प्रत्येक गल्लीबोळाची गरज आहे मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय

मोबाइल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर्स बदलत आहेत. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईलधारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन, जोडणी, वितरण, विक्रीपश्‍चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे व अव्याहत सुरू राहणारे क्षेत्र आहे म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सध्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे.

मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने, सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.

आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे. देशातील मोबाईलधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच स्मार्टफोनने संगणकाची जागा घेतली आहे. संगणकावर करता येणारी बरीचशी कामे आपण स्मार्टफोनवर करू शकतो. मोबाईल क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी आज उपलब्ध झाल्या आहेत.

कुठलेही यंत्र असो त्यामध्ये ठराविक कालावधीनंतर त्यामध्ये बारीकसारीक तक्रारी सुरू होतात. मोबाईल फोनही याला अपवाद नाही म्हणून आज मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण गरजेचे आहे. आजूबाजूला नजर टाकली असता आज जितक्या प्रमाणात मोबाईलधारकांच्या संख्येत वाढ होत आहे तितक्या प्रमाणात मोबाईल दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ मात्र दिसत नाही. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायाला मोठी मागणी आहे.

मोबाईलची माहिती व या यंत्रणेला समजून घेण्याची आवड असेल तर या अभ्यासक्रमात एक संधी दडलेली आहे. मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या नावाने अल्प मुदतीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात टच स्क्रीन, बॅटरी देखभाल, की-पॅड दुरुस्ती, स्पीकर, माईक दुरुस्ती, सॉफ्टवेअर तसेच गेम लोडिंग कसे करायचे हे शिकवले जाते.

मोबाईल वापरत असताना भेडसावणार्‍या समस्या जसे की चार्जिंग, अनलॉकिंग, डिस्प्ले, बॅटरी, की-पॅड, पॉवर ऑन-ऑफ, मोबाईलचे नादुरुस्त भाग बदलणे, दुरुस्ती करणे, असेम्ब्ली, डीअसेम्बली यांसारख्या विविध समस्यांचे प्रशिक्षण दिले जाते. मोबाईल दुकानात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत अनेकांनी हे मोबाईल दुरुस्तीचे ज्ञान आत्मसात केले आहे.

थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत हे ज्ञान एकाकडून दुसर्‍याकडे जात आहे. कौशल्य असलेल्या या व्यवसायात चांगली कमाई मिळत असल्याने अनेक युवक याकडे वळत आहेत.

मोबाईल रिपेअरिंग हा कोर्स केल्यानंतर युवकांना अनेक मोबाईल कंपन्याच्या सर्विस सेंटरवर तंत्रज्ञ म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे. यात पगार प्रतिमाह दहा ते पंचवीस हजार मिळू शकतो. युवक स्वतःचा व्यवसायदेखील करू शकतो. या व्यवसायात मोबाईल दुरुस्ती बरोबरच मोबाईलची विविध अ‍ॅक्सेसरीजचीदेखील विक्री करता येते.

स्वत:चे दुकान असल्यास या व्यवसायातून दरमहा पन्नास हजारांपर्यंत कमवू शकतो. आज गावोगावी अन गल्लोगल्ली मोबाईल रिपेअरिंगची दुकानं सुरू झालेली आपण पाहतो, असं असताना या संधीचं सोनं करायलाच हवं. या व्यवसायात उत्पन्नाचे स्रोत अमर्याद आहेत. फक्त गरज आहे ती उत्तम आणि प्रामाणिक सेवा देण्याची.

– मधुकर घायदार
9623237135
(लेखक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे शिल्पनिदेशक आहेत.)

The post प्रत्येक गल्लीबोळाची गरज आहे मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment