कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल?

कोरोनाने सगळ्या जगाला धारेवर धरले आहेत. प्रत्येक माणूस किंबहुना प्राणीसुद्धा या विषाणूमुळे प्रभावित झाले आहेत. जीवनशैली बदलली. स्वरूप बदलले. व्यवहार बदलले. वर्क फ्रॉम होम, स्वच्छता, ऑनलाईन बिझनेस याचे प्रस्थ वाढले. भारतात सर्वात जास्त फटका बसला तो छोट्या आणि मध्यम व्यवसायाला आणि व्यावसायिकाला.

काहींची व्यावसायिक गती मंदावली तर काहींचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. या महामारीला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले, परंतु बरेचशे व्यवसाय आणखीनही रुळावर आलेले नाही. त्यात लॉकडाउनची टांगती तलवार सैदव डोक्यावर. सर्वच व्यवसायिक याच विवंचनेत आहेत हे सर्व कधी थांबणार कधी? व्यवसाय आणि व्यवहार पुन्हा सुरू होईल.

माझ्या मते हे सर्व पूर्ववत होण्यास आणखी बराच कालावधी लागेल आणि तोपर्यंत व्यवसायाचे पूर्ण स्वरूप बदललेलेे असेल. त्यामुळे आपल्या व्यवसायात आणि व्यवसायपद्धतीत काही बदल करणे अनिवार्य आहे. आपला व्यवसाय पुन्हा जोमाने करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील.

बदललेले स्वरूप ओळखा :

कोरोनाने काही नियम आखले आहेत, जसे सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता, कमीतकमी भटकंती आणि आरोग्याची काळजी. आपल्याला आपला व्यवसाय अश्याच पद्धतीने आखावा लागेल, कारण ग्राहक म्हणून कोरोनाचे नियम पाळणार्‍या व्यवसायिकांशीच मी व्यवहार करू इच्छितो. मग ग्राहकांच्या समाधानासाठी मला हे नियम पाळणे आवश्यक आहेत.

आपण जर सेवा देत असता तर आपण जास्तीत जास्त स्वच्छता पाळा. खाद्यउत्पादन करत असाल तर आरोग्याची काळजी कशी घेतो याचे मार्केटिंग करा. ग्राहकांच्या घरी जाऊन विक्री करता येईल का हे बघा. ग्राहक आता चार दुकाने फिरण्याच्या फंदात पडणार नाहीत. ग्राहकांना घरबसल्या आपण काय देऊ शकतो याचा विचार करा आणि प्रक्रियेमध्ये तसे बदल करा.

सेवेमध्ये ऑनलाईन कन्सल्टिंग करता येईल का? या गोष्टींचा अभ्यास करा. उदा : अर्बन कंपनीने ‘सलून अ‍ॅट होम’संकल्पना सुरू केली. का? कारण ग्राहकांनी सलून, पार्लर याकडे पाठ फिरवली होती, पण ग्राहकांची ती गरजसुद्धा होती. बदलेले स्वरूप पाहता या कंपनीने होम सर्विस सुरू केले आणि व्यवसाय मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.

खरेदी क्षमता जाणून घ्या :

या महामारीमध्ये ग्राहकाचे उत्पन्न प्रभावित झाले आहे. यामुळे ग्राहकाची खरेदीक्षमता आणि प्राधान्यसुद्धा बदलले आहेत. आपला व्यवसाय काय आहे. संभाव्य ग्राहकांची खरेदी क्षमता काय आहे त्यांची प्राधान्य काय असेल याचे विश्लेषण करा आणि त्यानुसार थोडे बदल करा. उत्पादनाचा आकार कमी करा त्यामुळे किंमत कमी होईल. सेवेमध्ये गरजेच्या गोष्टींचाच समावेश ठेवा. आज ग्राहक फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या मानसिकतेत आहेत. सध्या तरी कोणताच ग्राहक खरेदीक्षमतेच्या बाहेर जाऊन जोखीम घेण्याच्या तयारीत नाही.

अप्रासंगिक उत्पादन विकण्याचा प्रयत्न करू नका

पुण्यासारख्या काही शहरांमध्ये दोनशे-तीनशे रुपयांमध्ये संपूर्ण आठवड्याची भाजीचे पॅकेज मिळते, पण २०० रुपयात मला आठवड्याची संपूर्ण भाजी मिळत नाही. प्रमाण आणि माप कमी करून ते शक्य आहेत. हा विचार व्यावसायिकाला करावा लागेल, कारण खरेदी क्षमता किती आहे हे जाणूनच विक्री करणे आवश्यक आहेत.

जुने ग्राहक पुन्हा जोडा :

आपला व्यवसायसुद्धा प्रभावित झाला आहेच. बरेचशे व्यावसायिक नवीन मार्केटिंग धोरणात आणखी पैसे नाही देऊ शकत. त्यांनी आपले जुने ग्राहक पुन्हा जोडा. जुन्या ग्राहकांना फोन करा, त्यांना व्यवसायाच्या नवीन स्वरूपाची माहिती द्या. ऑफर्स द्या. जुने ग्राहक जोडले जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा जुन्या ग्राहकांकडून नवीन संपर्क जोडण्याचा प्रयत्न करा.

ज्या व्यावसायिकांनी पहिले आपल्या ग्राहकांची माहिती संग्रहित केली आहे त्यांना याचा खूप फायदा होईल. ज्यांच्याकडे नाही त्यांनी सोशल मीडियाचा वापर करा. लॉकडाउन संपल्यानंतर मला माझे जिममधून फोन आला. ‘जिम परत सुरू केली आहे फक्त लिमिटेड लोकांसाठीच’ जिममालकाने पहिले त्याच्या जुन्या ग्राहकांना फोन करण्याचा विचार केला.

शंभर लोकांना जरी त्याने फोन केला तरी फोनचा खर्च शंभर रुपये. जर त्याने बॅनर किंवा जाहिरात केली असती तर कमीतकमी १० हजार रुपये खर्च आला असता आणि सेवा वा विक्री दोन्हीची शाश्‍वती नाही. हे एक उदाहरण. त्यामुळे जुन्या ग्राहकांवर आता भर द्या. आपण फक्त जुने ग्राहक जरी परत मिळवले तरी आपण हा कठीण काळ निभावून नेऊच शकतो.

नवीन कौशल्य शिका

नवनवीन कौशल्य आपण नेहमीच शिकत असतो पण या वेळेला आपल्याला व्यवसाय सुरू ठेण्याचे स्किल शिकणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायाला लागणार्‍या नवीन कौशल्याची ओळख करून घ्या ते शिका. त्यांनी आपले आपले पैसे वाचतील. सोशल मीडिया मार्केटिंग, फोन कॉल पीच कशी करावी, पुरवठादार आणि ग्राहक संभाषण हे शिका.

याचे सर्व ऑनलाईन साहित्य मोफत उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून घ्या. कौशल्याचे सेवेत रूपांतर करा. कौशल्यावर आधारित व्यवसाय कधीही बंद पडत नाही. तो पुन्हा उभा राहतोच. हे कौशल्य आपल्या व्यवसायाला पूरक असावे. उगाच काहीतरी नवीन प्रयोग नका करू. आता व्यवसाय सुरू ठेवणे हे उद्दिष्ट असावे.

डिजिटल मार्केट इको-सिस्टिम उभे करा

मार्केट इको-सिस्टिम म्हणजे काय? हे समजणे महत्त्वाचे आहे. आपल्या सेवेचे किंवा व्यवसायाची पूर्ण चक्र म्हणजे इको-सिस्टिम. जर आपण उत्पादन व्यवसायात असाल तर कच्चा माल, त्याची आयात, त्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग, सेल्स सर्विस आफ्टर सेल्स, अ‍ॅण्ड महसूल चक्र यातील जास्तीत जास्त कार्यपद्धती डिजिटल पद्धतीने करता येते का ते पाहा.

डिजिटलमध्ये तुमचा वेळ आणि पैसे दोन्हींची चांगली बचत होते. मार्केटिंग, सेल्स, ऑर्डर, क्‍वोटेशन, प्रॉडक्ट ब्रीफिंग, क्लायंट मीटिंग, ऑनलाईन सेवा हे सर्व तुम्ही डिजिटल पद्धतीने करू शकता. हे सर्व आपल्या उत्पादन आणि सेवेवर अवलंबून आहे आणि त्यानुसार त्यात बदल होईल.

व्यवसाय हा ग्राहकांच्या मानसिकतेवर सुरू असतो. त्यामुळे आताच्या परिस्थितीमुळे जी मानसिकता झाली आहे. त्याला पूरक असे बदल करावे लागतील. ग्राहकांना आता कोणत्याही प्रकाराची जोखीम घ्यायची नाही आणि त्यांची खरेदी क्षमतासुद्धा पूर्वीपेक्षा कमी आहे. ही गोष्ट डोक्यात ठेऊनच काम करावे लागणार हे नक्की. या चार-पाच पद्धतीने आपण आपला व्यवसायाला संजीवनी देऊ शकतो. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय आता शक्य नाही. बदल करावेच लागतील.

– मयूर देशपांडे
(लेखक व्यवसाय विश्‍लेषक आहेत.)
7721005051

 

The post कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल? appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment