गरजेतून निर्माण होते उद्योगसंधी

उद्योजक आणि अर्थव्यवस्था – भाग दुसरा

या पूर्ण विषयांमध्ये आपण कुठल्याही एका विषयावर फार सविस्तर चर्चा करणार नाही. याचं कारण या लेखमालेचा मुख्य उद्देश जागरूकता निर्माण करणे हा आहे. विषयाचे शीर्षक संपूर्ण लेखमालेच्या केंद्रस्थानी असेल याची काळजी घेण जास्त महत्त्वाचा असेल.

आज आपण बोलणार आहोत उद्योजकीय संधीविषयी. आजचे आघाडीचे उद्योजक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला खूप छान उत्तर दिलं होतं. प्रश्नाचा साधारण संदर्भ होता, ‘उद्योजक कसा निर्माण होतो’ आणि त्यांनी उत्तर दिलं होतं ‘अंतर, त्रुटी किंवा रिकामी जागा शोधल्यावर’. यालाच आजच्या मॅनेजमेंट युगामध्ये ‘फाइंडिंग गॅप’ असं म्हटलं जातं.

प्रत्येक उभी राहणारी अर्थव्यवस्था एक नवीन गरज निर्माण करते आणि ही गरज शोधून भागवता आली तर एक नवीन उद्योग निर्माण होऊ शकतो. याची असंख्य उदाहरणं दिली जाऊ शकतात. आणि ही सगळी उदाहरणं आपल्या रोजच्या डोळ्यादेखतची आहेत.

पावसाळा सुरू झालेला आहे, अखंड पाऊस पडतो आहे आणि  कोविड काळामध्ये पर्यटनाची आणि धबधब्यांची  ठिकाणे ठेवली बंद आहेत. तरी एरवी ती चालू असतात. काही वर्षांपूर्वी आम्ही कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. ऑफिसमधले साधारण वीस-बावीस लोक असू. सकाळी पनवेलला उतरल्यावर स्टेशन समोर एका चांगल्या हॉटेलमध्ये नाष्टा केला आणि कर्नाळा किल्ल्याच्या दिशेने रवाना झालो.

सगळी तरुण पिढी असल्यामुळे सोबत डबे, नाश्ता असं काहीही घेतलेलं नव्हतं. फक्त पाण्याच्या बाटल्या होत्या. कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्यावर किल्ल्यावर निघायच्या आधी जेवणाचं काय करायचं हा विषय झाला. तिथल्या माणसाने आम्हाला बोर्डावर लिहिलेली माहिती वाचायला सांगितली. बोर्डावर चार-पाच महिला बचत गटाची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक होते.

त्यांना फोन करून किती माणसे आहेत तेवढ सांगायचं आणि किल्ल्यावरून परत आल्यावर त्या गरमागरम जेवण करून वाढणार. ही सोय झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले. तीन-चार तास चालून परत आल्यावर आमच्यासाठी गरमागरम जेवण तयार होते.

अतिशय कमी मोबदल्यात ते जेवण आम्हाला उपलब्ध झाले होते. उद्योजक असल्याने सहाजिकच त्या महिलांसोबत नंतर मी आणि माझा दुसरा सनदी लेखापाल मित्र गप्पा मारायला बसलो. आम्हाला मिळालेली आणि मला आता आठवत असलेली माहिती साधारण अशी, तिथे चार ते पाच महिला बचत गट कार्यरत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना गरमागरम जेवण करून वाढणे हे त्यांचे मुख्य काम. नेहमी येणारे पर्यटक त्यांना नाश्त्यासाठीसुद्धा फोन करतात हीसुद्धा एक माहिती आमच्यापर्यंत आली.

त्या दिवशी मधला वार असल्यामुळे फार गर्दी नव्हती तरीसुद्धा साधारण आम्ही वीस-बावीस माणसं आणि असेच दोन किंवा तीन गट तिथे आले होते. शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी आणि पावसाळ्यातले बहुतेक सगळे दिवस त्या सर्व महिलांना नियमित काम मिळते. तिथली बरीचशी घर त्या स्त्रिया याच उत्पन्नातून चालवतात. स्वयंपाकातील प्रत्येक गोष्टीसाठी (म्हणजे उद्योजकांच्या दृष्टीने प्रोसेससाठी म्हणूया आपण) एक किंवा त्याहून जास्त बायका कामाला असतात.

भाजी निवडणे, पोळ्या किंवा भाकऱ्या करणे, भात करणे, आमटी-पिठले करणे, जेवण वाढणे आणि नंतर भांडी घासून ठेवणे ही सर्व कामे त्या बायकांनी वाटून घेतलेली होती आणि त्यानुसार प्रत्येकीला तिच्या कामाचा मोबदला मिळत होता. कामाचा मोबदला तर मिळतोच त्यासोबत काहीजण अजूनही वाढीव पैसे देतात. सोबतच तिथे पिकवल्या जाणाऱ्या ताज्या भाज्या तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या असतात, त्यातूनही काही ना काही उत्पन्न निर्माण होत असते.

कर्नाळा हे कदाचित सगळ्यात छोट पर्यटन स्थळ असेल ट्रेकिंगच्या दृष्टीने बघायचं तर वन-डे ट्रेक; तोसुद्धा हलकाफुलका ट्रेक. त्या एका ठिकाणावर आजूबाजूच्या गावांच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात का होईना पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालना मिळत होती.

आम्ही स्वतः ट्रेकला जाताना बरेचदा खाण्याच्या तयार गोष्टी बांधून घेऊन जायचो. थेपला आणि पुरणपोळी सर्वात नियमित. (एक पुरणपोळी खाल्ली तर तुमच्या शरीरात बऱ्यापैकी ग्लुकोज जाते आणि ट्रेकला सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट म्हणजे एनर्जी जी ग्लुकोजमधून मिळते.) अशा तयार खाण्याचे पदार्थ बनवणाऱ्या उद्योजकांसाठी अशा ट्रेक करणाऱ्या ग्रुप्ससोबत कायमची मात्री करून ठेवायला हरकत नाही.

सह्याद्री अशा अनेक डोंगरमाथ्यानी सजलेला आहे. अनेक डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये रात्री जेवणाची, राहायची आणि सकाळी नाश्त्याची सोय केलेली असते. त्या आडगावातून एखाद्या मुख्य ठिकाणी जाण्यायेण्यासाठी त्याच गावातल्या काही लोकांनी गाड्या उपलब्ध करून दिलेल्या असतात.

या सर्व गोष्टींमुळे तिथे अगदी छोट्या स्वरूपाचे का होईना पण उद्योग सुरू होतात आणि त्या ठिकाणची अर्थव्यवस्था चालू असते. आणि माणूस उद्योजक झाला की त्याची विचारसरणी आमुलाग्र बदलते. एक उद्योजक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघणे गरजेचे आहे. किंबहुना उद्योजक म्हणून अशा छोट्या-छोट्या संधी शोधत राहणं हे आपल्याला गरजेचे आहे.

प्रत्येक संधी आपण घ्यायची नाही कारण कदाचित तो आपला प्रांतही नसेल. पण कोणाला तरी ही गॅप निदर्शनाला आणून दिली तर एका उद्योगाला आणि उद्योजकाला स्वताच्या पायावर उभं करण्याचं श्रेय तुम्हाला नक्कीच मिळू शकतं.

– सीए तेजस पाध्ये
(लेखक सनदी लेखापाल आहेत)
संपर्क ९८२०२००९६४.

The post गरजेतून निर्माण होते उद्योगसंधी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment