त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, पिलानी येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ही पदवी घेतली आहे.
ते संगीतप्रेमी आणि क्रिकेटचे चाहते आहेत. आज ते कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विप्रो या भारतीय बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनमध्ये व्यवसाय प्रमुख म्हणून केली होती. ते इंडिया स्किल्स – व्होकेशनल एज्युकेशन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
हरी मेनन आज बिग बास्केट या कंपनीचे संस्थापक आहेत. बिग बास्केटची स्थापना करण्यापूर्वी हरी मेनन यांनी तुमरी, सेरस कॉर्पोरेशन आणि टाइमली अशा विविध कंपन्यांसाठी सीईओ म्हणून काम केले. हरी मेनन यांनी प्लॅनेटेशिया देश प्रमुख म्हणूनही काम केले होते.
प्लॅनेटेशिया हा भारतातील पहिल्या इंटरनेट सेवा व्यवसायांपैकी एक होता. १९९९ मध्ये बिग बास्केट सुरू करण्यापूर्वी हरी मेनन आणि विपुल पारेख, अभिनय चौधरी, व्ही.एस. रमेश आणि व्ही.एस. सुधाकर या पाच मित्रांनी फॅबमार्टची सहसंस्थापना केली होती.
फॅबमार्ट हा अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखाच एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म होता. कंपनी स्थापन झाल्यावर पहिल्या वर्षात कोणतेही विशेष व्यवहार झाले नाहीत, पण गवगवा मात्र भरपूर झाला, कारण तो पुरेसा महसूल मिळवू शकला नव्हता. अर्थात, त्या काळात भारतात कोणत्याही ऑनलाइन उपक्रमासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती.
सुरक्षित डिजिटल पेमेंट गेटवे नव्हता आणि बरीचशी इतर कारणं होती, पण फॅबमार्टच्या अपयशाने हरी मेनन आणि इतर सहसंस्थापक निराश झाले नाहीत; त्यांनी किराणा दुकानाच्या किरकोळ विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि फॅबमॉल ही भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी आणि फॅबमार्टची ऑनलाईन आवृत्ती लॉन्च केली.
ही कल्पना मात्र चांगलीच क्लिक झाली. फॅबमॉल ही भारतातील पहिली ऑनलाइन-टू-ऑफलाइन रिटेल कंपनी होती. त्यांनी त्रिनेथ्रा या किराणा दुकानाची रिटेल आवृत्ती निर्माण केली आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये त्यांच्या किराणा दुकानाच्या रिटेल आवृत्तीचा तीनशे स्टोअरपर्यंत विस्तार केला. नंतर हरी मेनन यांनी आपला व्यवसाय आदित्य बिर्ला समूहाला विकण्याचा निर्णय घेतला.
दुसरे कुणी असते तर इथेच थांबले असते, पण हरी मेनन मात्र फॅबमॉलपेक्षा काहीतरी मोठं स्थापन करायच्या विचारात होते म्हणून त्यांनी बिग बास्केट सुरू केले. लवकरच कंपनीने वेगाने यशाकडे वाटचाल करायला सुरुवात केली आणि २०१४ पासून सुमारे १० दशलक्ष इतका निधी उभारला. कंपनीने तीन प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आणि ग्राहकांकडून दररोज ५ हजार ऑर्डर मिळू लागल्या.
मार्च २०१६ मध्ये कंपनीने अरबाज कॅपिटलकडून सीरिज डी फंडिंगमध्ये १५० दशलक्ष उभे केले. त्याच वर्षी कंपनीने १० दशलक्ष ग्राहकांच्या ऑर्डरचे लक्ष्य ओलांडले. जून २०१७ मध्ये कंपनीने एकूण ११ गुंतवणूकदारांकडून अविश्वसनीय २९० दशलक्ष जमा केले.
बिग बास्केट प्रमुख पुरवठादारांकडून उत्पादने खरेदी करते. ती उत्पादनं त्यांच्या गोदामांमध्ये साठवली जातात आणि तेथून ते ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरनुसार पुरवठा करतात. डिलिव्हरीचं काम सोपं करण्यासाठी कंपनीने काही शहरांमध्ये आपली गोदामंदेखील स्थापन केली आहेत.
किराणा सामान वेळेत पोहोचवण्यासाठी कंपनीने सुमारे २ हजार किराणा दुकानांशी करार केला. या करारामुळे ग्राहकांमध्ये बिग बास्केटची लोकप्रियता वाढली. बिग बास्केट लाँच केल्यानंतर लगेचच त्यांना क्रिस कॅपिटल आणि सेंट कॅपिटलकडून १० मिलियनचा पहिला निधीदेखील मिळाला.
बिग बास्केटने सरकारी मालकीच्या बंगाल केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेडसोबत (बीसीपीएल) भागीदारी केली, ज्यामुळे कोलकाता येथील ग्राहकांना औद्योगिक रसायने, औषधी आणि घरगुती उत्पादने वितरीत करणे शक्य झाले.
एप्रिल २०१७ मध्ये बिग बास्केटने स्थानिक किराणा दुकानांसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन ऑटोमॅटिक करण्यासाठी स्नॅपबिझ या रिटेल तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली.
बिग बास्केट ही इनोव्हेटिव्ह रिटेल कन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आहे आणि भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन खाद्य सामग्री आणि किराणा दुकान आहे. त्यांच्या कॅटलॉगमध्ये १८ हजारहून अधिक उत्पादने आणि १ हजारहून अधिक ब्रॅण्ड्सची ताजी फळे आणि भाजीपाला, तांदूळ आणि डाळ, मसाले आणि पॅकबंद उत्पादने, शीतपेये, पर्सनल केअर उत्पादने उपलब्ध आहेत.
संपूर्ण भारतात पसरलेले बिग बास्केट ६ दशलक्ष ग्राहकांसह देशातील सर्वात मोठे ऑनलाइन किराणा दुकान आहे. ग्राहकांनी फक्त त्यांना हव्या असलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीची वेळ निवडायची; त्यांची ऑर्डर त्या वेळेला पोचवली जाते.
बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली, नोएडा, म्हैसूर, कोईम्बतूर, विजयवाडा, गुंटूर, कोलकाता, अहमदाबाद, गांधीनगर, लखनऊ, कानपूर, गुडगाव, वडोदरा, विशाखापट्टणम, सुरत, नागपूर, पाटणा, इंदूर आणि चंदीगड ट्राय-सिटी येथे कुठेही ग्राहकांच्या घरापर्यंत ऑर्डर पोहोचवली जाते.
कंपनीमध्ये ६४ टक्क्यांची बहुमताची हिस्सेदारी घेऊन आता ‘टाटा’ समूहाने बिग बास्केट विकत घेतली आहे, ज्यामुळे कंपनीचे मूल्य मे २०२१ मध्ये १.८५ अब्जने वाढले आहे.
– चंद्रशेखर मराठे
The post नावाप्रमाणेच मोठा ऑनलाईन किराणा ‘बिग बास्केट’ appeared first on स्मार्ट उद्योजक.