डेव्हिड एलेन यांची ‘ब्रेन डंप’ कार्यप्रणाली

डेव्हिड एलेन यांनी आपल्या गेटिंग थिंग्स डन, या उत्पादकतेवरील प्रसिद्ध पुस्तकात एक ब्रेन डंप कार्यपद्धती आखून दिली आहे. ती वापरून लोक यश मिळवत आहेत, तुम्हीसुद्धा ती पद्धत तुमच्यासाठी किती चांगली काम करू शकते हे प्रयत्न करून पहा. या पद्धतीमध्ये तुम्हाला पेन व भरपूर पेपर घेऊन पूर्ण करायची आहेत किंवा पूर्ण करण्याची गरज आहे, अशी कामे लिहून काढायला सुरुवात करा.

असे करताना छोट्यातल्या छोट्या ते मोठ्यातल्या मोठ्या कामांचा यामध्ये समावेश करा. या कार्यपद्धतीनुसार काम करायचे झाल्यास हातात एकाहून अधिक तास वेळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे काम घरी बसून प्रत्येक आठवड्याच्या शेवटी पुढील आठवड्यासाठी करणे योग्य ठरेल.

आता तुमच्या कामांच्या याद्या तुमच्या नजरेसमोर राहील अशा पद्धतीने बराच वेळ टेबलवर ठेवा आणि नवीन काम सुचले की लगेच यादी नजरेखालून घालून नसलेलं काम यादीमध्ये समाविष्ट करा. तुमच्या डोक्यातील सर्व संभाव्य कामे एकदा यादीवर उतरली, तुम्हाला मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखे वाटेल. शिवाय यादीत नाव जोडणं हे अपेक्षेहून अधिक जलद वाटेल.

अशाप्रकारे कामे कागदावर उतरवल्याने तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांवर लक्ष देणं जास्त सोपे जाईल. यामुळे एकेक काम लक्षात आणून देणार्‍या मानसिक अलार्ममुळे तुमच्या डोक्यात होणारा गोंधळसुद्धा कमी होईल, शिवाय सुचलेले काम आपल्या यादीत जोडल्याने किंवा यादीत असल्यामुळे एका वेळी एका कामावर लक्ष केंद्रित करता येईल.

पुढील टप्प्यात या कामांची क्रमवारी ठरवण्यासाठी प्रत्येक कामाच्या गुंतागुंतीनुसार त्याची वर्गवारी करायला सुरुवात करा. यासाठी एखादे काम हातात घेण्यापूर्वी ते पूर्ण करण्यासाठी इतर एक किंवा अधिक कामे पूर्ण करण्याची गरज आहे का याचा विचार करा.

यानुसार एकल कामे आणि समूह कामे अशी यादीची वर्गवारी करा. नंतर एकल कामे स्वतंत्र यादीत पुन्हा लिहून काढा. या कामांच्या पूर्ततेसाठी वेळ ठरवून घ्या आणि एक तासाहून कमी वेळेत पूर्ण होऊ शकणारी कामे पूर्ण करा.

आता समूह कामांकडे वळूया. या प्रकारातील प्रत्येक कामाचे त्यांच्या घटक कामांत विभाजन करा. हे विभाजन या घटक कामांचे एकल कामांत रूपांतर होइपर्यंत चालू ठेवा आणि त्यांची नवीन यादी तयार करत रहा. आता तुम्हाला चढत्या क्रमाने समूह कामांच्या पूर्ततेसाठी या नवीन यादीनुसार काम करता येईल. कोणत्याही गुंतागुंतीच्या कामाचे या एकल प्रकारची कामे तयार करण्याच्या उत्पादनक्षम पध्दतीने सुलभ पायर्‍यांच्या प्रणालीमध्ये रूपांतर करता येईल.

यामुळे एका किचकट कामामध्ये कित्येक सुलभ कामाचं समावेश असू शकतो, ज्यामुळे नक्कीच कामाची रूपरेषा खूप मोठी वाटू लागेल. पण म्हणून ते काम पुढे ढकलू नका. ही कामे पूर्ण करायला तासांमध्ये वेळ लागेल हे समजून घ्या आणि ते स्वीकारा. प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात जटिल कामांपैकी तातडीने करायची आणि वेळाने करायची कामे हे ठरवा. वेळाने करायची कामे नंतरची कामे या नावाने नवीन यादीत जोडा.

आतापर्यंत तुमच्याकडे प्रत्येकी एक विशिष्ट हेतू असलेल्या अनेक याद्या तयार झालेल्या असतील. या पद्धतीने स्वतःची कामांची रचना केल्यावर तुमच्या डोक्यातील सर्व गोंधळ दूर सारले जातील आणि आपली कामे कशी पूर्ण करावीत याची अचूक चौकट तुमच्यासमोर तयार होईल.

– टीम स्मार्ट उद्योजक

The post डेव्हिड एलेन यांची ‘ब्रेन डंप’ कार्यप्रणाली appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment