‘ज्ञान’ हाच यशाचा मार्ग

ही गोष्ट तुम्ही बर्‍याचदा ऐकली, वाचली असेल, पण थोडीशी उजळणी करूया. यशाच्या मार्गावर चालण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे.

एका राज्यात एक प्रख्यात ज्योतिषी राहत होता. त्याने सांगितलेले भविष्य खरे ठरायचे, अशी लोकांची समजूत होती. दूरदूरच्या गावांतून लोक त्याला भेटायला यायचे. आपल्या आयुष्याविषयी चर्चा करायचे. ज्योतिषी त्यांना उत्तम मार्गदर्शन करायचा.

ज्योतिष्याचं असं म्हणणं होतं की कोणत्याही ज्योतिष्याने मानसोपचार तज्ज्ञानी भुमिका बजावली पाहिजे. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याचे भविष्य उज्ज्वल नसेल असे कळले तरी त्या माणसाला निराश न करता. त्याला प्रयत्न करण्यास सुचवावे. नाही तर भविष्याच्या चिंतेने तो स्वत:चं वर्तमान खराब करून घेईल. त्याच्या मनमोहक वाणीने सगळेच बेधूंद व्हायचे.

तो राजज्योतिषीसुद्धा होता. राजाची त्याच्यावर कृपा होती. एखादे आक्रमण होणार असेल किंवा राज्यावर संकट येणार असेल तर ज्योतिषी राजाला सावध करायचा. माणूस जितका अधिक प्रख्यात तितकेच त्याच्यावर मत्सर असलेली लोक जास्त. राज्यातील काही मंत्री ज्योतिष्याच्या प्रसिद्धीमुळे त्याच्यावर जळायचे, त्याला पाण्यात पाहायचे. ज्योतिषी मात्र आपल्या बुद्धिमत्तेने विरोधकांना गप्प करायचा.

ज्योतिष्याला धडा शिकवायचा म्हणून काही मंत्र्यांनी राजाचे कान भरले. एकदा राजदरबारात ज्योतिष्याला बोलावण्याची आज्ञा राजाने दिली. ज्योतिष्याला कसलीतरी चाहूल लागली. त्याला कळून चुकले होते की दरबारात कहीतरी विपरीत घडणार आहे. पण राजाज्ञा मोडून चालणारे नव्हते.

ज्योतिषी दरबारात पोहोचला. दरबार मंत्रिमंडळ आणि लोकांनी गच्च भरले होते. काही मंत्री ज्योतिष्याकडे कुत्सितपणे पाहत होते. ज्योतिष्याने रीतीप्रमाणे राजाला वंदन केले. राजाने ज्योतिष्याला आसन ग्रहण करण्यास सांगितले. ज्योतिष्याने आसन ग्रहण केले. सगळा दरबार शांत होता. राजा आणि ज्योतिष्याची नजरानजर झाली.

ज्योतिष्याच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते, हे राजाने अचूक हेरले व क्षणाचाही विलंब न करता धीरगंभीर आवाजात राजा म्हणाला, “ज्योतिषी महाराज, आपण आमचे राजज्योतिषी आहात. आम्ही तुमचा पुष्कळ आदर करतो. हे तुम्ही जाणून आहात. राजज्योतिषाला मिळणारे सगळे मानसन्मान, सुविधा तुम्हाला मिळत आहे, पण आपल्या राज्यातल्या काही लोकांना असं वाटतं की तुम्ही खरे ज्योतिषी नाहीत.

आम्ही त्यांना म्हटले की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, पण त्यांनी जिद्द धरली. ज्योतिषी महाराज तुम्ही जाणता फिर्यादीला रिकाम्या हाती जाऊ देण्याचा रिवाज आपल्याकडे नाही. म्हणून आम्ही या निष्कर्षावर आलो आहोत की तुम्ही खरे ज्योतिषी आहात की नाही याकरता तुमची परिक्षा घेतली जावी. याबद्दल तुम्हाला कोणताही आक्षेप आहे का?”

राजाचे बोलणे झाले होते, याचे भान काही वेळ ज्योतिष्याला राहिले नाही. म्हणून तो स्तब्धपणे राजाकडे पाहतच होता. तो भानावर आला व म्हणाला महाराज, माझा मुळीच आक्षेप नाही, परंतु फिर्यादी कोण आहेत, हे मला कळलं तर बरे होईल. राजाने सांगितले फिर्याद्यास आपले नाव गुप्त ठेवायचे आहे, असे वचन आम्ही देऊन बसलो आहोत. परंतु तुम्हाला जर फिर्यादीच हवा असेल तर मी फिर्यादी आहे असे समजा.

राजाचे हे बोल ऐकताच सगळ्या दरबारात एकदम चर्चा सुरू झाली. राजा फिर्यादी?… ज्योतिष्याने राजाकडे पाहिलं व म्हणाला मी परीक्षा द्यायला तयार आहे. राजा म्हणाला की मी तुम्हाला केवळ एक प्रश्न विचारीन. तो प्रश्न ज्योतिषासंदर्भात आहे.

त्या प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्ही दिलेत तर तुम्ही खरे ज्योतिषी आहात, भोंदू नाही. असा फैसला या दरबारात देण्यात येईल, परंतु जर तुमचे उत्तर चुकले तर तुमचे सगळे अधिकार, राजदरबाराने प्रदान केलेली मालमत्ता काढून घेण्यात येईल. हे तुम्हाला मान्य आहे?

काही मंत्र्यांच्या चेहर्‍यावर राक्षसी आनंद दिसत होता. ज्योतिष्याचे शुभचिंतक चिंतीत होते. सगळ्यांची नजर ज्योतिष्यावर खिळून राहिली होती. ज्योतिषी म्हणाला मान्य आहे. पण…

जर मी हरलो तर मला गमवावे लागेल आणि मी जर जिंकलो तर नला काहीच मिळणार नाही. जे आधीपासून माझं आहे, ते माझ्याकडेच राहणार आहे, परंतु मला नवं काही मिळणार नाही. राजा म्हणाला ठीक आहे. मग मागा तुम्हाला काय हवे आहे? ज्योतिष्याने विचार न करता ताडकन उत्तर दिले यापुढे माझ्यावर व माझ्या येणार्‍या कित्येक पिढीवर कुणीही आक्षेप घेऊ नये.

माझ्या विद्येवर कोणी शंका विचारू नये. मला व माझ्या येणार्‍या कित्येक पिढ्यांना राजदरबाराचा मान मिळत राहावा. जो कुणी माझ्यावर किंवा माझ्या पुढील पिढ्यांवर आक्षेप घेईल, त्याला शासन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

राजा विचारात पडला. त्याने मंत्र्यांशी सल्लामसलत केली. अखेर राजाने ज्योतिष्याचे म्हणणे मान्य केले. आता दरबारात पुन्हा शांतता पसरली, कारण राजा ज्योतिष्याला प्रश्न विचारणार होता. तो केवळ एक साधा प्रश्न नव्हता तर ज्योतिष्याच्या भवितव्याचा प्रश्न होता. सगळे जण राजाकडे पाहत होते. राजा म्हणाला माझा प्रश्न अगदी साधा आहे. तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस या प्रश्नाचं सहज उत्तर देवू शकेल.

सांगा तुमचा मृत्यू कधी होणार? राजाने प्रश्न विचारताच ज्योतिषी विचारात पडला. एखादे मोठे युद्ध जिंकल्याचा भाव राजाच्या चेहर्‍यावर दिसत होता. मंत्र्यांना कळून चुकले होते की ज्योतिष्याचे आता काही खरे नाही. सगळे ज्योतिष्याच्या उत्तराची प्रतिक्षा करीत होते. ज्योतिषी म्हणाला महाराज, आता काय सांगू. तुमची आणि माझी रास एकच आहे. माझ्या मृत्यूचा योग तुमच्या मृत्यूशी जोडलेला आहे राजा आणि दरबारी अचंबित होऊन ऐकत होते.

ज्योतिषी पुढे म्हणाला माझा मृत्यू तुमच्या मृत्यूच्या बारा तास अगोदर होणार आहे. ज्योतिष्याचे हे उत्तर ऐकून सगळ्या दरबारात एकच चर्चा माजली. लोकांना वाटलं आता राजा काही ज्योतिष्याला सोडत नाही, पण ज्योतिष्याला माहीत होतं की त्याने डाव साधला आहे.

ज्योतिष्याने जर म्हटलं असतं की मी अमूक अमूक वर्षांनी मरणार आहे, तर राजाने त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली असती व त्याचे म्हणणे खोटे ठरवले असते. म्हणून ज्योतिष्याने म्हटले की राजाच्या मृत्यूच्या बारा तास अगोदर माझा मृत्यू आहे. म्हणजे ज्योतिषी मेला तर बारा तासाने राजा मरणार. याचे भय राजाला वाटू लागले.

अखेर राजाने ठरल्याप्रमाणे ज्योतिष्याला त्याला जे हवे ते दिले. त्याचे राजज्योतिषीपद कायम राहिले आणि वर ज्योतिषी आजारीदेखील पडणार नाही, त्याला कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी राजाने घेतली.

तात्पर्य : बुद्धिमान माणसाने उदरनिर्वाहाचा विचार करू नये. त्याची बुद्धी त्याला उपाशी मरू देणार नाही. म्हणजेच प्रत्येक माणसाने बुद्धिमान झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असे श्रम केले पाहिजे. पुस्तकं वाचणं, सभांना हजेरी लावणे, देशाटण करणं, चांगल्या लोकांशी मैत्री करणं, बुद्धिमान गुरूंचा विश्वास जिंकण वगैरे वगैरे… तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रातील ज्ञान अवगत करा.

– जयेश मेस्त्री

The post ‘ज्ञान’ हाच यशाचा मार्ग appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment