भारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन

आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध प्रणालींमध्ये वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय एकत्र आले आहेत. त्यांनी पर्यटन विकास महामंडळासोबत (आयटीडीसी) याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

या सामंजस्य करारानुसार, पर्यटन विकास महामंडळाच्या (आयटीडीसी) अधिकाऱ्यांना आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध प्रणालींमधील वैद्यकीय मूल्य पर्यटनाविषयी जागरूक करण्यासाठी आयुष मंत्रालय प्रशिक्षण देईल. या माध्यमातून पर्यटन सर्किट निश्चित केले जाईल.

यामध्ये आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषधप्रणालींमध्ये वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यटन विकास महामंडळाला वेळोवेळी सर्व तांत्रिक माहिती प्रदान करण्यासाठी मोठा वाव मिळेल.

आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार, पर्यटन विकास महामंडळ “ज्ञान पर्यटन” अंतर्गत पर्यटन स्थळांमध्ये भारतीय वैद्यकपद्धतीच्या ऐतिहासिक वारसास्थळांचा समावेश करेल आणि पर्यटकांसाठी उपयुक्त चित्रपट / साहित्य विकसित करू शकेल.

आयुष्य मंत्रालय पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्समध्ये आयुर्वेद आणि योग केंद्राच्या स्थापनेच्या शक्यता आजमावेल आणि सहकार्याने जागरूकता कार्यशाळा आयोजित करेल.

आयुष मंत्रालय आणि पर्यटन विकास महामंडळाच्या प्रतिनिधी सहअध्यक्ष असलेल्या संयुक्त कार्य गटाच्या माध्यमातून (जेडब्ल्यूजी ) सामंजस्य कराराची अंमलबजावणी आणि प्रगतीवर लक्ष ठेवले जाईल. वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रचार करण्यासाठी संयुक्त कार्य गट मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड इत्यादींनी अवलंबलेल्या सर्वोत्कृष्ट पद्धतीदेखील जाणून घेईल.

तिरुवनंतपुरम येथे जी-20 समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेखालील अलीकडेच संपन्न झालेल्या पहिल्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत, केरळ जी-20 प्रतिनिधींनी भारतात वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी संधी आणि आव्हानांवर चर्चा केली.

ग्लोबल वेलनेस इन्स्टिट्यूटच्या (जीडब्ल्यूआय) ‘द ग्लोबल वेलनेस इकॉनॉमी : लुकिंग बियॉन्ड कोविड’ या अहवालानुसार अलीकडच्या वर्षांत भारतात वैद्यकीय पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक निरामयता अर्थव्यवस्था वार्षिक ९.९ टक्क्यांनी वाढेल. आयुष आधारित आरोग्यसेवा आणि निरामयता अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ७० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

The post भारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment