तुमचं ‘अदृष्य मुलं’ करेल तुमच्या भविष्याची तरतूद

पहिली व्यक्ती : मी तुला कधी पार्टीमध्ये पाहिले नाहीये?
दुसरी व्यक्ती : मी तुम्हाला कधीही बँकेत पाहिले नाहीये?

दोन एकाच वयाच्या मित्रांचे हे संभाषण आहे. काय फरक आहे दोघांमध्ये?

पैस म्हणजे सर्वस्व नाही हे १०० टक्के मान्य, पण पैसे नाहीत तर तुम्ही तुमच्या गरजा, हौस, मौज पूर्ण करू शकता का? किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी तरी पैसा हवा की नको?

त्यामुळे पैसा नाकारून चालणार नाही; फक्त तो कमावताना योग्य, चांगल्या मार्गे असावा, स्वत:चे स्वास्थ्य सांभाळून येणार असावा. याची सुरुवातच मुलांना लहानपणापासून देण्यात येणार्‍या संस्कारांमध्ये असतात.

मुलांना लहान वयात शाळेय शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान, सामाजिक बांधिलकी याविषयी माहिती होणे आवश्यक आहे. वरील संभाषणात सहज लक्षात येईल की पहिला मुलगा हा सतत पार्टी करत असेल म्हणजे एक तर त्याला घरून सहज पैसे मिळत असतील किंवा त्याला चांगला पगार असेल म्हणा किंवा व्यवसायात त्याला चांगले उत्पन्न आहे.

दुसर्‍याने विचारलेल्या प्रश्नाने तो नोकरी करतो किंवा व्यवसाय यावर पडदा पडलेला दिसतो. कारण जी व्यक्ती कायम पार्टी करण्यात मग्न आहे, ज्याला बँकेत जाऊन व्यवहार करणे माहीत नाही त्यामध्ये सर्व आले.

पालकांनी ही काळाची गरज लक्षात घेऊन एक नियम पाळायला हवा; तो नियम आहे गुंतवणूकीचा. आपण आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचे पालनपोषण करत असतो. त्याला काहीही कमी पडू देत नसतो. आता इथे अजून एक गोष्ट पालकांनी करायची आहे.

समजा तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी आहे त्याच्यावर जितका खर्च होतो, तितकाच खर्च तुम्ही बाजूला काढून ठेवत चला. असे समजा तुम्हाला अजून एक मुलगा आहे. असे दीर्घकाळासाठी सुरू राहू दे. तुमचा प्रत्यक्षात असणारा पाल्य जसा मोठा होत जाईल तशी तुमची ही गुंतवणूकदेखील मोठी होत जाईल.

२४-२५ वर्षे मुलाच्या खर्चाबरोबर हे पैसे बाजूला ठेवत चला. सध्या मुलांना नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी राहणे, विभक्त राहणे हे खूप साधारण आहे. मुलगी असेल तर तिचेही लग्न होऊन जाईल. तुम्ही मुलांसाठी आपले सर्वस्व लावले असते व ते लावायलाच हवे.

आईवडिल म्हणून ते आपले कर्तव्य आहे. पण उद्या मुलगा विभक्त राहतोय, मुलीचं लग्न होऊन ती माहेरी जाणार या सर्वात तुम्ही एकटे पडणार, तुम्ही निवृत्तीनियोजन (रिटायरमेंट प्लॅनिंग) योग्य केले असेल तर ठीक, तुमच्याकडे मेडिक्लेम असेल तर ठीक नाही तर भविष्यात वाढतं वय, कमी होणारं उत्पन्न व वाढती महागाई तुम्हाला जगू देणार नाही.

अशा वेळी तुम्हाला कोणाची मदत होईल? बरोबर. तुमचा दुसरा अदृश्य मुलगा किंवा मुलगी, ज्याला गृहीत धरून तुम्ही गुंतवणूक केलीत. आज ती गुंतवणूक तुमचं म्हातारपण सुखकर करेल. मुलं, मुलीपण बघतीलच पण त्याना ही त्यांचा संसार, वाढती महागाई, जॉब, व्यवसायचा ताण असतोच ना!

असो. साधा अर्थ असा की पालक व पाल्य दोघांनी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तरुणपणी आपले मित्र भविष्यात येणार्‍या स्पर्धा, गुंतवणूक, व्यवसाय, पैसे कमवायचे मार्ग, ध्येय, याविषयी न बोलता फक्त पार्ट्या, प्रेम प्रकरणं, आईवडिलांचे पैसे खर्च करणे या विषयांवर बोलत असेल तर त्याला भविष्यात येणार्‍या गोष्टीची जाणीव करून द्या.

मैत्री तोडा असे मी म्हणणार नाही, पण तरीही त्याला पटत नसेल तर तुम्हाला नवीन मित्र जो भविष्याचा विचार करतो त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवणे क्रमप्राप्त आहे व हे करताना आपल्या जुन्या मित्रालाही त्याबद्दल जागृत करणं हे मित्र म्हणून तुमचं कर्तव्य आहे.

– दीपक जोशी
9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)

The post तुमचं ‘अदृष्य मुलं’ करेल तुमच्या भविष्याची तरतूद appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment