तुमच्या व्यवसायाला प्रसिद्धीझोतात कसे आणाल?

मीडिया, प्रसिद्धी, पी. आर. आणि तुमचा व्यवसाय

विख्यात फुटबॉलपटू रोनाल्डोने टेबलवरून ‘कोकाकोला’च्या बाटल्या बाजूला केल्या आणि पाणी समोर ठेवले. या एवढ्याश्या घटनेने कोकाकोलाचे शेअर्स घसरून कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झालं. ही नुकतीच घडलेली घटना युट्युबवर किंवा बातम्यांमध्ये आपण सगळ्यांनीच बघितली. कसं काय झालं हे? नेमकं काय घडलं? याचा उद्योजकाने नीट विचार केला तर त्याला त्यात ब्रॅण्डिंगची रहस्य उमगतील. या रहस्यांचा वापर करून त्यालाही त्याचा ब्रॅण्ड मोठा करता येऊ शकेल.

आज जगात फुटबॉलप्रेमींची संख्या ही काही अब्ज आहे. म्हणजे फुटबॉल सामन्याचा तो सांगता समारोह पाहणार्‍यांची संख्याही तितकीच. त्यात रोनाल्डो म्हणजे फुटबॉलप्रेमींचा हिरो. त्याचा चाहता वर्ग करोडोंनी. अशा रोनाल्डोने जगाच्या समोर, कॅमेर्‍यासमोर कोक बाजूला ठेवून पाण्याची बाटली उचलणे म्हणजे “कोक सोडा, पाणी प्या” असा करोडो फुटबॉल चाहत्यांना त्यानी दिलेला संदेश आहे.

या घटनेचा प्रभाव काही काळ राहणार आणि तोपर्यंत ‘कोकोकोला’च्या मागणीत घट राहणार, स्वाभाविकच ही गोष्ट ओळखून ‘कोकाकोला’च्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात केली असणार आणि जसजशी ही बातमी पसरली असणार तसे कंपनीच्या शेअरचा भाव पडला असणार.

एक छोटीशी घटना आणि तिला मिळणारी प्रसिद्धी याने आपल्या व्यवसायावर इतका मोठा परिणाम घडू शकतो. म्हणूनच उद्योजकांनी मीडिया, पी.आर. आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टींबाबत जागरूक राहील पाहिजे. या तिन्हींचा त्याला वापर करता आला पाहिजे. तो कसा करायचा हे आपण या लेखात पाहू.

माझ्या शालेय वयातला एक अनुभव सांगतो. सातवी-आठवीत असताना कोणत्यातरी वृत्तपत्रात ‘राजू बेकरी’ नावाच्या एका बेकारीबद्दल एक बातमी वाचली. बातमीतला मजकूर नेमका आठवत नाही, पण 25 पैशात पाव मिळतील की असा काही तरी होता. बातमीत बेकरीचं ठिकाण दिलं होतं आणि ते माझ्या घरापासून फारच जवळ होतं. पेपरमध्ये बातमी आली म्हणजे काही तरी मोठी आणि विशेष बेकरी असणार ही, असं गृहीत धरून ती बेकरी बघायला मी गेलो.

तिथे गेल्यावर मला धक्काच लागला. तीन फूट बाय पाच फूटचा पानाच्या गादीएवढी नाल्याच्या शेजारी हे छोटंसं पावाचं दुकान होतं. पण दुकानाबाहेर दहा-बारा लोकांची पाव घ्यायला रांग लागली होती. दुकानाच्या वर छोटासा फलकही होता ‘राजू बेकरी’ नावाचा. तरीही मी शेजारच्या एका दुकानदाराला खात्री करण्यासाठी विचारलं की राजू बेकरी कुठेय? तर त्याने शेजारी हात करत सांगितलं की ही काय राजू बेकरी.

तेव्हा मला हे कसं काय घडलं असेल हे काहीच कळलं नव्हतं. पण पुढे पत्रकारिता शिकताना आणि प्रत्यक्ष काम केल्यामुळे आता मी अंदाज लावू शकतो की हे कसं घडलं असणार.

एखाद्या पीआर एजन्सीला प्रसिद्धीचं कॉन्ट्रॅक्ट द्यावं इतकं काय तो बेकरी मालक श्रीमंत किंवा सज्ञान वाटत नव्हता. मी ज्या वर्तमानपत्रात ती बातमी वाचलेली ते स्थानिक होतं आणि त्या काळी अगदी नवं होतं. (कदाचित ‘मुंबई चौफेर’ किंवा ‘आपला वार्ताहर’ असणार) अशा वर्तमानपत्रांना बातम्यांची गरज असते. त्यामुळे ते स्ट्रेंजर्स किंवा स्थानिक बातमीदार नेमतात. असाच एखादा बातमीदार राजू बेकरीवाल्याच्या ओळखीतला असणार आणि त्याने ही बातमी वृत्तपत्राला पाठवली असणार.

जे ‘राजू बेकरी’वाल्याच्या बाबतीत झालं, ते आपल्यापैकी प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत होऊ शकतं. यालाच पीआर म्हणतात. आपल्यापैकी अनेकांचा हा गैरसमज असतो की पीआर ऍक्टिव्हिटी या फक्त मोठ्या कंपन्यांसाठी असतात. मोठ्या उद्योगांनीच करायच्या असतात. मराजू बेकरीफ हे अशा सगळ्यांसाठी चांगलं उदाहरण आहे.

पी.आर. म्हणजे पब्लिक रिलेशन. मराठीत जनसंपर्क किंवा जनसंज्ञापन. तुमच्या व्यवसायाचा समाजाशी संवाद असायला हवा. हा संवाद जर रचनाबद्ध आणि नियोजित असेल तर त्याचा व्यवसायवाढीसाठी उपयोग करता येतो. हजारो, लाखो रुपयांची जाहिरात जे काम करू शकत नाही ते तुमच्याबद्दलची प्रसिद्ध झालेली एक बातमी किंवा लेख करू शकते.

Source: prowly.com

तुमचा पी.आर. करायचा कसा?

सर्वात प्रथम तुमच्या व्यवसायातले वेगळेपण ओळखा. ते वेगळेपण आपल्याला लोकांसमोर मांडले पाहिजे. तुमच्या व्यवसायातले वेगळेपण, तुमच्यातली म्हणजे संस्थापकांमधली वैशिष्टये, तुमच्या कंपनीची वैशिष्ट्ये, तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवेतील वैशिष्ट्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समाजासमोर मांडाव्या लागतील. यासाठी प्रसिद्धीमाध्यमांचा वापर करता आला पाहिजे. तो कसा करायचा यासाठी काही टुल्सची ओळख करून देणार आहोत.

कंपनी वेबसाइट : प्रत्येक व्यवसायाची वेबसाइट असणे अनिवार्य आहे. या वेबसाइटमध्ये मूलभूत काही गोष्टी; ज्यात कंपनीची ओळख, संपर्क डिटेल्स, प्रॉडक्ट किंवा सेवा आणि ब्लॉग असला पाहिजे. ब्लॉगमधून तुम्ही समाजाशी संवाद साधता. तुमच्या विशेष घटना, घडामोडी इत्यादी गोष्टींना अधिकृतपणे तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्धी दिली पाहिजेत. तुम्हीच जर तुमच्या वैशिष्ट्यांना प्रसिद्धी देणार नसाल, तर इतर माध्यमे का देतील?

सोशल मीडिया : सोशल मीडिया या नावातच ‘मीडिया’ म्हणजे प्रसिद्धीमाध्यम आहे. प्रसिद्धीच्या दृष्टीने विविध सोशल मीडियापैकी फेसबुक, ट्विटर, कू आणि लिंक्डइनचा समावेश आवर्जून करा. तुमच्या ब्लॉगवर जे प्रसिद्ध करणार असाल ते सोशल मीडियावरील तुमच्या पेज, अकाउंट किंवा चॅनेलवरूनही आवर्जून शेअर करा. लोकांना तुमच्याकडून अधिकृतरित्या आणि रीतसर काही गोष्टी कळू द्यात.

सामान्यपणे उद्योजक सोशल मीडियाचा वापर हा फक्त जाहिरतींकरता करतात. जाहिरातींसह समाजाशी कंपनी, संस्थापक यांचा संवाद साधण्यासाठीसुद्धा सोशल मीडियाचा वापर करा.

कंपनी वेबसाइट आणि सोशल मीडिया ही अगदी प्रारंभिक माध्यमे झाली. याव्यक्तिरिक्त समाजापुढे पोहोचण्यासाठी मुख्य प्रवाहातील माध्यमांचा उपयोग करावा लागेल. मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणजे वृत्तपत्र, मासिके, न्यूज चॅनेल्स, नभोवाणी, एफएम चॅनेल्स इत्यादी मोडतात. यामध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळण्याची एक प्रक्रिया आहे ती समजून घेणे गरजेचे आहे.

प्रेस नोट : प्रेस नोट म्हणजे प्रसिद्धीपत्रक. तुम्हाला ज्या गोष्टीला प्रसिद्धी द्यायची आहे, ती रीतसर तुमच्या लेटरहेडवर प्रसिद्धी करता या मथळ्याखाली सुटसुटीत भाषेत लिहून मुख्य प्रवाहातील माध्यमांना फॅक्स किंवा ई-मेलद्वारे पाठवू शकता. या प्रसिद्धीकरता तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. एखाद्या माध्यमात एखादा प्रायोजित स्लॉट असेल त्याचा तुम्ही प्रसिद्धीसाठी वापर करणार असाल तर त्याला जाहिरातीचे दर आकारले जातात. बातमी आणि प्रायोजित यातील फरक इथे समजून घेण्याची गरज आहे.

पी. आर. एजन्सी : प्रेस नोट लिहिण्यापासून त्याला प्रसिद्धी मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टी पी.आर. एजन्सीमार्फत केल्या जातात. पी.आर. एजन्सीमधील लोकांचे माध्यम संस्थांत व पत्रकारांशी चांगले संबंध असतात. तुम्ही प्रसिद्धीसाठी अशा एजन्सीची निवड करू शकता.

नवमाध्यमे : माहिती-तंत्रज्ञानाच्या उगमानंतर पारंपरिक माध्यमांसह अनेक नवमाध्यमे उदयाला आली. वेब पोर्टल्स, युट्युब चॅनेल्स, प्रसिद्ध ब्लॉग्स तसेच विविध पॉडकास्टचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. या नवमाध्यमांच्या उत्पन्नाच्या स्रोतात ‘प्रायोजित’ मजकूर याला मोठे महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही अशी चॅनेल्स व पोर्टल्स यांना प्रसिद्धीसाठी संपर्क करू शकता. नवी असली या माध्यमांचा रिच हजारो-लाखो लोकांपर्यंत असतो.

इव्हेंट प्रायोजकत्व

इव्हेंट प्रायोजकत्व : खेळांच्या स्पर्धा किंवा अनेक कार्यक्रम समाजात होत असतात. तिथे हजारो लोकं येत असतात. यापैकी काही कार्यक्रमांना माध्यमांमध्येही चांगली प्रसिद्धी मिळत असते. असे इव्हेंट, कार्यक्रम हेरून तुम्ही त्यात प्रायोजकत्व देऊ शकता. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसोबत तुम्हालाही प्रायोजक म्हणून प्रसिद्धी मिळते.

‘तज्ज्ञ’ व्हा : तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, त्या क्षेत्रातील तुमचा अनुभव लोकांसमोर मांडायला शिका. त्याबद्दल लिहा, बोला, व्हिडिओ तयार करा. विविध माध्यमांमध्ये असे तुमचे लेख डोमेन एक्स्पर्ट म्हणून प्रसिद्ध होऊ शकतात. यातून समाजामध्ये तुमची डोमेन एक्स्पर्ट अशी ओळख निर्माण होऊ लागते. विविध चॅनेल्स, मासिके, वृत्तपत्रे तुम्हाला वेळोवेळी डोमेन एक्स्पर्ट म्हणून बोलवू लागतील. लिहिण्यासाठी आग्रह करतील. अशा संधी सोडू नका.

स्वतःची मीडिया लिस्ट तयार करा

सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे स्वतःची एक मीडिया लिस्ट तयार करा की ज्यामध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा असते. एखाद्या मासिकाच्या कव्हरवर तुमचा फोटो असावा, चार पानी मुलाखत असावी असे तुम्हाला जर वाटत असेल तर त्या मासिकाची त्या यादीत नोंद करा.
पत्रकार आणि माध्यम संस्थांशी संवाद साधा. संबंध प्रस्थापित करा.

वेळप्रसंगी संबंधांकरता त्यात जाहिरातही करावी लागेल. याचा दूरगामी फायदा ओळखून निर्णय घ्या. प्रसिद्धी तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. त्याचे अनेक फायदेही आहेत. यासाठी प्रसिद्धीचे योग्य नियोजन गरजेचे आहेत.

– शैलेश राजपूत
9773301292

The post तुमच्या व्यवसायाला प्रसिद्धीझोतात कसे आणाल? appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment