होम स्टे ही व्यावसायिक संकल्पना समजायला अगदी सोपी आहे. आपण वापरात नसलेली आपली मालमत्ता किंवा उपलब्ध जागेतील काही खोल्या भाड्याने देणं. म्हणजे आपल्या शहरात प्रवास करणाऱ्या पाहुण्यांना राहण्याची घरच्यासारखी सोय उपलब्ध करून देणे.
आता आपल्याला वाटेल हॉटेल आणि यात फरक काय? पण फरक आहे. तुम्ही होस्ट म्हणून तुमच्या पाहुण्यासोबत घर शेअर करता. यासाठी हॉटेलसारख्या खूप जास्त पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही. त्यामुळे आपणही होम स्टे हा व्यवसाय सुरू करू शकतो.
किती जागा देता येईल यावर कोणतेही बंधन नाही. एका खोलीपासून ते संपूर्ण मजल्यापर्यंत किंवा एका व्हिलापर्यंत आपण आपल्याला पाहिजे तितकी जागा होम स्टेसाठी देऊ शकता. आपल्याकडे रिकामं घर किंवा खोल्या असतील तर हा व्यवसाय करणं जास्त सोपे जातं.
तुमच्या शहरातील पर्यटन हंगामावर व्यवसाय अवलंबून असतो. उदाहरणार्थ जर तुम्ही राजस्थानमध्ये असाल तर उन्हाळ्यात तुम्हाला खूप कमी पाहुणे मिळतील. दुसरीकडे, शिमल्यातील होम स्टेला हिवाळ्यात कमी प्रवासी मिळतील. बारमाही आपल्याला व्यवसाय उपलब्ध असेल अशी शक्यता असेलच असे नाही, पण नियोजनबद्ध व्यवसाय केला तर बारमाही कमाई होऊ शकते. यासाठी काय करावे याच्या काही पायऱ्या येथे देत आहे.
सुरुवात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे airbnb, booking.com, trip advisor, homestays.com या प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या घराची नोंदणी करू शकतो. आवश्यक कागदपत्रांची या ठिकाणी नोंदणी केल्यावर काही टक्के कमिशन या कंपनी आकारतात. याशिवाय तुम्ही थेट फेसबुक, इन्स्टाग्राम, इत्यादी या सोशल मीडियावर आपली जाहिरात करू शकता.
Image Source: facebook.com/mahahomestays
हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला आपले दर ठरवण्याची मुभा देतात. आपल्या परिसरातील इतर व्यावसायिक कशापद्धतीने शुल्क आकारतात हे आपण पाहू शकतो. याच्या मदतीने आपण आपले शुल्क आकारू शकतो. हे दर ठरलेले नसतात. हंगामानुसार कमी-जास्त होऊ शकतात.
आपल्याकडे होम स्टे ही संकल्पना नवीन आहे. त्यामुळे याच्या कायदेशीर बाबींसाठी आपल्याला आपल्या जवळच्या जिल्हा पर्यटन कार्यालयातून माहिती मिळू शकते. प्रत्येक राज्यानुसार याचे नियम वेगळे आहेत.
गुंतवणूक :
व्यवसाय म्हटले की गुंतवणूक आलीच. होम स्टेसाठीसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे खर्च आहेत. पाहुण्यांना चांगल्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या तर पुढच्या वेळी पाहूणे पुन्हा आपल्याकडे येतील.
प्रत्येक जागेनुसार, व्यावसायिक स्वरूपानुसार गुंतवणूक वेगळी लागेल. परंतु २५ हजार ते ५० हजार किंवा त्याहून अधिक गुंतवणूक आवश्यक असेल. बेड, टेबल, खुर्ची, पडदे, चादरी, बेड कव्हर, टॉवेल, एअर कंडिशनर, कुलर, गिझर, याशिवाय वाणसामान, बिलं, आपल्याला जर मदतनीस हवा असेल तर त्यासाठी पगारी कर्मचारी अशाप्रकारचे अनेक खर्च आणि गुंतवणूक आवश्यक असते.
आता आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की एवढी गुंतवणूक करून कमाई चांगली मिळेल का? तर उत्तर आहे “हो”. होम स्टे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे साधारणपणे तुम्ही भाड्याने दिलेली जागा, दिलेल्या सुविधा आणि तुमच्या घराचे स्थान यावर अवलंबून असते. सर्व मूलभूत सुविधांसह खोलीची किंमत ₹१,५०० ते ₹२,००० च्या दरम्यान असू शकते.
आता आपल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी आपण काय काय करू शकतो.
१. घर सुशोभित करा
एखादी थीम, संकल्पना ही होम स्टेसाठी गेमचेंजर ठरू शकते. वेगवेगळ्या कल्पना लढवून घर सजवा. घराचे घरपण जपणारे, येणाऱ्या पाहुण्याला घराची ऊब वाटेल असे होम स्टे तयार करू शकलो तर याचा फायदाच होईल.
२. मूलभूत सुविधा तयार करा
आपण आपल्या ग्राहकांना घरापासून दूर आल्यावर घरासारखे वातावरण देण्यावर भर द्यायला हवा. यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असावा. घर, घराचा परिसर, नीटनेटका टापटीप, स्वछ ठेवावा. लॉनला व्यवस्थित ठेवावे, कार्पेट स्वच्छ असावे, गळती झालेल्या पाईप्स वेळोवेळी दुरुस्त कराव्यात. सुस्थितीतील होम स्टेला पुन्हा भेट देण्यावर ग्राहकांचा भर असेल हे आपण लक्षात घ्यायला हवे.
इंटरनेट, वायफाय कनेक्टिव्हिटी हीसुद्धा आता मूलभूत गरज आहे. अनेक लोक आपले काम त्यांच्या वेळेनुसार करतात. त्यामुळे हे मुख्य गरज ओळखुन आपल्याला ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येऊ शकते हे जरूर विचारात घ्यावे. याशिवाय अनेक होम स्टे वाढणारी स्पर्धा पाहता आधुनिक साऱ्या सुखसोयी पुरवण्यावर भर देतात. ग्राहक हा राजा आहे त्यामुळे तो अनेक ठिकाणी मिळणाऱ्या सोयीची तुलना करून निर्णय घेतो हे आपण लक्षात घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांना काय काय आवडेल त्याचा विचार करायला हवा.
ऑनलाइन बुकिंग घ्या
हा सोपा आणि ग्राहकापर्यंत पोहचण्याचा राजमार्ग आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे तर आपण जाणतोच. त्याचप्रमाणे ऑनलाईन बुकिंग मिळवताना अनुभव येऊ शकतो. सोशल मीडियाचा आपल्या रोजच्या जगण्यात खूप मोठा सहभाग आहे हे आपण नाकारू शकत नाही. याचा वापरही आपण ग्राहक मिळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर मार्केटिंग म्हणून करू शकतो. तसेच विविध वेबसाईट आणि ॲप्ससुद्धा यासाठी मदत करू शकतात.
आकर्षक जाहिराती तयार करा
आपल्या पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक जाहिराती तयार करा. प्रोमो कोडसारख्या सुविधा तयात करा. फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपले खाते उघडा. मुख्य म्हणजे हे सोपे आणि मोफत उपलब्ध आहे. यावर जाहिरात करता येतील. एका क्लिकमध्ये ग्राहक तुमच्यापर्यंत पोहचेल.
युट्यूबशी मैत्री करा. युट्यूबवर तुमच्या होम स्टेचे चॅनल सुरू करून त्यावर होम स्टेचे वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करा. युट्यूब व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात पर्यटक तुमच्या होम स्टेला भेट देऊ शकता.
आपल्या होम स्टेची चांगली छायाचित्रे असणे यशस्वी होम स्टे व्यवसायाची सर्वात मोठी संपत्ती आहे. First impression is last impression असे म्हणतात. त्यामुळे चांगले फोटो प्रवाशांना बुकिंग करताना प्रथम चांगली छाप पाडण्यास मदत करतील.
जर आपल्याकडे होम स्टेचे फोटो व्यावसायिकदृष्ट्या काढलेले नसतील तर आपण ते एखाद्या प्रोफेशनलकडून काढून घेऊ शकतो. अथवा आपणच याचा अभ्यास करून आपल्या होम स्टेचे आकर्षक फोटो काढून ते आपण पोस्ट करू शकतो. चांगली, नैसर्गिक सूर्यप्रकाशात फोटोग्राफी करून जाहिराती तयार करता येतील.
अतिथींच्या गोपनीयतेचा आदर करा
जरी आपण घराचे मालक असलो, तरीही आपल्या पाहुण्यांचा आदर करण्यासाठी नेहमीच त्याच्या गोपनीयतेची काळजी घ्या. उत्तम सेवा प्रदान करणे हाच मार्ग व्यवसायाची भरभराट करू शकतो हे कायम ध्यानात असू द्या.
– टीम स्मार्ट उद्योजक
The post घरच्या घरात सुरू करू शकता ‘होम स्टे’ व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.
खूप छान idea
Thank You.