पैसाबॅक, फ्रीचार्जसारख्या स्टार्टअप्सच्या यशातून कुणाल शहा यांनी सुरू केले ‘क्रेड’

ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध विल्सन महाविद्यालयातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतलेली आहे. त्यांना कोणतीही अभियांत्रिकी पार्श्वभूमी नाही. त्यांनी नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए करत असताना मध्येच काॅलेज सोडून दिलं. त्यांच्या कुटुंबाचा दक्षिण मुंबईत औषध वितरणाचा व्यवसाय होता.

जसं डाॅक्टरचा मुलगा डाॅक्टर आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होणार हे ग्रृहित धरलं जातं, तसं तेदेखील कुटुंबाच्या व्यवसायात उतरणार हे साहजिकच होतं. पण झालं उलटच. त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि टीआयएस इंटरनॅशनल नावाच्या स्टार्टअप बीपीओमध्ये ज्युनियर प्रोग्रामर म्हणून नोकरी स्वीकारली.

आज ते बेनेट कोलमन ॲंड कंपनी लिमिटेड, वाय काॅंबिनेटर आणि सिक्वोया कॅपिटल इंडियाच्या मॅनेजमेंट बोर्डचे सल्लागार आहेत आणि २०१५-१७ पर्यंत इंटरनेट ॲंड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. ते एक सक्रिय गुंतवणूकदारदेखील आहेत आणि त्यांनी अनॲकॅडमी, रेझर-पे, गो-जेक आणि झिलिंगो यासारख्या आशियातील अनेक लोकप्रिय स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली आहे.

त्यांचं नाव कुणाल शहा. टीआयएस इंटरनॅशनलमध्ये असताना त्यांनी ‘पैसाबॅक’ हे वेब पोर्टल तयार केले जे भारतातील ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांशी टायअप करून रिटेल कॅशबॅकचे व्यवस्थापन करते. ‘पैसाबॅक’ त्यांच्या ग्राहकांना सर्वाधिक कॅशबॅक मिळवून देण्यासाठी ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा अनेक ब्रॅण्ड्ससोबत टायअप करत असत आणि त्या बदल्यात या ब्रॅण्ड्सना त्यांच्या वेबसाइटद्वारे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळत असे.

जानेवारी २०११ च्या ‘आउटलूक बिझनेस’ मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो

नंतर त्यांनी संदीप टंडन यांच्यासोबत ऑगस्ट २०१० मध्ये ‘फ्रीचार्ज’ची स्थापना केली. २०१५ मध्ये स्नॅपडीलने फ्रीचार्ज विकत घेतले, तरीही तो प्लॅटफॉर्म त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत आहे. जुलै २०१७ मध्ये ॲक्सिस बँकेने फ्रीचार्ज विकत घेतले. २०१८ मध्ये कुणाल शहा यांनी ‘क्रेड’ची स्थापना केली. ‘क्रेड’ ही एक भारतीय फिनटेक कंपनी आहे. ‘क्रेड’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिवॉर्ड-आधारित क्रेडिट कार्ड पेमेंट.

कंपनीने अवघ्या सहा आठवड्यात सिक्वोया इंडिया आणि इतर गुंतवणूकदारांकडून १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका निधी उभारला. तेव्हापासून दोन वर्षांत ‘क्रेड’ची झपाट्याने वाढ झाली आहे. हा स्टार्टअप आता ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त मुल्यांकनासह भारतातील सर्वात चांगल्या फिनटेक स्टार्टअपपैकी एक आहे. कंपनीचे दोन दशलक्ष वापरकर्ते आहेत.

या स्टार्टअपचे यश ग्राहकांच्या अनुभवामध्ये सामावलेले आहे. कंपनीने एक मोबाइल ॲप तयार केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरचा मागोवा घेणे, त्यांची बिले वेळेवर भरणे आणि कर्जासाठी अर्ज करणे सोपे करते. ‘क्रेड’ ॲप नियमितपणे वापरणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे आणि सवलतदेखील देते.

या युनिकॉर्न स्टार्टअपची सुरुवात फक्त क्रेडिट कार्ड पेमेंट सेवेने झाली होती, पण आज ती वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रात आपली प्रगती करत आहे. ‘क्रेड’चे ॲप सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट एकाच ठिकाणी व्यवस्थापित करते, क्रेडिट कार्डचा पेमेंट तपशील आणि त्याच्या देय तारखांसंबंधी नियमित सूचना देते, शिवाय नवीन वापरकर्त्यांना ओला, झोमॅटो, क्लिअर ट्रिप अशा अनेक ब्रॅण्ड्सकडून कॅशबॅक आणि रिवॉर्ड ऑफर्स मिळवून देते.

‘क्रेड’ ॲपचे बरेच फायदे आहेत, पण त्यासाठी वापरकर्त्यांना मासिक सदस्यता शुल्क भरावे लागते. त्या बदल्यात त्यांना ‘क्रेड’च्या भागीदार ब्रॅण्डकडून डील आणि ऑफर्सचा लाभ होतो. क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी ब्रॅण्डकडून कमिशन आकारून कंपनी पैसे कमवते. आतापर्यंत त्यांची सदस्य संख्या एक दशलक्षाहून अधिक आहे आणि दरमहा त्यात ३० टक्के इतकी वाढ होत आहे.

भारतातील लोकांसाठी क्रेडिट अधिक सुलभ आणि परवडणारे बनवण्याच्या दृष्टिकोनातून कंपनी सुरू करण्यात आली होती. हे साध्य करण्यासाठी त्यांनी एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यामुळे ते पारंपारिक कर्जदात्यांपेक्षा कमी व्याजदरावर कर्ज देऊ शकतात. पहिल्या दोन वर्षांत तोटा होऊनही कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना मौल्यवान सेवा प्रदान करणे सुरू ठेवले आहे.

सध्या ‘क्रेड’ची पाच उत्पादने आहेत; क्रेड रेंट पे, क्रेड कॅश, क्रेड पे, क्रेड स्टोअर आणि क्रेड ट्रॅव्हल स्टोअर. २०२१ पासून ‘क्रेड’ने पर्सनल लोन द्यायलादेखील सुरुवात केली आहे. कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवले आहे आणि त्यातून काही महसूल मिळवण्यास सुरुवात केली आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षांसाठी क्रेड इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रायोजक बनले.

आपल्या यशाच्या गुरुकिल्लीबद्दल विचारले असता कुणाल शहा म्हणतात,

“एक उत्कृष्ट उत्पादन तयार करणे आणि अत्युत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यावर आमचा भर होता, ज्यामुळे आम्हाला स्पर्धेत आघाडीवर राहणे शक्य झाले. आम्हाला काय साध्य करायचे आहे हेदेखील आम्हाला पक्कं माहीत होतं आणि ते शक्य व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले.

यशस्वी होण्यासाठी मजबूत टीम असणे गरजेचे असते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की माझी टीम प्रतिभावान आहे. ‘क्रेड’ला यशस्वी करण्यासाठी मी जितका वचनबद्ध आहे, तितकीच माझी टीम वचनपूर्ती करण्यासाठी उत्सुक आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते.”

– चंद्रशेखर मराठे

The post पैसाबॅक, फ्रीचार्जसारख्या स्टार्टअप्सच्या यशातून कुणाल शहा यांनी सुरू केले ‘क्रेड’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment