कमवणे, जमवणे आणि वाढवत नेणे, हे आहे गुजराती माणसाच्या श्रीमंतीचे रहस्य

१९६० ची ही घटना आहे. वॉल्टर मीशल या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग केला. तो काळच तसा प्रयोगांचा आणि चाचण्यांचा म्हणून ओळखला जातो, परंतु हा प्रयोग लहान मुलांवर करण्यात आला. यामध्ये काही मुलांना स्वतंत्र खोल्यांमध्ये एकांतात बसवण्यात आले.

त्यांना एका काचेच्या बशीमध्ये त्यांचा आवडीचा पदार्थ ‘मार्शमेलो’ देण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की जर त्यांना खायचे असेल तर ते तो पदार्थ खाऊ शकतात, परंतु जर ते पंधरा मिनिटांसाठी थांबले, तर त्यांना अजून एक मार्शमेलो देण्यात येईल आणि जर त्यांनी तो पदार्थ आताच खाऊन टाकला तर मात्र त्यांना पुन्हा काहीही मिळणार नाही’.

या प्रयोगात घेण्यात आलेल्या मुलांचे वय केवळ चार वर्षांचे होते. यातील बहुतांश मुलांनी मार्शमेलो खाऊन टाकला आणि फारच कमी मुलांनी दोन मार्शमेलो जिंकले.

१९६०, २००६ आणि २०११ या वर्षांमध्ये त्या सर्व मुलांच्या आयुष्यावर निष्कर्ष काढण्यात आले. ज्या मुलांनी दोन मार्शमेलोसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता ती मुले दर्जेदार आयुष्य जगत होती. त्यातील काही मोठे उद्योजक, संशोधक आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये उच्चपदावर होते. त्यातील जवळपास नव्वद टक्के मुलांनी विसाव्या वर्षांपर्यंत पुस्तके लिहिली होती. तसेच त्यांचे खाजगी आयुष्यदेखील अत्यंत आनंदमय होते.

मात्र ज्या मुलांनी ताबडतोब मार्शमेलो खाण्याचा पर्याय निवडला, ती अत्यंत सामान्य आयुष्य जगत होती. त्यातील काहींना रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील खूप धावपळ करावी लागत होती. खाजगी आयुष्यात त्यांचे आपली पत्नी आणि परिवारातील इतर सदस्यांशी असलेले संबंध फारशे चांगले नव्हते. या प्रयोगाला ‘मार्शमेलो टेस्ट’ किंवा ‘डिलेड ग्रॅटिफिकेशन टेस्ट’ असं नाव आहे. असो!

या चाचणीने एक गोष्ट स्पष्ट केली की तात्पुरता मिळणारा फायदा हा दीर्घकालासाठी मिळणाऱ्या फायद्याला मारक असतो. ही चाचणी ताबडतोब मजा करण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमची संयम करण्याची इच्छाशक्ती किती दांडगी आहे, हे यात तपासले जाते.

पैसे ‘जमा’ करण्याच्या बाबतीत व्यापारी समाज आणि पैशांवर ‘मजा’ करण्याची मानसिकता असलेले मानसिक गरीब लोक यांच्या इच्छाशक्तींमधील फरक आपल्या लक्षात येतो. यात वेगवेगळ्या लोकांची निवडलेली प्राथमिकता समजते. व्यापारी लोकांच्या नफेखोरीबद्दल रिकामे लोक कितीही टीका करत असले, श्रीमंती सुख विकत घेऊ शकत नाही, असे त्यांना वाटत असले तरी लक्षात ठेवा, पैशाने सुख विकत घेता येत नसेलही कदाचित, पण गरीबी तर काहीच विकत घेऊ शकत नाही!

धंद्यातून पैसा कमावणे, कमावलेला पैसा जमवणे आणि जमवलेला पैसा वाढवत नेणे हे गुजराती लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य आहे.

या प्रयोगानंतर व्यक्तिमत्व विकासाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांतीच घडून आली. या विषयावर शेकडो पुस्तके लिहिण्यात आली. या प्रयोगांमध्ये काढलेले निष्कर्ष गुजराती व्यवसायिकांच्या बाबतीत कशाप्रकारे तंतोतंत लागू होतात, हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहू.

मोहनभाई पटेल त्यांचं नाव. त्यांची मुंबईत मालाडमध्ये ‘पटेल एक्स्ट्रयूजन’ नावाची औषधांसाठी लागणारी ट्यूब्ज बनवणारी मोठी कंपनी होती. हा त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीचा काळ होता. मोहनभाई टाटामध्ये नोकरी करायचे आणि राहिलेल्या वेळात कंपनी सांभाळायचे. त्यावेळी त्यांना अलेंबिक कंपनीकडून पाच लाख ट्युब्जची ऑर्डर मिळाली होती. त्यावेळी जगात सगळीकडे टिन धातूच्याच ट्युब्ज बनवल्या जायच्या.

मोहनभाई पटेल

अशा हजार ट्युब्ज बनवण्यासाठी चारशे रुपये उत्पादन खर्च यायचा. परंतु मोहनभाईंनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अलेंबिकला कळवले, की जर त्यांनी टिनऐवजी अल्युमिनियमच्या ट्युब्ज घेतल्या तर त्या ऐंशी रुपये प्रति हजार ल्युमिनियम ट्युब्ज या भावाने मिळतील. परंतु त्यासाठी त्यांना थोडं थांबावं लागेल. आर्थिक फायदा दिसल्यामुळे कंपनीने ते मान्य केले आणि मोहनभाईंनी जगात कोठेही न मिळणारी ल्युमिनियम ट्यूब बनवण्यात स्वत:ला गुंतवून टाकले.

प्रोडक्शन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की प्रती हजार ट्युब्जसाठी चाळीस रुपये खर्च येत होता. कंपनीला जुन्या अंदाजानुसार ऐंशी रुपये सांगितल्यामुळे त्यांना दुप्पट फायदा होणार होता. आहे त्या पद्धतीने उत्पादन घेऊन त्यांना कमी वेळेत तात्पुरता फायदा मिळवता आला असता, परंतु त्यांना ते पटले नाही. त्यांनी दुप्पट नफा तर मिळवलाच वर जगातले एकमेव ल्युमिनियम ट्यूबचे निर्माते म्हणून नावाजले गेले!

व्यवसायात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही वेळ विकून पैसे कमावता की पैसे देऊन वेळ विकत घेता हे फार महत्त्वाचे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्याने विकलेल्या वेळेचेच पैसे भेटतात. व्यवसायात हीच परिस्थिती असेल तर दृष्टिकोन बदलायला हवा. तसेच, पैशांचा आणि श्रीमंतांचा द्वेष करून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही; यामागे चिकाटी, त्याग, संयम आणि परिश्रम या स्वरूपात त्यांनी किंमत चुकवलेली असते.

पैसा हे सर्व दु:खांचे कारण असतो ही एक बाधित मानसिकता आहे; खरे पाहता पैशांचा अभाव हेच सर्व दु:खांचे कारण असते. गुजराती, मारवाडी, सिंधी आणि एकूणच व्यापारी समुदायांमध्ये राजकारण्यांच्या सभेमधल्या चटया गोळा करणारा वर्ग मुळीच सापडणार नाही. इतरत्र जसे राजकारण आणि क्रिकेटवर तासन् तास वाया घातले जातात, तसे त्यांच्याकडे रोकडा, धंदो, इन्व्हेस्टमेंट, आयपीओ, बजेट इत्यादी विषयांवर वेळ गुंतवला जातो.

ते जाणतात, जी गोष्ट अहंकार सुखावते ती पैशांसाठी हानिकारक असते. धंदा करणे म्हणजे दुकान उघडणे, गल्ला सांभाळणे किंवा हिशोब तपासणे इतकीच मर्यादित गोष्ट नाही, यामध्ये तुमच्या आर्थिक बुद्धीमत्तेचा आणि व्यवहारकौशल्याचा कस लागतो.

धंदा कसा करतात गुजराती?

एका भर दुपारी एक न्हावी आपल्या दुकानामध्ये एकटाच बसलेला होता. दुपारच्या वेळी रोजही त्याला काहीच काम नसायचे. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षांचा लहान मुलगा तेथे आला. त्याने विचारले, काका, काय करताय? न्हाव्याने सांगितले, काहीच नाही बेटा, ह्यावेळी रिकामाच आहे. मुलगा, तुम्ही कटींग कितीला करता? न्हावी, पन्नास रुपये.

मुलगा, माझ्याकडे आता तीसच रुपये आहेत आणि तुम्ही तसेही बसूनच आहात, तेव्हा करा ना कटींग. काहीच न करता बसून राहण्यापेक्षा न्हाव्यानेही तो प्रस्ताव आनंदाने स्विकारला. कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणतात ते यालाच. कल्पना करा, की हे उदाहरण कोणत्या राज्यातले असेल.

गुजराती समुदाय आज जगातल्या १२९ देशांमध्ये धंदा करतो आहे. त्या देशांतील अर्थव्यवस्थांवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. युगांडामध्ये तत्कालीन हुकूमशाहा इदी अमेन याने अति राष्ट्रवादातून गुजरातींना देशातून बाहेर काढले होते. यानंतर काहीच वर्षांत युगांडाची अर्थव्यवस्था कोसळलेली जगाने पाहिली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवनी यांना स्थलांतरित गुजरातींना परत बोलावण्यासाठी ब्रिटनमध्ये यावे लागले.

इकडे भारतात, देशाच्या पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जर पंचवीस टक्के निर्यातीचा वाटा उचलत असतील, जगातल्या दहापैकी आठ हिऱ्यांना त्या राज्यात पैलू पाडले जात असेल, सर्वात मोठे विशेष आर्थिक क्षेत्र याच राज्यात असेल तर याचे श्रेय सर्वस्वी त्या राज्यातील लोकांच्या मेहनतीला, त्यांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेलाच जाते. तुमच्या डोक्यातल्या हिऱ्याला पैलू पाडायचे असेल, तर एखाद्या गुजराती व्यापाऱ्याबरोबर नक्की मैत्री करा, धुरंधर राजनितीज्ञ आणि थर्ड अम्पायर यांची तशी आपल्याकडे काहीच कमतरता नाही.

– शेख रियाझ
7378926295

The post कमवणे, जमवणे आणि वाढवत नेणे, हे आहे गुजराती माणसाच्या श्रीमंतीचे रहस्य appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment