Ridhi Karan & Associates

चक्रवाढ व्याज; एक जादुई प्रक्रिया

कोणे एके काळी वैभवनगर नावाचे एक राज्य होते. त्या राज्यात राजा खूप उदार व हौशी होता. तो वेगवेगळ्या कलावंतांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन द्यायचा.

एकदा फिरत फिरत एक कलावंत त्याच्यासोबत एक बुद्धिबळाचा खेळ घेऊन आला. तो राजासोबत खेळ खेळला. राजाला तो कसा खेळायचा हे त्याला शिकवले. राजा तो खेळ खेळून एवढा प्रभावित झाला की त्याने खूश होऊन आपल्या प्रधानाला १ हजार सुवर्ण मोहरांची थैली बक्षीस म्हणून आपल्या खजिन्यातून आणायला सांगितली.

सर्व दरबारासमोर उभे राहून राजाने हे बक्षीस घोषित केल्यावर सर्व उपस्थितांनी त्या कलावंताचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. प्रधान एका तबकात ती १ हजार सुवर्ण मोहरांची थैली घेऊन राजासमोर आले.

राजाने या गुणवंत कलाकाराला मंचावर बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित केले; पण काय, या कलावंताने या थैलीचा स्वीकार करण्यासाठी विनम्र नकार दिला व हात जोडून म्हटले, सरकार, माफ करा. मी गरीब कलावंत या स्वर्णमुद्रांचे काय करणार? तुम्ही मला धान्य द्या.

ज्यामुळे माझ्या कुटुंबीयांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सुटेल. फक्त हे धान्य देताना या बुद्धिबळाच्या पटावर राहील तेवढे धान्य द्या. देताना प्रत्येक चौकोनात त्याच्या आधीच्या चौकोनाच्या दुप्पट दाणे द्या. म्हणजे पहिल्या चौकोनात एक दाणा, दुसर्‍या चौकोनात दोन दाणे, तिसर्‍या चौकोनात चार दाणे, चौथ्या चौकोनात आठ दाणे वगैरे वगैरे..

जोपर्यंत ३२व्या चौकोनात सरकले तोपर्यंत एक लाख किलो गहू संपला. हळूहळू राजाच्या लक्षात आले की, तो एवढा गहू त्याला देऊ शकणार नाही, कारण पूर्ण बुद्धिबळाच्या पट संपवण्यासाठी त्याला एवढा गहू लागेल की, जो पूर्ण पृथ्वीतलावरील जीवमात्राच्या ६ पट वजनाएवढा असेल.

ही ताकद आहे ६४ रकान्यांची. ही ताकद आहे चक्रवाढ व्याजाच्या चमत्काराची. पैशाच्या बाबतीत, चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज. चक्रवाढ व्याज तुमच्या संपत्तीत चमत्कार आणते. तुमच्या मिळालेल्या उत्पन्नाची पुनर्गुंतवणूक करते ज्यामुळे तुमची संपत्ती जास्त गतीने वाढते. उगीच नाही, नोबल पुरस्कारित अल्बर्ट आइनस्टाइन चक्रवाढ व्याजाला जगातील आठवे आश्‍चर्य म्हणत.

चला, या चक्रवाढ व्याजाचे महत्त्व आणि लवकर सुरुवात केलेली गुंतवणूक याचे उदाहरण पाहू या.

जर वीस वर्षांची व्यक्ती दरमहा ५ हजार रुपये १५ टक्के व्याजाने पुढील ४० वर्षांसाठी आपल्या रिटायरमेंटसाठी ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक करते आणि त्याला अजिबात हात लावत नाही. तर या गुंतवणुकीची साठाव्या वर्षी १५ करोडपेक्षा जास्त रक्कम मिळेल; पण हाच आर्थिक प्रवास त्याने अजून १० वर्षे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी सुरुवात केला तर १५ टक्के चक्रवाढ व्याजाने त्याला दरमहा ५ हजार रुपये गुंतवणुकीचे फक्त ३.५ करोड रुपये मिळतील.

म्हणजेच चालढकल केल्याने किंवा १० वर्षे उशीर केल्याने त्याला त्याची जबरदस्त किंमत चुकवायला लागेल, जी आहे ११.५ करोड.

गोष्टीचे तात्पर्य : गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा, सातत्याने करा. प्रत्येक गुंतवणुकीला लेबल लावा. उदा. राहुलचे उच्चशिक्षण, आमचा प्रवास, माझी रिटायरमेंट वगैरे. संयम ही संपत्तीची गुरुकिल्ली आहे.

– अर्चना भिंगार्डे
9821172117
(लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

The post चक्रवाढ व्याज; एक जादुई प्रक्रिया appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment