जाणून घ्या ‘उद्यम नोंदणी’चे महत्त्व, ते करण्याची प्रक्रिया व फायदे

उद्यम नोंदणी याची सुरुवात २०१५ साली ‘उद्योग आधार’ म्हणून झाली. ‘उद्योग आधार’ म्हणजे प्रत्येक उद्योगाला मिनीस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम इंटरप्रायझेसने दिलेला विशिष्ट असा १२ अंकी नंबर. मायक्रो, स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम एंटरप्राइज डेव्हलपमेंट (एम.एस.एम.इ.डी.) अ‍ॅक्ट हा भारतातील एम.एस.एम.इ. क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी २००६ मध्ये लागू केला आहे.

एम.एस.एम.इ. क्षेत्राच्या विकासावर या कायद्यानुसार लक्ष केले आहे. एखादा उद्योग म्हणजे नेमके काय याची व्याख्या सांगून या क्षेत्रातील सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग व मध्यम उद्योग या तिन्ही विभागांकडे या कायद्याअंतर्गत लक्ष दिले जाते.

या कायद्यानंतर पुढे आंत्रप्रेन्योर मेमोरांडम (EM) एक आणि आंत्रप्रेन्योर मेमोरांडम (EM) दोन उपलब्ध केले गेले. केवळ १४ राज्यांसाठी कार्यरत असलेल्या या वेबपोर्टलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २००६ पर्यंत १५,६३,९७४ उद्योगांची नोंदणी त्यावर झाली होती व २००७ ते २०१५ दरम्यान २१,९६,९०२ उद्योगांनी त्यात नोंदणी केली. या प्रतिसादामुळे हे नक्की समजले की भारतातील लहान उद्योगांना एकत्र आणणार्‍या व्यवस्थेची नितांत गरज आहे.

EM-1 व EM-2 च्या पुढे जाऊन भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची नोंदणी करण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने ‘उद्योग आधार’ योजना अमलात आणली. उद्योग आधार म्हणजे इतर वेगळे काही नसून प्रत्येक उद्योगाला दिलेला एक बारा अंकी विशिष्ट क्रमांक आहे.

आता याचे रूप ‘उद्यम नोंदणी’ आहे. तुम्ही जर आधी ‘उद्योग आधार’ काढला असेल, तर त्याला ‘उद्यम नोंदणी’मध्ये परावर्तीत करावे लागते.

‘उद्यम नोंदणी’ची प्रक्रिया :

पायरी १ : ‘उद्यम नोंदणी’ करण्यासाठी https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm या संकेतस्थळाला भेट द्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की उद्यम नोंदणी ही पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जाऊनच नोंदणी करा.

पायरी २ : आधार क्रमांक जोडणी – उद्योजकाला त्याचा/तिचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा आहे व व्हॅलीडेट अ‍ॅण्ड जनरेट ओटीपीवर क्लिक करायचे आहे. यानंतर ओटीपी हा आधार कार्डासोबत नोंदवलेल्या संपर्क क्रमांकावर येतो. तो नंबर तिथे द्यायचा आहे.

पायरी ३ : कॅटेगरी – यानंतर उद्योजकाला त्याचा/तिचा सामाजिक वर्ग जसे सामान्य, एस.सी. (शेड्युल कास्ट), एस.टी. (शेड्युल ट्राईब) इत्यादी तिथे निवडायचा आहे. यासाठी उद्योजकाकडे आपल्या वर्गाचा दाखला असणे अनिवार्य आहे, कारण केव्हाही गरज पडल्यास अधिकृत अधिकारी वर्गाचा पुरावा मागू शकतात.

पायरी ४ : उद्योजकाची वैयक्तिक माहिती – यानंतर उद्योजकाला इतर जुजबी माहिती भरायची आहे.

पायरी ५ : उद्योगाचे नाव – यानंतर आपल्या उद्योगाचे नाव द्यायचे आहे.

पायरी ६ : उद्योगाचा प्रकार – आता उद्योजकाला त्याच्या उद्योगाचा प्रकार निवडायचा आहे. यात प्रत्येकाला खात्री ही घ्यायची आहे की त्या उद्योगातील अधिकृत व्यक्तीच नोंदणी करत आहे ना. कारण प्रत्येक उद्योगाला केवळ एकच उद्योग आधार नंबर मिळतो.

पायरी ७ : पॅन नंबर – जर नोंदणी करणारा व्यवसाय हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, को-ऑपरेटिव सोसायटी किंवा एल. एल. पी. असल्यास पॅन नंबर देणे अनिवार्य आहे. बाकी सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये ते पर्यायी आहे.

पायरी ८ : उद्योगाचा पत्ता – त्यानंतर उद्योजकाला त्याच्या उद्योगाचे किंवा ऑफिसचे ठिकाण लिहायचे आहे. एकापेक्षा जास्त जागा नोंदवण्यासाठी ऍड प्लांट या बटणावर क्लिक करायचे आहे.

पायरी ९ : पत्ता – उद्योजकाला ठिकाणासोबत संपूर्ण पत्ता लिहिणेसुद्धा अनिवार्य आहे. यात ठिकाण, जिल्हा, तालुका, राज्य याशिवाय पिन कोड इत्यादी भरायचे आहे.

पायरी १० : उद्योग सुरू केल्याची तारीख – यानंतर उद्योग कोणत्या दिवशी सुरू केला याची तारीख तिथे लिहायची आहे.

पायरी ११ : बँकेचा तपशील – त्यानंतर उद्योजकाला त्याचे बँक डीटेल्स द्यायचे आहेत. यात अकाउंट नंबर, आयएफएससी कोड आणि शाखा हे सर्व द्यायचे आहे.

पायरी १२ : उत्पादन की सेवा – त्यानंतर उद्योजकाला तो उत्पादन करतो की एखादी सेवा पुरवतो हे सांगायचे आहे. तो दोन्ही करत असल्यास त्या दोन्हीपैकी जी गोष्ट जास्त प्रमाणात होते ती तिथे लिहायची आहे.

पायरी १३ : एन.आय.सी. कोडची निवड – उद्योजक एकापेक्षा जास्त नॅशनल इंडस्ट्री क्लासिफिकेशन कोड म्हणजेच एन.आय.सी. कोड देऊ शकतो.

पायरी १४ : कर्मचार्‍यांची संख्या – यानंतर उद्योजकाला त्याच्या उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या व त्यांचा तपशील जसे त्यांचा पगार याबाबत माहिती द्यायची आहे

पायरी १५ : प्लांट, मशिनरी आणि इक्विपमेंट्समधील गुंतवणूक – यात आपण प्लांट, मशिनरी आणि इक्विपमेंट्समध्ये किती गुंतवणूक केली आहे ते लिहायचे आहे.

पायरी १६ : जिल्हा उद्योग केंद्र निवडणे – अर्जदाराच्या जिल्ह्यात जर एकाहून अधिक जिल्हा उद्योग केंद्र असतील तर हा पर्याय दिसेल, त्यात तुमच्या जवळील केंद्र तुम्हाला निवडायचं आहे

पायरी १७ : जमा करणे (सबमिट करणे) – वरील सर्व गोष्टी योग्य प्रकारे भरल्यावर सबमिट या बटणवर क्लिक करायचे आहे. हे केल्यावर ओटीपी मोबाईलवर येईल.

पायरी १८ : व्हेरिफिकेशन – मोबाईलवर आलेला वन टाइम पासवर्ड भरला की लगेच उद्योग आधार तयार होऊन समोर दिसेल.

‘उद्यम नोंदणी’ची वैशिष्टये :

ऑनलाईन नोंदणी असल्याने कुठूनही केव्हाही नोंद करता येते.
नोंदणी केल्यावर ‘उद्यम नोंदणी’ प्रमाणपत्र तयार होऊन डाउनलोड करता येते.
अर्जदाराने जी माहिती भरली आहे, ती ‘उद्यम नोंदणी’ काढण्यासाठी पुरेशी असते, त्याची तपासणी केली जात नाही.
व्यवसाय व उद्योजक यांची फार थोडी माहिती ‘उद्यम नोंदणी’ काढण्यासाठी लागते.
एक व्यक्ती एकाच वैयक्तिक आधार कार्डचा वापर करून वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वेगवेगळी ‘उद्यम नोंदणी’ करू शकते.
‘उद्यम नोंदणी’ पूर्णपणे मोफत आहे.
नोंदणी केल्यावर ‘उद्यम नोंदणी’ प्रमाणपत्र त्वरित दिलेल्या ई-मेलवर येते.

‘उद्यम नोंदणी’चे फायदे :

‘उद्यम नोंदणी’चे अनेक फायदे आहेत. ‘उद्यम नोंदणी’ असलेल्या व्यवसायांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, तसेच त्यांना एमएसएमइ डेटा बँक, एमएसएमइ समाधान अशा इतर योजनांमध्येसुद्धा नोंदणी करता येते. याशिवाय ‘उद्यम नोंदणी’ केलेले व्यवसाय भारत सरकारच्या सी.जी.टी.एम.एस.सी. (क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अ‍ॅण्ड स्मॉल एंटरप्रायझेस) योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत दोन कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळते व क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन या योजनेअंतर्गत उद्योग आधार असलेल्या व्यवसायांना पंधरा टक्के अनुदानसुद्धा मिळते.

– टीम स्मार्ट उद्योजक

The post जाणून घ्या ‘उद्यम नोंदणी’चे महत्त्व, ते करण्याची प्रक्रिया व फायदे appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment