फुड डिलिव्हरीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर मुसंडी मारणारी कंपनी

जेव्हा एखादं नवीन उत्पादन किंवा सेवा बाजारात येते आणि चांगला व्यवसाय करू लागते, तेव्हा तशाच प्रकारची आणखी काही उत्पादनं किंवा सेवा बाजारात यायला सुरुवात होते. यामुळे स्पर्धा तर वाढतेच आणि धंदादेखील विभागला जातो. आता हेच बघा ना, फुड डिलिव्हरीच्या व्यवसायात मुळातच झोमॅटो, फुडपांडा, टाइनी आउल, जी नंतर बंद झाली, असे काही नामवंत आणि काही छोट्या डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या होत्या.

फुड डिलिव्हरीचा व्यवसाय आधी वाटला तितका फायदेशीर नाही, असं लक्षात आलं होतं. अर्थात या व्यवसायात त्या काळात विस्कळितपणा होता हेदेखील तितकंच खरं. तरीही अशा वेळी एखाद्या नवीन फुड डिलिव्हरी कंपनीने मार्केटमध्ये यायचं म्हणजे धाडसाचं काम. हे धाडस दाखवलं बंगळुरूमधील एका कंपनीने. ते नाव बहुतेक जणांना माहीत असेल; अगदी जे हाॅटेलमधून जेवण मागवत नसतील त्यांनादेखील.

ती नवीन फुड डिलिव्हरी कंपनी आहे स्विगी. त्या वेळी झोमॅटो, फुडपांडा, टायनी आउल या कंपन्या हाॅटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी फक्त ऑर्डर्स घेत होत्या; डिलिव्हरीचं काम मात्र हाॅटेल्स आणि रेस्टॉरंट्स स्वतः करत. इथेच स्विगी आणि इतर फुड डिलिव्हरी कंपन्यांमधील फरक दिसून आला. डिलिव्हरी करणारी आपली स्वतःची माणसं नसल्यामुळे त्यांच्या व्हॅल्यू चेनवर परिणाम झाला.

व्हॅल्यू चेन म्हणजे ऑर्डर दिल्यापासून ग्राहक संतुष्ट होईपर्यंतची साखळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधिलकी आणि जबाबदारीचा अभाव. फ्लिपकार्टसारख्या ई-काॅमर्स कंपनीनेदेखील ही चूक केली होती, पण नंतर सुधारून घेतली.

इथेच ‘स्विगी’ने इतरांवर आघाडी घेतली. स्विगीने सुरुवातीपासूनच आपले लाॅजिस्टिक्स फूल प्रूफ ठेवले आणि या एकाच कारणामुळे ती फुड डिलिव्हरी क्षेत्रातील सर्वात जास्त यशस्वी कंपनी बनली.

‘स्विगी’चे संस्थापक

‘स्विगी’ हा ऑनलाइन फुड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे, जी बंगळुरू इथे जुलै २०१४ मध्ये स्थापन झाली आणि सप्टेंबर २०२१ पर्यंत ५०० भारतीय शहरांमध्ये कार्यरत आहे. खाद्यपदार्थ वितरणाव्यतिरिक्त ‘इंस्टामार्ट’ या नावाने मागणीनुसार किराणा वितरण आणि ‘स्विगी जिनी’ नावाची त्वरित पॅकेज वितरण सेवादेखील उपलब्ध आहे.

२०१३ मध्ये श्रीहर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी या दोन संस्थापकांनी कुरिअर सेवा आणि शिपिंग सुलभ करण्यासाठी ‘बंडल’ नावाचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थापन केली. काही काळानंतर मात्र त्यांनी फुड डिलिव्हरी मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फुडपांडा, टायनी आउल आणि ओला कॅफे यासारख्या अनेक उल्लेखनीय फुड डिलिव्हरी स्टार्टअप्स असूनही या क्षेत्रात गोंधळाचे वातावरण होते.

मजेटी आणि रेड्डी यांनी राहुल जेमिनी यांच्याशी संपर्क साधला, जो पूर्वी मायंत्रा या ऑनलाईन फॅशन स्टोअरमध्ये होता. नंतर कंपनीने स्वत:चे एक खास वितरण नेटवर्क तयार केले आणि मुख्यतः लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे कंपनीची वेगाने वाढ झाली.

२०१९ च्या सुरुवातीस स्विगीने स्विगी स्टोअर्स या नावाने सामान्य उत्पादन वितरणाला सुरुवात केली. ऑगस्ट २०२० मध्ये कंपनीने डार्क स्टोअर्सचे, म्हणजे गोडाऊन ते थेट ग्राहक हे नेटवर्क वापरून ‘इन्स्टामार्ट’ नावाची त्यांची झटपट किराणा वितरण सेवा सुरू केली. २०२१ च्या सुरुवातीस स्विगीने स्विगी स्टोअर्स बंद केले आणि इन्स्टामार्टवर अधिक लक्ष केंद्रित केले.

सप्टेंबर २०१९ मध्ये स्विगीने झटपट पिकअप आणि ड्रॉपऑफ सेवा ‘स्विगी गो’ लाँच केली. या सेवेचा वापर विविध प्रकारच्या वस्तूंसाठी, ज्यामध्ये लाँड्री आणि दस्तऐवज किंवा व्यावसायिक क्लायंट आणि रिटेल ग्राहकांना पार्सल वितरणासाठी केला जातो. एप्रिल २०२० मध्ये ‘स्विगी गो’चे ‘स्विगी जिनी’ असे री-ब्रॅण्डिंग करण्यात आले.

२०२१ मध्ये कंपनीने घोषणा केली की ती तिच्या वितरण भागीदारांसाठी लसीकरणाचा खर्च करेल. मार्च २०२१ मध्ये ‘स्विगी’ने चेन्नई, तमिळनाडूमध्ये हेल्थ हब स्थापन केले. एप्रिल २०२२ मध्ये ‘स्विगी’ने नवीन ‘प्रोत्साहन कार्यक्रम’ लाँच केला जो त्यांच्या चांगल्या प्रकारे शिक्षित असलेल्या डिलिव्हरी बॉईजना मॅनेजर बनण्याची संधी देतो.

२०१५ मध्ये कंपनीने भारताच्या बाहेरून गुंतवणूक आकर्षित करण्यास सुरुवात केली. नॉर्वेस्ट व्हेंचर पार्टनर्स आणि ॲक्सेल ॲंड सैफ पार्टनर्सकडून २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक उपलब्ध केली. पुढच्या वर्षी ‘स्विगी’ने बेस्सेमर व्हेंचर पार्टनर्स आणि हार्मनी पार्टनरसोबत नवीन आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा केले.

२०१७ मध्ये नॅस्पर्सने ‘स्विगी’मध्ये ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवले. ‘स्विगी’ला २०१८ मध्ये मिटुआन-डियानपिंग आणि नॅस्पर्सकडून १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले आणि या गुंतवणुकीमुळे कंपनीचे मूल्य १ बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त झाले.

‘स्विगी’ने २०१७ मध्ये बंगळुरूमधील एशियन फुड स्टार्टअप ४८ ईस्ट ही कंपनी आणि सप्टेंबर २०१८ मध्ये मुंबईमधील दूध वितरण स्टार्टअप सुपरडेली रोख व्यवहारात विकत घेतली. फेब्रुवारी २०१९ मध्ये आपले तंत्रज्ञान क्षेत्रामधील कौशल्य वाढवण्यासाठी ‘स्विगी’ने ‘एआय’ म्हणजे कृत्रिम तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप किंट.

आयओ विकत घेतले आणि त्याच वर्षी मुंबईमधील रेडी-टू-इट फुड ब्रॅण्ड फिंगरलिक्समध्ये रु. ३१ कोटी गुंतवणूक केली. तसेच फॅल्कन एज कॅपिटल, गोल्डमन सॅश, थिंक कॅपिटल, आमान्सा कॅपिटल, कार्मिनॅक आणि विद्यमान गुंतवणूकदार प्रोसस व्हेंचर्स तसेच ॲक्सेसकडून सुमारे ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक उभारली.

आज ‘स्विगी’ फूड डिलिव्हरी, किराणा वितरण, पॅकेज वितरण सेवा तसेच पिकअप आणि ड्रॉपऑफ सेवा अशा अनेक क्षेत्रात चौफेर कामगिरी करत आहे.

– चंद्रशेखर मराठे

The post फुड डिलिव्हरीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर मुसंडी मारणारी कंपनी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment