जाणून घ्या अब्जोधीश झालेल्या ‘फार्मईझी’ या स्टार्टअपची कथा

त्या काळात साधी डोकेदुखीची किंवा अंगदुखीची गोळी हवी असेल तर केमिस्टकडे जाऊन आणावी लागत असे. जर औषधांची भली मोठी यादी असेल तर विचारूच नका; मग तर केमिस्टकडे स्वतः जाण्याशिवाय गत्यंतर नसे. घराच्या बाहेर पडून औषधं आणणं हे विशेषतः वरिष्ठ नागरिकांसाठी मोठं जिकिरीचं काम होऊन जाई.

अर्थात, औषध कोणतंही असो, जर ते घरबसल्या उपलब्ध झालं तर कुणाला नको असणार? अगदी तुरळक केमिस्ट होते जे फक्त निवडक ग्राहकांना औषधं घरपोच आणून देत, पण तसे अभावानेच होते. तेदेखील ज्या ग्राहकांची महिन्याच्या महिन्याला ठरलेली ऑर्डर असेल त्यांनाच ही विशेष सेवा पुरवत.

‘फार्मईझी’ कंपनीची स्थापना २०१५ मध्ये दोन मुंबईकरांनी केली. त्यांचं नाव धर्मिल सेठ आणि डॉ. धवल शहा. त्यांनी सर्वांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होईल अशी आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचं काम केलं. कपडे, सौंदर्यप्रसाधने, गृहसजावट, स्टेशनरी अशा अनेक गोष्टी लोकांना घरपोच मिळत असल्या तरी औषधांची डिलिव्हरी देणारे कोणतेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म नाही हे त्यांच्या लक्षात आले.

डॉ. धवल शहा आणि धर्मिल सेठ

धर्मिल डॉ. धवल यांच्या लक्षात आलं की ग्राहक आणि स्थानिक केमिस्ट या दोघांना जोडणार्‍या बाजारपेठेत मोठी तफावत आहे आणि ही तफावत भरून काढण्याचं काम ‘फार्मईझी’ ही कंपनी करते.

‘फार्मईझी’ म्हणजे रुग्ण आणि ग्राहकांना तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक केमिस्टशी जोडणारा पुल आहे. ‘फार्मईझी’ प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना भारतात कोठूनही औषधे आणि वैद्यकीय उपकरणे त्यांच्या दारात सहज आणि त्वरीत उपलब्ध करून देते. केमिस्ट आणि रुग्ण यांच्यात नाते निर्माण करण्याचा आणि रुग्णांच्या गरजा समजून त्यांना सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

‘फार्मईझी’ ही एक स्टार्टअप कंपनी आहे, जी ऑनलाइन औषध वितरणाखेरीज टेलिकन्सल्टिंग, डायग्नॉस्टिक चाचण्या यासारख्या सेवादेखील पुरवते. कंपनीने देशभरात ६ हजारहून अधिक डिजिटल दवाखाने आणि ९० हजारपेक्षा अधिक भागीदार किरकोळ विक्रेते नेटवर्क उभे केले आहे. ‘फार्मईझी’चे मुख्यालय मुंबई येथे आहे.

२०१६ ते २०१८ या कालावधीत कंपनीने बेसमेर या उद्यम भागीदारांकडून ५० दशलक्ष डॉलर्सचे फंडिंग उभे केले.

नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘फार्मईझी’ने एट रोड्स व्हेंचर, टेमासेक होल्डिंग, ओरिओस व्हेंचर पार्टनर, लाइट रॉक, केबी फायनान्शियल ग्रुप, फंडामेंटम यासारख्या गुंतवणूकदारांकडून सीरिज-डी राउंड फंडिंगद्वारे २२० दशलक्ष डॉलर्स जमा केले.

एप्रिल २०२१ मध्ये कंपनीने प्रोसस, टेमासेक, एट रोड्स व्हेंचर, टीपीजी ग्रोथ, थिंक इन्व्हेस्टमेंट, लाइट रॉक, या गुंतवणुकदारांकडून निधीच्या मालिका ई फेरीद्वारे ३५० दशलक्ष डॉलर्स निधी उभारला आहे.

जुलै २०२१ मध्ये ‘फार्मईझी’ने टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, टिपीजी ग्रोथ, ओरिओस व्हेंचर पार्टनर, टेमासेक, बी कॅपिटल ग्रोथ, कोटक प्रायव्हेट इक्‍विटी यांसारख्या गुंतवणूकदारांकडून फंडिंगच्या मालिकेद्वारे ४ बिलियनच्या मूल्यांकनाने ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उभे केले आहेत.

एप्रिल २०२१ मध्ये युनिकॉर्न स्टार्टअप क्लबमध्ये सामील होणारे ‘फार्मईझी’ हे भारतातील पहिले स्टार्टअप होते. मे २०२१ मध्ये प्रतिस्पर्धी स्टार्टअप ‘मेडलाइफ’ ऑनलाइन औषध वितरण सेवा विकत घेतली आणि जून मध्ये कंपनीने ४ हजार ५४६ कोटी रुपयांना सूचीबद्ध डायग्नोस्टिक चेन थायोकेअर कंपनीमधील ६६ टक्के भागभांडवलदेखील विकत घेतले.

‘फार्मईझी’च्या आरोग्य सेवा उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये कोविड आवश्यक, वैयक्तिक काळजी, स्किनकेअर, पोषण आणि फिटनेस सप्लिमेंट, आयुर्वेदिक काळजी, बाळ आणि आईची काळजी, ऑर्थो केअर, डिव्हाइस इत्यादी विविध श्रेणी आहेत.

‘फार्मईझी’ने भारतातील १ हजारहून अधिक शहरांमध्ये २२ हजारपेक्षा अधिक ठिकाणी औषध वितरित केले. त्यांनी संपूर्ण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, तसेच दिल्ली, नोएडा, लखनौ, गाझियाबाद, फरिदाबाद, गुडगाव, वडोदरा, सुरत, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू आणि जयपूर या मेट्रो शहरांमध्ये निदान चाचणी सेवा उपलब्ध करून दिल्या.

‘फार्मईझी’ने ९ अब्ज डॉलर्सच्या मुल्यांकनात ताज्या इश्यू शेअर्सच्या सार्वजनिक सूचीद्वारे १ अब्ज निधी उभारण्याची योजना आखली आहे. सध्या ‘फार्मईझी’ पालक कंपनी एपीआय होल्डिंगचा ८० टक्के हिस्सा टिपीजी ग्रोथ, टेमासेक, सीडीपीक्यू, एट रोड्स व्हेंचर, थिंक इन्व्हेस्टमेंट, प्रोसस व्हेंचर यासारख्या गुंतवणूकदारांकडे आहे.

औषधांचे घरपोच वितरण आणि व्यवस्थापन करण्यात ‘फार्मईझी’ने मोठी आघाडी घेतली आहे आणि भविष्यात संपूर्ण भारतात औषधांचे घरपोच वितरण करण्याचा कंपनीचा मानस आहे.

– चंद्रशेखर मराठे

The post जाणून घ्या अब्जोधीश झालेल्या ‘फार्मईझी’ या स्टार्टअपची कथा appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment