दिवाळी हा असा सण आहे की ज्यात प्रत्येक माणूस काही ना काही खर्च करतो. त्यातून मोठी उलाढाल होते. अनेकदा आपण या उलाढालीत ग्राहक म्हणून आपल्याच खिशाला फोडणी देत असतो. तर कधी तरी दिवाळीकडे पैसा कमावण्याची संधी म्हणून पण पाहिलं पाहिजे.
विशेष करून कॉलेज विद्यार्थ्यांनी या दहा-पंधरा दिवसांत थोडी मेहनत करून आपल्या शिक्षणाचा वर्षभराचा खर्च काढला पाहिजे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही असंख्य छोटे मोठे व्यवसाय करू शकता. वानगीदाखल खाली पाच व्यवसायांची माहिती करून देत आहोत.
१. कंदिल बनवणे व विकणे
दिवाळीत प्रत्येक घरात कंदिल हा लागतोच. म्हणजे महाराष्ट्रातले प्रत्येक घर हा तुमचा ग्राहक आहे. विविध रंगांचे, आकाराचे तसेच आकाश कंदिल तुम्ही बनवून विकू शकता. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आदी सोशल मीडिया चॅनल्सचा वापर करून ग्राहक जोडू शकता. पण सगळ्यात मोठा धंदा आहे तो म्हणजे बाजारात.
तुम्ही स्वतः किंवा कोणाला व्यक्तीला बाजारात कंदिल विकायला उभे करू शकता. कारण दिवाळीची विक्री ही बाजारपेठेत जास्त होते. तुम्ही राहता त्या भागात जास्तीत जास्त ग्राहक जोडा. तुम्ही हा व्यवसाय करायचे ठरवत असालच, तर त्वरीत हे लोकांमध्ये घोषित करा आणि ऑर्डर्स स्वीकारायला सुरुवात करा.
कंदिल करायचा कसा हे तर आपण शाळेपासून शिकलो आहोत. पण यात नवनवीन बदल करून नव्या डिझाईन्स आणि आकर्षक उत्कृष्ट रंगसंगतीचे कंदिल बनवा. युट्यूबवर तुम्हाला अनेक नवीन डिझाईन्स शिकायला मिळू शकतील.
२. पणत्या बनवणे व विकणे
पारंपरिक पणत्या बनवणे हे कुंभाराचे काम आहे, पण त्या लाल मातीच्या बनलेल्या पणत्या आणून त्यावर सुंदर रंगात नक्षीकाम करून त्यांची शोभा वाढवून त्यांचे मुल्यवर्धन करू शकता. अशा हस्तकाम केलेल्या पणत्यांना हल्ली बाजारात मोठी मागणी आहे.
पूर्वी लोक घरादारत छोट्या छोट्या भरपूर पणत्या लावत होते. त्याऐवजी आता लोक दारात अंगणात मोठ्या, पण दोनच पणत्या लावतात. असे ग्राहक तुमच्या हस्तकाम केलेल्या पणत्यांचे ग्राहक होऊ शकतात.
मातीच्या पणत्यांसोबत सध्या मेणाच्या पणत्यांची मागणीही वाढली आहे. घाऊक बाजारातून (होलसेल) तुम्ही या पणत्या आणून त्याची छोटी छोटी पाकिटे तयार करून विकू शकता.
३. फटाके विक्री
फटाके वाजवत नाही असं बालपण नाही. त्यामुळे ज्या ज्या घरात लहान मुलं आहेत, ते तुमचे ग्राहक आहेत. फटाके आपल्याकडे प्रामुख्याने दक्षिणेत सिवाकासी इथे बनतात. प्रत्येक शहरात फटाक्यांचे घाऊक विक्रेते असतात. तुम्हाला तुमच्या शहरातील या घाऊक बाजारपेठा शोधून काढाव्या लागतील.
फटाक्यांवर छापलेली किंमत आणि घाऊक बाजारातले त्यांचे दर यात बराच मोठा फरक असतो. त्यामुळे तुम्ही घाऊक बाजारातून फटाके आणून आणि त्याच्या छापील MRP वर मोठी सवलत देऊन लोकांना तुमच्याकडे आकृष्ट करू शकता.
उदाहरणार्थ एका फुलबाजीच्या पुड्यावर छापलेली किंमत ₹१०० असेल आणि तुम्हाला होलसेलमध्ये तो पुडा ₹२० किंवा ₹२५ मध्ये मिळत असेल तर तुम्ही तो ₹४०-५० दरम्यान विकला तरी लोक आनंदाने तुमच्याकडून घेतील.
४. उटणे, चिराटे, हार-फुल-पाने
दिवाळी म्हटली की हार-फुल-पाने, फुलांच्या माळा, तोरणे ही प्रत्येक घरात हवीच असतात. तसचं नरक चतुर्दशीला चिराटे आणि अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे हे लागणारच. लोक या गोष्टींसाठी कुठे ना कुठे खर्च करणारच. तुम्ही या गोष्टी विकायला हातात घेतल्या तर कोण ना कोण ग्राहक म्हणून मिळेलच आणि तुमच्याही खिशात लक्ष्मी येईल.
५. दिवाळी सहल
दिवाळीत मुलांना २०-२० दिवस सुट्टी असते. अशा वेळी पालकांना आपल्या मुलांना कुठे ना कुठे गुंतवायचे असते. तुम्ही स्थानिक पातळीवर चांगल्या शैक्षणिक सहली काढू शकता. गड, किल्ले, सामाजिक संस्था, वैज्ञानिक केंद्रे अशा ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकता. मोठ्यांसाठी धार्मिक सहली आयोजित करू शकता. सहलीसोबत इतरही उपक्रमांचा विचार करू शकता.
– शैलेश राजपूत
The post दिवाळीनिमित्त करू शकता हे छोटे छोटे व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.