जाणून घ्या ‘पॅसिव्ह इनकम’चे ७ पर्याय

आपण प्रत्यक्ष काम न करता जर पैसे कमावणार असू तर हे कोणाला आवडणार नाही? हे शक्य आहे तुम्ही पॅसिव्ह इन्कमचे मार्ग निर्माण केलेत तर! हे कळण्यासाठी प्रथम आपलयाला अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे उत्पन्नाचे दोन्ही प्रकार समजून घ्यावे लागतील.

आपण नोकरी किंवा व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी होतो. तिथे कष्ट करतो आणि त्यातून उत्पन्न मिळवतो. हे आपले अ‍ॅक्टिव्ह उत्पन्न झाले. आपण प्रत्यक्ष सहभागी झाल्याशिवाय हे उत्पन्न निर्माण होणार नाही.

आपण कष्ट, मेहनत करून जो पैसा कमावतो त्यातून आपण आपले खर्च भागवतो आणि खर्च भागवून जी राशी उरते ती कुठे ना कुठे गुंतवतो. बँक मुदत ठेव, पोस्टाच्या योजना, म्युच्युअल फंड, कंपनी डिबेंचर, इक्‍विटी, सोने, जमीन, घर असे गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा स्वत:च्या अभ्यासानुसार गुंतवणूक करून चांगला परतावा मिळतो.

साधारणपणे ज्या गुंतवणुकीत धोका जास्त, त्यात परतावा मिळण्याची शक्यता ही जास्त. अशा गुंतवणुकीतून मिळणार्‍या उत्पन्नाला ‘पोर्टफोलिओ इन्कम’ म्हणतात. ‘पोर्टफोलिओ इन्कम’ हेही एकप्रकारे पॅसिव्ह इन्कमच आहे, मात्र चांगले ‘पोर्टफोलिओ इन्कम’ असण्यासाठी गुंतवणूकही मोठीच करावी लागते. त्यामुळे अनेकांना उमेदीच्या काळात चांगला पोर्टफोलिओ उभा करणं जमत नाही.

पॅसिव्ह इन्कम ही बर्‍याच अंशी नवी संकल्पना आहे, असे म्हणायला हरकत नाही; कारण यासाठी उपलब्ध असलेले मार्ग हे अगदी नवीन व माहिती-तंत्रज्ञानाशी निगडीतच आहेत. तुम्ही एखादे काम एकदाच करता मात्र त्यातून तुम्हाला वारंवार उत्पन्न मिळत राहते.

एकदा केलेल्या कामात तुम्हाला पुन्हा प्रत्यक्ष सहभागीही व्हावे लागत नाही, पण उत्पन्न जमा होत राहते, याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. तुम्ही एखादी क्रिकेट-फुटबॉल मॅच पाहताय किंवा समुद्र किनारी फिरताय तरीही तुमच्या खात्यात तुमचे पॅसिव्ह उत्पन्न जमा होत राहते.

लेखक एखादे पुस्तक लिहून ते प्रकाशकाकडे देतो आणि त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत राहतात आणि लेखकाला प्रत्येक आवृत्तीच्या वेळी आपली रॉयल्टी मिळत राहते. हे पॅसिव्ह उत्पन्नाचे एक उदाहरण आहे. प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोस्की यांनी त्यांच्या ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकामध्ये श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह इन्कमचे महत्त्व मांडले आहे.

मात्र पॅसिव्ह इन्कम म्हणजे विनासायास आणि घरबसल्या पैसे कमवायचा काही धंदा आहे असा गैरसमज करून घेऊ नका. आंब्याचे झाड लावले की पहिली काही वर्षे ही त्याची निगा राखावी लागते, मशागत करावी लागते. त्यानंतर ते झाड तुमच्या पुढील किती तरी पिढ्यांना फळे देते. याचप्रमाणे पॅसिव्ह इन्कम कमावण्यासाठी सुरुवातीला कष्ट आणि मेहनत ही अटळ आहे.

आता आपण या लेखात पॅसिव्ह उत्पन्न कमवू शकाल अशा काही मार्गांची ओळख करून घेऊ.

१. लिहिते व्हा!

तुम्हाला लिहिण्याची आवड असेल आणि लोकांना उपयोगी अशा विषयांवर तुम्ही लिहू शकत असाल तर पॅसिव्ह इन्कमच्या अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात.

ब्लॉग/वेबसाइट – स्वत:चा ब्लॉग किंवा वेबसाइट सुरू करून तुम्ही तुमचे लेखन यावर प्रसिद्ध करू शकता. सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून याला वाचक जोडू शकता. तुमच्या वेबसाइटवर तुम्ही गुगल जाहिराती, अन्य माध्यमातील जाहिराती किंवा स्वत: जाहिराती मिळवू शकता. महिना शंभर अमेरिकन डॉलर ते एक हजार डॉलरचे जाहिरात उत्पन्न मिळवणे कठीण नाही. मात्र वाचकांच्या पसंतीचा मजकूर, नवनवीन लेखन तुम्हाला ब्लॉग अथवा वेबसाइटवर देत राहावे लागेल.

तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांचे अ‍ॅफिलिएट होऊन त्यांची प्रॉडक्ट्स ही विकू शकता. तुम्ही उपलब्ध केलेल्या जागेत या कंपन्यांवर विक्रीला उपलब्ध असलेली प्रॉडक्ट्स तुमच्या अ‍ॅफिलिएट लिंकने विक्रीला उपलब्ध होतील. तुमचा वाचक ही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो प्रत्यक्ष खरेदी ही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरून करतो व यात तुम्हाला कमीशन मिळते. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट एक टक्का ते पंधरा टक्क्यांपर्यंत कमीशन देतात.

तुम्ही ‘स्मार्ट उद्योजक’च्या ‘ऑनलाइन पार्टनरशीप प्रोग्रॅम’ या अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊनही चांगले उत्पन्न कमवू शकता. ‘स्मार्ट उद्योजक’ दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत कमीशन देते.

ई-बुक लेखन – तुमच्यात लेखक होण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही स्वत:ची डिजिटल पुस्तके म्हणजेच ई-बुक लिहून ती अ‍ॅमेझॉन किंडल, गुगल बुक्स किंवा इंस्टामोजोवरून विकू शकता.

२. युट्युबर व्हा!

युट्युब ही जगातली सर्वात मोठी व्हिडिओ वेबसाइट आहे. तिथे मिनिटाला काही तासांचा ताजा मजकूर युट्युबवर प्रसिद्ध होत असतो. तुम्हीही युट्युबवर स्वत:चे चॅनेल सुरू करून त्यावर व्हिडिओ अपलोड करू शकता. तुमच्या चॅनेलने युट्युबची मॉनेटायझेशन पॉलिसी पूर्ण केल्यावर तुमच्या व्हिडिओमध्येही जाहिराती दिसू लागतात आणि याद्वारे महिन्याला चांगले उत्पन्न तुम्ही कमवू शकता.

३. ऑनलाइन कोर्सेस तयार करा

तुम्ही ज्या विषयात तज्ज्ञ आहात किंवा इतरांना ते विषय शिकवू शकत असाल अशा विषयांचा एक अभ्यासक्रम तयार करून तुम्ही कोर्स लाँच करू शकता. ऑनलाइन कोर्सेसला एकदाच खर्च करायचा असतो, त्यानंतर त्यात कितीही विद्यार्थी शिकू शकतात. ऑनलाइन कोर्सेस विकण्यासाठी आता अगणित प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत. थोडी गुंतवणूक करून तुम्ही स्वतंत्र वेबसाइटही तयार करू शकता.

४. फोटोग्राफी करून फोटो विका

आज इंटरनेटवर अनेक अशा वेबसाइट्स आहेत जिथे तुम्ही काढलेले उत्तम दर्जाचे फोटो अपलोड करू शकता. जगभरातील ग्राहक त्या वेबसाइटवरून तुमचे फोटो पाहू शकतात व त्याचे पैसे भरून डाउनलोड करू शकतात. वेबसाइट आपले कमीशन ठेवून उर्वरीत रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करते.

https://chat.whatsapp.com/Cif14Qvgi88DYbVOjwhZJF

५. इंस्टामोजोवर रिसेलर व्हा!

इंस्टामोजो ही एक पेयमेंट गेटवे वेबसाइट आहे. इंस्टामोजो रिसेलर म्हणजे अ‍ॅफिलिएट मार्केटिंगचं आहे. अनेकजण जे इंस्टामोजोवर आपली फिजिकल व डिजिटल प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.

ही प्रॉडक्ट्स तुम्ही त्याचे रिसेलर होऊन प्रॉडक्टकर्त्याने निर्धारित केलेले कमीशन मिळवू शकता. दर शुक्रवारी तुमच्या माध्यमातून झालेल्या विक्रीचे कमीशन तुम्हाला इंस्टामोजो ट्रान्सफर करते.

६. वर्डप्रेस थीम किंवा प्लगइन तयार करा

‘वर्डप्रेस’ ही जगातील सर्वात मोठी कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टिम आहे. यावर लाखो थीम व प्लगइन्स हे मोफत उपलब्ध असतात. यापैकी बहुतांश थीम व प्लगइन्सची प्रो व्हर्जन्स ही खरेदी करावी लागतात किंवा वर्षभरासाठी भाड्याने घ्यावी लागतात. तुम्हाला HTML5, PHP व CSS या संगणकीय भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इंटरनेटवर अनेक साईट्सवर या तिन्ही भाषा मोफत शिकता येतील. तुम्ही बनवलेल्या थीम किंवा प्लगइन लोकांनी वापरले आणि त्यांना ते आवडले तर त्याचे प्रो व्हर्जन काढून तुम्ही पैसे कमवू शकता. जगभरातून कोणीही तुम्ही बनवलेली थीम किंवा प्लगइन खरेदी करू शकतो.

७. विमा, म्युच्युअल फंड विका

विमा प्रतिनिधी किंवा म्युच्युअल फंडचे परवानाधारक विक्रेते झाल्यावर तुम्ही लोकांना विमा किंवा म्युच्युअल फंड विकू शकता. ग्राहकाला सुरुवातीला एकदाच योजना समजवायची आहे. इथे तुमचे विक्रीकौशल्य पणाला लागते. त्यानंतर तो विमा किंवा म्युच्युअल फंड जितके काळ चालू राहतो, त्यातून तुम्हाला काही ना काही कमीशन येत राहते.

जीवन विमा तर 20 ते 35 वर्षांचा असतो, म्हणजे एकदा ग्राहकाला विमा खरेदी करायला लावला की त्या ग्राहकाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष काहीही न करता तुम्हाला उत्पन्न येत राहते.

या लेखात तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचे काही प्रचलित तर काही अगदी नवीन मार्ग सांगितलेत. भविष्यात या मार्गांमध्ये वाढ होतच राहील आमच्या वेबसाइटवर (udyojak.org) व फेसबुक पेजवर (facebook.com/smartudyojak) तुम्हाला हे नवनवीन मार्ग आम्ही सांगतच राहू, कारण ‘मराठी उद्योजक’ असा एक प्रगतिशील समुदाय निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे आणि वरीलपैकी कोणताही एक मार्ग तुम्ही निवडून उत्पन्न मिळवायला सुरुवात केलीत, म्हणजे तुमच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झालीच.

– शैलेश राजपूत
(लेखक ‘स्मार्ट उद्योेजक’चे संपादक आहेत.)

The post जाणून घ्या ‘पॅसिव्ह इनकम’चे ७ पर्याय appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment