तुमच्या व्यवसायात ‘रिव्ह्यू मॅकॅनिझम’ आहे का?

जगातील प्रत्येक व्यक्तीस आपली प्रगती व्हावे असे वाटत असते. नोकरी करणार्‍याला दरवर्षी प्रमोशन मिळावे असे वाटते. उद्योग करणार्‍याला मी मोठा उद्योजक व्हावे असे वाटते. मला ‘बिझनेमन ऑफ द इअर’ असा पुरस्कार मिळावा असे वाटते.

थोडक्यात कुठल्याही क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीला आपला उत्कर्ष व्हावा असे मनोमन वाटत असते आणि ते वाटणे साहजिकच आहे, कारण प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न, मेहनत करत असतो. कठीण परिश्रमाला पर्याय नाही, असे बरेच यशस्वी झालेली मंडळी म्हणतात. माझ्या यशात 70 टक्के माझी मेहनत आणि ३० टक्के नशीबाचा वाटा असतो असे यशस्वी लोकांना वाटत असते.

काही यशस्वी लोक माझे यश माझ्या स्मार्ट वर्कमुळे आले आहे, असे मानतात. प्रत्येकाच्या बोलण्यात वर्क हा शब्द मात्र नक्कीच असतो. काम केल्याशिवाय यश नाही हे निश्‍चित. आपण जे काही काम करतो ते खरोखरच प्रगतीच्या मार्गावर होणारी वाटचाल आहे, हे कसे ठरवायचे? थोडक्यात काय तर त्याला काही रिव्ह्यू मॅकॅनिझम आहे का? असतो का?

कोणी म्हणेल कशाला हवे असे काही मॅकॅनिझम? कारण आर्थिक परिस्थिती उत्तम होत असेल, पैसे चांगले मिळत असतील. थोडक्यात कालच्यापेक्षा आज चांगला असेल तर समजायचे की आपली मार्गक्रमण बरोबर आहे. “सही जा रहो हो…” असा जर कोणी विचार करत असेल तर समजावे की आपली विचारसरणी कालबाह्य होत आहे. कारण पुढे येणारा काळ हा ‘स्मार्ट वर्क’चाच असणार आहे आणि त्यासाठी ‘रिव्ह्यू मॅकेनिझम्’ अनिवार्य असणार आहे.

‘स्मार्ट वर्क’ खरंच आवश्यक आहे का? होय! कारण आहे ‘वेळ’. प्रत्येकाकडे वेळ असतो तो म्हणजे 24 तास. जर आपण स्मार्ट वर्क केले नाही तर काळ आपल्यासाठी थांबणार नाही. त्यासाठी गरजेचे आहे रिव्ह्यू मॅकेनिझम. म्हणजे काय तर दुसरे तिसरे काही नसून ते म्हणजे पुनरावलोकन. थोडक्यात प्रगती पुस्तक.

असे रिव्ह्यू करण्यासाठी मॅनेजमेंट गुरू आपली पद्धती सांगतील. मोटिव्हेशनल स्पीकर त्यांच्या कल्पना मांडतील, यशस्वी व्यक्तीही काही टप्पे सांगतील. मी मात्र तुम्हाला थोडे वेगळे सांगणार आहे. आम्ही कंपनीमध्ये shopfloor performance साठी P-Q-C-D-S-M तंत्र वापरतो तेच आपल्याला रिव्ह्यूसाठी वापरता येईल. ते मी P-Q-C-D-S-M च्या माध्यमातून सांगणार आहे.

1. P = Productivity  (उत्पादकता) – उत्पादकतेचा शब्दश: अर्थ घेऊ नका. वैयक्तिक जीवनात उत्पादकतेचा संदर्भ आहे तो तुम्ही किती मुल्यवर्धित काम करता त्या अर्थाने. कंपनीत काम करणार्‍या एखाद्या सुपरवायझर किंवा ऑफिसरला विचारले तर तो म्हणणार, “आजकाल बारा तासाची ड्युटी झालीय.

काही सुट्टीच्या दिवशीही कामाला जातात. म्हणचे काय तर ते असे म्हणतात की ‘फार वर्कलोड आहे.’ पण खरंच आपण दिवसभर महत्त्वाचे काम करतो का? मी एकदा दोन तीन दिवस प्रत्येक तासाला काय काम कले ही कागदावर नोंदच केली आणि त्याचे व्हॅल्यू अ‍ॅडेड आणि नॉन व्हॅल्यू अ‍ॅडेड असे वर्गीकरण केले. तर दहा तासातील केवळ 3.5 तास मी व्हॅल्यू अ‍ॅडेड काम केले.

एक म्हण आहे, People will not do what they are expected to do… people will do what they like to do. इथे लाईक म्हणजे अवांतर. म्हणजे असेच मजा म्हणून टाइमपास म्हणून करणे. आता असे म्हणू शकतो. मग काय झाले मी तर कंपनीला दहा तास दिले ना?

जर याला आपण बरोबर म्हटले तर ते चुकीचे आहे. कारण तुम्ही तुमचे अमुल्य ८.५ तास वाया घालवले. या वेळेत तुम्ही किती तरी नवीन गोष्टी शिकू शकला असता.

बहुतांश लोकांना कॉम्प्युटरवर काम करताना अडथळे येतात त्याविषयी शिकता येते. नवनवीन तंत्रज्ञान शिकता येते. जर असे केले नाही तर आपण कालबाह्य होवू. बँका, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी संगणकीकरण झाले तेव्हा ज्यांनी बदल स्वीकारला नाही ते कालबाह्य ठरले.

तरुणांना प्रमोशन हवे आहे, पण स्वत:ची कौशल्ये अद्ययावत करायची तयारी नाही. हे प्रत्येकाला लागू पडते. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी मुल्यवर्धित काम करा. वेळ तुमचा आहे आणि तो वाया घालवणे म्हणजे स्पर्धेत मागे पडणे आहे.

Change upgrade according to Time, otherwise Time will change you.

2) Q = Quality (गुणवत्ता)Quality is produced, not checked / inspected, असे म्हणतात. थोडक्यात आपण जे काम करतो ते गुणवत्तापूर्ण असले पाहिजे.अनेक कंपन्यांमध्ये मिटिंग्ज होतात, दिवसभर मिटिंग्ज चालतात. त्याचा अनेकवेळा उबग येतो कारण मिटिंग गुणवत्तापूर्ण नसते. विषय सोडून अवांतर बोलले जाते. वेळ पाळली जात नाही. तयारी नसते. प्रेझेंटेशन नीट नसते.

मी जपानी लोकांसोबत काम केले आहे. ते घड्याळ लावून मिटिंग करतात. त्यामुळे उपलब्ध वेळेतच तुम्हाला तुमचे मुद्दे मांडावे लागतात, तशी पूर्वतयारी करावी लागते तेव्हा गुणवत्तापूर्ण मिटिंग होते. तुमचे बोलणे, ऐकणे, सहकार्‍यांशी वागणेही गुणवत्तापूर्ण असले पाहिजेत. तोच आदर्श तुमचे इतर सहकारीही ठेवतील.

आपण आपल्या कुटुंबाला, मित्रमंडळींना, सहकार्‍यांना क्‍वालिटी टाईम देतो का? काय असतो क्‍वालिटी टाईम? तर जेव्हा त्यांच्यासोबत असता तेव्हा फक्त त्यांचेच असता का? आफिसमध्ये असताना ऑफिसमधील गोष्टी, घरी आल्यावर घर. नात्यांना योग्य न्याय. याला क्‍वालिटी टाइम म्हणतात. म्हणूनच क्‍वालिटी ही केवळ एखाद्याच गोष्टीला नव्हे तर म्हणजे पार्ट, प्रॉडक्ट, किंवा सर्व्हिसलाच नव्हे तर तुम्ही करत असलेल्या कार्याला, वातावरणारलाही लागू पडते.

3. Cost (मोजावी लागणारी किंमत) – कॉस्ट म्हणजे प्रथमत: CTC (Cost to Company) किंवा ज्यांच्यासाठी काम करता त्यांच्यासाठी. तुम्हाला पुढे जायचेय तर तुम्हाला हे वारंवार तपासून पाहावे लागेल. हे खरेच योग्य आहे का? आणि त्यात योग्य त्या सुधारणा कराव्या लागतील. हल्ली अनेक ठिकाणी परफॉर्मन्स रिव्ह्यू वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात, ज्यामध्ये प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.

दुसरी आहे ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू. आपली सद्यस्थितीत मार्केट व्हॅल्यू काय आहे. ती कमी आहे की जास्त याचा अभ्यास करून आवश्यक ते निर्णय वेळेवर घेतले पाहिजेत.

तिसरी म्हणजे Cost of your Decision तुम्ही जिथे काम करता, ज्यांच्यासाठी काम करता, ते तुमच्या मार्गदर्शनावरून काही निर्णय घेत असतात. ते निर्णयही महागात पडले असे होवू नये. एक उदाहरण पाहू.

अमिताभ बच्चन यांचे उदाहरण पाहू. एवढी मोठी सुपरस्टार पर्सनॅलिटी पण ‘एबीसीएल कॉर्पोरेशन’चा निर्णय घेतला आणि कर्जबाजारी झाले. इतर क्षेत्रातही असे होवू शकते, जो एखाद्या क्षेत्रात यशस्वी आहे तो इतर ठिकाणी यशस्वी होईलच याची खात्री नसते.

तुम्ही ‘थ्री इडिएट्स’ पाहिला असेलच. आर. माधवनच्या वडिलांची इच्छा असते की तो इंजिनिअर व्हावा. कुठल्याही सर्वसामान्य वडिलांना असेच वाटत असते. त्यात गैर काहीच नाही कारण आपल्या मुलाचे भले व्हावे हीच इच्छा असते. पण काही पालक आपले निर्णय मुलांवर लादतात. त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो. मग टोकाचे निर्णय घेतात. जीवन संपवून टाकतात किंवा घर सोडून जातात. अशी पुष्कळ उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. म्हणूनच Cost of your Decision Matters.

4. Delivery (Commitment वचनबद्धता) – डिलिव्हरी म्हणजे आपण काहीतरी देतो म्हणून इथे तो आपण वचनबद्धता या अर्थाने घेतला पाहिजे.
फार फार पूर्वीच्या काळी कमिटमेंट म्हणजे ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ ही नुसती म्हण नव्हती तर लोक ती पाळत असत. दशरथाने कैकेयीला दिलेले वचन आणि घडलेले रामायण जगविख्यात आहे. भीष्माने आपल्या वडिलांना केलेली कमिटमेंट असो कितीही कष्ट पडले तरी ते सहन करत शब्द पाळत.

तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर डेडलाइन काय असते आणि कमिटमेंट किती महत्त्वाची असते हे कळेल. व्यवसाय किंवा नोकरीत जर दिलेला शब्द पाळला नाही तर खूप मोठा दंड आकारला जातो. कधी कधी दंड इतका असतो की धंदा बंद करण्याची वेळ येवू शकते. ग्राहक तुमच्यासाठी थांबत नाही. वैयक्तिक पातळीवरही शब्द पाळणे गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाची असते. सेल्फ कमिटमेंट. बाकी सगळ्या कमिटमेंट पाळण्यासाठी तुम्हाला स्वत:ला कमिटमेंट देणे गरजेचे आहे. ती म्हणजे तुमचा निर्धार.

5. Safety (सुरक्षितता) – सुरक्षेेच्याबाबत निष्काळजी असू नये. आपल्याकडे सुरक्षेच्या बाबतीत खूपच कमी ज्ञान असते. अनेक वेळा आपण आपली जबाबदारीही घेत नाही. कामाच्या ठिकाणीही सुरक्षा ही आपल्या कंपनीची जबाबदारी आहे असे आपले मत असते.
अपघात किंवा आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यासाठी सुरक्षिततेसंबंधीत मुद्दे काळजीपूर्वक वारंवार तपासून शहानिशा करणे.

6. Measurement (मोजमाप-एकूण मापन) – कंपनीमध्ये M म्हणजे Morale पण शेवटी तिथे ही मोजमापच वापरले जाते. म्हणजे अनुपस्थितीची टक्केवारी, माणशी किती सुधारणा वगैरे. माझ्या मते फक्त बँक बॅलन्स वाढला म्हणजे सर्वांगिण विकास झाला असे म्हणणे अपूर्ण आहे. विकासाच्या मोजमापात खालील गोष्टींचे मोजमाप ही आवश्यक आहे.

1. या वर्षी मी किती चांगली पुस्तके वाचली?
2. मी किती नवीन मित्र जोडले?
3. मी किती नवीन गोष्टी शिकलो?
4. मी किती अर्थपूर्ण सिनेमे, नाटके पाहिली?
5. मी किती वेळा कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवला?
6. मी दिलेल्या किती कमिटमेंट पाळल्या?

वरील गोष्टीतील आलेख जर उंचावत असेल तर तुमचा Happiness Index चांगला आहे. शेवटी यशस्वी होण्यापेक्षा आनंदी होणे अधिक गरजेचे आहे.

– एस.पी. नागठाणे
7028963255

The post तुमच्या व्यवसायात ‘रिव्ह्यू मॅकॅनिझम’ आहे का? appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment