यांना त्यांचे विद्यमान ‘फ्रीचार्ज’ वॉलेट ‘फोनपे’शी लिंक करता आले. त्यांनी ‘जिओ मनी’ आणि ‘एअरटेल मनी’सोबतही अशीच भागीदारी केली आहे. ‘फोनपे’ने ‘रेड बस’, ‘ओला’, ‘ईट फिट’, ‘गोआयबीआयबीओ’ आणि ‘स्विगी’सोबत तीनशेहून अधिक ग्राहक ब्रॅण्ड्ससह त्यांच्या स्विच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

‘फोनपे’ हे आंतरराष्ट्रीय प्रवास विमा सुरू करणारे भारतातील पहिले डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बनले. त्यांनी फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंडाचे एकत्रित फायदे देण्यासाठी आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या सहकार्याने लिक्‍विड फंडदेखील लॉन्च केले.

‘फोनपे’ने विमा कंपनी बजाज आलियान्झ आणि आयसीआयसीआय लॉम्बार्ड यांच्याशी भागीदारी केली आणि कोविड महामारीच्या काळात हॉस्पिटलचा खर्च कव्हर करण्यासाठी दोन स्वतंत्र कोरोना व्हायरस विशिष्ट विमा उत्पादने लॉन्च केली. ग्राहकांना म्युच्युअल फंड कंपन्यांच्या इक्‍विटी, डेट आणि गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करण्यास मदत करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करण्यासाठी त्याच महिन्यात सुपर फंड्सदेखील सुरू केले.

कंपनीने परवडणार्‍या वार्षिक प्रीमियममध्ये भारतातील प्रवासाच्या सर्व पद्धतींशी संबंधित सर्व जोखीम कव्हर करण्यासाठी देशांतर्गत बहुट्रिप विमा सुरू केला आणि हॉस्पिटल डेली कॅश इन्शुरन्स लाँच करण्यासाठी आयसीआयसीआय लॉम्बार्डसोबत भागीदारी केली, ज्यामध्ये दुखापत किंवा आजारांमुळे हॉस्पिटलायझेशन दरम्यान झालेल्या खर्चाचा समावेश होतो.

‘फोनपे’ कंपनीने कार आणि बाईक विमा पॉलिसी लॉन्च करून मोटार विम्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ‘फोनपे’ ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इन्श्युअरटेक कंपनी म्हणून उदयास आली. नोव्हेंबरमध्ये २०२१ मध्ये ‘फोनपे’ हे ३५ टक्के मार्केट शेअरसह सोने खरेदीसाठी सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म बनले आहे.

‘फोनपे’ला मिळालेले सन्मान :

२०१८ : आयएएमएआय इंडिया डिजिटल अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट मोबाइल पेमेंट उत्पादन किंवा सेवा श्रेणी.
२०१८ : एनपीसीआयकडून युपीआय डिजिटल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड.
२०१८ : सुपर स्टारअप एशिया अ‍ॅवॉर्ड

२०१८ : दूरसंचार आणि तंत्रज्ञान श्रेणीतील इंडिया डव्हर्टायझिंग अ‍ॅवॉर्ड
२०१९ : आयएएमएआयद्वारे आयोजित नवव्या इंडिया डिजिटल अ‍ॅवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट मोबाइल पेमेंट उत्पादन किंवा सेवा अ‍ॅवॉर्ड
२०१९ : इंडियन रिटेल आणि ई-रिटेलमध्ये बेस्ट डिजिटल वॉलेट इनिशिएटिव्ह अ‍ॅवॉर्ड

२०१९ : झी बिझनेस आणि द इकॉनॉमिक टाइम्सद्वारे आयोजित आठव्या वार्षिक भारतीय रिटेल आणि ई-रिटेलमध्ये सर्वोत्कृष्ट डिजिटल वॉलेट उपक्रमाचा पुरस्कार
२०२१ : आयएएमएआय इंडिया डिजिटल अ‍ॅवॉर्ड्समध्ये दोन पुरस्कार – वेल्थ मॅनेजमेंटमधील उत्कृष्टतेसाठी सुवर्ण (म्युच्युअल फंड श्रेणीसाठी) आणि अनस्टॉपेबल इंडिया व्हिडिओसाठी रौप्य.

– चंद्रशेखर मराठे

The post ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार घराघरात पोहोचवणाऱ्या ‘फोनपे’ची कथा appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment