तुमच्या मुलांना भविष्यात उद्योजक घडवायचे असेल तर ‘या’ गोष्टी करा

तुमच्या पाल्याने कामाच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचं काय करायला पाहिजे? असा प्रश्न जर मी तुम्हाला एक पालक म्हणून विचारला, तर तुमच्यापैकी अनेकांचे उत्तर कदाचित असं असेल की, त्यांना लागतील तेव्हा खर्चाला द्यायला हवेत; परंतु मला असं वाटतं की, त्या पैशापैकी काही भाग त्यांच्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना द्यावा व त्यातील मोठा हिस्सा हा, एखाद्या ठिकाणी छोट्या-छोट्या स्वरूपातील का असेना, परंतु गुंतवणुकीसाठी वापरावा किंवा बँकेत त्याच्या नावावर एखादं खातं (अकाऊंट) उघडून त्यात ती रक्कम जमा करावी. गुंतवणूक करणे हा पहिला पर्याय असावा, असं मला वाटतं.

वरील कृतीचा असा फायदा होऊ शकतो :

कमावलेले पैसे फक्त खर्चासाठीच असतात, हा त्यांच्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
मी कमावलेले पैसे माझ्याच बँक अकाऊंटमध्ये जमा आहेत आणि ते माझ्या मालकीचे आहेत, ही भावना त्यांची स्व-प्रतिमा अधिक मजबूत करेल.
त्यांच्यातील आत्मविश्वास अनेक पटीने वाढण्यास मदत होते.
वरील आत्मविश्वासामुळे, कोणत्याही कामात पुढाकार घ्यायची महत्त्वाची सवय विकसित होते.
त्यांचा पैसा खर्च करण्यापेक्षा जमा करण्यावरच जास्त भर राहतो.

कमावलेला पैसा जरी कमी स्वरूपाचा असला, तरी त्यांच्यासाठी त्याचं ‘मूल्य’ बरंच जास्त असतं.
स्वत:च्या नावावर बँकेत जमा झालेली बर्‍याच दिवसांची लहान-लहान स्वरूपाची एकत्रित रक्कम, ही बरीच मोठी झाल्याने बचतीची संकल्पना, महत्त्व, गरज अधिक चांगल्या प्रकारे त्याच्या मनावर बिंबवली जाते आणि हे प्रात्यक्षिक कोणत्याही पुस्तकापेक्षा, त्यांना कुणी दिलेल्या सल्ल्यापेक्षाही जास्त प्रभावी आणि परिणामकारकरीत्या काम करतं.
अशातूनच, आपण काही अंशी का होईना, परंतु गुंतवणूक करायला हवी आणि ती अगदी कमी रकमेतही केली जाऊ शकते ही संकल्पना त्याच्यात रुजते.

वरील संकल्पनेमुळे त्यांना त्यांच्या पुढील उद्योजकीय आयुष्यातील उपयोगी असे ‘फायनान्शियल स्टेटमेंट – कॅश फ्लो, अ‍ॅसेट्स’ या संदर्भातील अनेक गोष्टी ‘प्रॅक्टिकली’ शिकायला मिळतात. गुंतवणुकीचं महत्त्व आणि फायदा फार कमी वयात स्पष्ट होतो. त्या वयात इतरांपेक्षा वेगळा विचार, वेगळा आचार आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे त्यांची उद्योजकीय मानसिकता आणि दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते.

यातूनच त्यांच्यात स्वावलंबीपणाची बीजे घट्ट रोवली जाऊ शकतात. पालकांच्या अशा कृतीमुळे, पाल्यात यशस्वी उद्योजकतेकरिता आवश्यक असणारी ‘लीडरशिप स्किल’ विकसित व्हायला मदत होते.

– विश्‍वास वाडे

The post तुमच्या मुलांना भविष्यात उद्योजक घडवायचे असेल तर ‘या’ गोष्टी करा appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment