खराखुऱ्या ऑल-राउंडर उद्योजकाने स्थापन केली अनेक क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी – अपग्रॅड

त्यांनी भारतात केबल टेलिव्हिजनची सुरुवात केली. त्यांनीच मीडिया आणि एंटरटेनमेंट समूह “यूटीव्ही सॉफ्टवेअर कम्युनिकेशन्स” ची स्थापना केली. न्यूज कॉर्प, ट्वेंटीएथ सेंचुरी फॉक्स, द वॉल्ट डिस्ने कंपनी आणि ब्लूमबर्ग यांच्यासोबत भागीदारी केली आणि नंतर डिस्नेला १.४ मिलियन अमेरिकन डॉलर्सला यूटीव्ही विकली.

त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नॉन-प्रॉफिट “द स्वदेस फाऊंडेशन” ही सामाजिक संस्था स्थापन केली, ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण भारतातील लाखो लोकांसोबत काम करणे, आणि नंतर त्यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करणे आहे.

त्यांनी “ड्रीम विथ युवर आईज ओपन” नांवाचे पुस्तक लिहिले. त्यांच्या ‘युनिलेझर व्हेंचर्स’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून ते भारतीय स्टार्ट अप्समध्ये सुरुवातीच्या काळात महत्त्वाचे खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आहेत. न्यूजवीक मॅगझिनने त्यांना भारताचा ‘जॅक वॉर्नर’ म्हणून संबोधले, तर फॉर्च्यूनने त्याला २१ व्या शतकातील सर्वात प्रभावशाली लोक आणि आशियातील २५ सर्वात शक्तिशाली म्हणून गौरविले.

त्यांचं नांव रॉनी स्क्रूवाला.

रॉनी स्क्रूवाला यांनी मयंक कुमार, आणि फाल्गुन कोमपल्ली यांच्या बरोबर जुलै २०१५ मध्ये अपग्रॅड ही कंपनी स्थापन केली. अपग्रॅड तीन मोठ्या घटकांसह कार्य करते – विविध उद्योजकीय संकल्पनांचे विशिष्ट पैलू ऐकणे, व्यावसायिक तज्ञांचे मनोगत ऐकून त्यांच्या आव्हानांबद्दल जाणून घेणे आणि वास्तविक जीवनातील व्यावसायिक गरजांसाठी उद्योजकीय संकल्पनांचा वापर करणे.

अपग्रॅड महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक आणि कंपन्यांना डेटा सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि लॉ या क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण प्रदान करते. हे शैक्षणिक प्रोग्राम आय आय टी मद्रास, आय आय टी बेंगळुरू, एम आय सी ए, जिंदाल ग्लोबल लॉ स्कूल, ड्यूक सीई, डेकिन युनिव्हर्सिटी, लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी अशा उच्च दर्जाच्या विद्यापीठांच्या सहकार्याने तयार केलेले आहेत.

सप्टेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने अपग्रॅडला स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रामसाठी अधिकृत शैक्षणिक भागीदार म्हणून नियुक्त केले. नंतर कंपनीने प्युपिल एज्युकेशन टेक्नॉलॉजी, ॲकॅडव्ह्यू, आणि कोहोर्टप्लस यांसारख्या अनेक शैक्षणिक कंपन्या ताब्यात घेतल्या. नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून मान्यता मिळाली आणि तिचे अभ्यासक्रम एनएसडीसी चे ई-लर्निंग ॲग्रीगेटर ई-स्किल इंडिया मध्ये जोडले गेले. एप्रिल २०२० मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सारखे विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी सुलभ करण्यासाठी अपग्रॅडची निवड केली.

२०२० मध्ये कंपनीने शैक्षणिक क्षेत्रात द गेट ॲकॅडमी आणि रिक्रूट इंडिया यांना त्यांच्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले. मे २०२१ मध्ये कंपनीने व्हिडिओ-लर्निंग सोल्यूशन्स प्रदाता इंपार्टस विकत घेतले. उद्यम गुंतवणूकदारांकडून बाह्य निधी प्राप्त झाल्यानंतर अपग्रॅडने पुढील संपादनासाठी $२५० राखून ठेवले. वर्षाच्या अखेरीस त्यांनी नॉलेजहट, टॅलेंटेज आणि ग्लोबल स्टडी पार्टनर्स विकत घेतले, जी ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी शैक्षणिक कंपनी आहे.

कंपनी एका बाजूला शैक्षणिक संस्थांसोबत, तर दुसरीकडे आघाडीच्या कॉर्पोरेट्सशी भागीदारी करते. नोव्हेंबर २०२१ पर्यंत जागतिक विद्यापीठांच्या सहकार्याने डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, फायनान्स आणि लॉ यांसारख्या विषयांमध्ये १०० हून अधिक कोर्सेस उपलब्ध केले आहेत. परीक्षांमध्ये प्रमाणपत्रे, डिप्लोमा ते अंडर-ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट पदव्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२१ पर्यंत अपग्रॅड वर २ दशलक्ष नोंदणीकृत खाती होती.

अशा उपक्रमासाठी अनुभव आणि शिक्षण यांचा योग्य तोल साधणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थापकांना माहित होते की त्यांना सामग्री तज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील लोकांना आपल्या बरोबर घ्यावे लागेल. आज त्यांच्या टीममध्ये ४५ लोक आहेत.

अपग्रॅडचे प्राध्यापक सदस्य आय आय टी, आय आय एम, बर्कले आणि बिर्ला इन्स्टिट्यूट अशा विविध संस्थांमधील पदवीधर आहेत. एकूण ३० उद्योजक आणि १० इंडस्ट्री अतिथी स्पीकर्सचा अनुभव शिक्षण आणि संकल्पना परिचय घटकांमध्ये अंतर्भूत आहे.

मयंक कुमार म्हणतात, “आम्हांला ४० हून अधिक औद्योगिक तज्ञांचे कौशल्य आणि अनुभव एका व्यक्तीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणायचे होते. उद्योजक आणि तज्ञ यांचा वेळ अमूल्य असतो; खरं तर ते काहीच पैसे घेत नाहीत, पण त्यांच्या वेळेचा सदुपयोग करून त्यांना आलेल्या समस्यांवर त्यांनी कशी मात केली, किंवा एकूणच त्यांचं मार्गदर्शन घेत पुढे जाणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं”.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या असंख्य लोकांसाठी अपग्रॅड हे अत्यंत महत्त्वाचे आणि बहुमूल्य ॲप आहे‌, आणि त्यावरुन पदवी प्राप्त करणारे आज मोठमोठ्या कंपन्या आणि काॅर्पोरेटस मध्ये सन्माननीय हुद्द्यावर काम करत आहेत.

The post खराखुऱ्या ऑल-राउंडर उद्योजकाने स्थापन केली अनेक क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी – अपग्रॅड appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment