मराठी मातीत औद्योगिक विकासाचे रोप लावणार्‍या महान उद्योजकाची अस्सल भारतीय कंपनी

ज्या वर्षी स्वावलंबी जीवनाचा आदर्श जगापुढे ठेवणार्‍या महात्मा गांधींचा जन्म झाला, त्याच वर्षी मशीन, टुल्स उत्पादन विकासाचा पाया रचणार्‍या आणि शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी उपयुक्त लोखंडी नांगर बनवून स्वावलंबी बनवणार्‍या एका महान उद्योजकाचा जन्म झाला, हा योगायोग म्हणावा की आणखी काही.

लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर. ‘किर्लोस्कर समुहा’चे संस्थापक, ज्यांनी अस्सल मराठी मातीतील उद्योग संपूर्ण भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्‍यात नेला. खरं तर त्यांनी इतिहास घडवला होता, कारण तोपर्यंत भारतामध्ये कुणीही मशीन, टुल्स उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला नव्हता. वास्तविक लक्ष्मणराव किर्लोस्करांना चित्रकार व्हायचं होतं आणि त्यांनी प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेशदेखील घेतला होता.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी पूर्व बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या बेळगांव जिल्ह्यातील गुर्लाहोसूर या गावात झाला. लक्ष्मणरावांचे वडील काशिनाथपंत हे वेदांत-पंडित होते. त्यामुळे लक्ष्मणरावांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती, परंतु त्यांनी परंपरागत व्यवसायापासून दूर राहून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्राची निवड केली.

लक्ष्मणरावांना यांत्रिक वस्तू आणि चित्रकला या दोन गोष्टींची आवड होती. वडिलांच्या ईच्छेविरुद्ध आणि त्यांचा मोठा भाऊ रामुअण्णा किर्लोस्कर यांच्या आर्थिक पाठिंब्याने लक्ष्मणराव यांनी १८८५ मध्ये बॉम्बेतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. दुर्दैवाने ते रंगाधळे असल्याचे आढळून आल्याने त्यांना दोन वर्षांनी आपल्या आवडीला मुरड घालावी लागली.

त्यांनी चित्रकला सोडली पण संस्थेत यांत्रिक चित्रकलेचा अभ्यास सुरू ठेवला. त्यांचे हे कौशल्य पुढे कामी आले आणि त्यांना व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये (व्हिजेटीआय) मेकॅनिकल ड्रॉइंगचे सहाय्यक शिक्षक या पदावर नेमण्यात आले. पगार होता ४५ रुपये.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर

व्हिजेटीआयमध्ये लक्ष्मणरावांना अमेरिकन मशीनिस्ट, सायंटिफिक अमेरिकन आणि फाउंड्री अशी यंत्रांना समर्पित प्रसिद्ध मासिकं वाचण्याची सवय लागली. ते संस्थेच्या कार्यशाळेत विविध मशीन्स स्थापित करणे, ऑपरेट करणे, दुरुस्ती करणे, विघटन करणे आणि पुन्हा एकत्र करणे इत्यादी आवश्यक कामं शिकले. ते स्वत:ला ‘घिसाडी’ किंवा लोहार असे म्हणत आणि असं म्हणवून घेण्यात त्यांना समाधान वाटत असे.

लवकरच त्यांना प्रा. किर्लोस्कर असे संबोधण्यात येऊ लागले आणि व्हिजेटीआयमधील प्राचार्य फिथियन यांनी त्यांना ‘स्टीम’ शिकवण्यासाठी नियुक्त केले. स्टीम म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग आणि गणित यांची सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम, जो कदाचित आजच्या आयसीटीच्या समतुल्य आहे.

१८९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात लक्ष्मणरावांनी सायकलची डीलरशिप सुरू केली. ते मुंबईत सायकली विकत घेत असत आणि बेळगावमध्ये त्यांचे भाऊ रामुअण्णा यांच्याकडे पाठवत. मग ते त्या विकत. रामुअण्णा एक सायकल सातशे ते हजार रुपयांना विकत, शिवाय सायकल कशी चालवायची हे शिकवण्यासाठी वेगळे पंधरा रुपये घेत.

बेळगाव येथे एक लहान सायकल दुरुस्तीचे दुकान हा त्यांचा पहिला उपक्रम होता. आज जसं लोक स्वत:ची कार घ्यायचं स्वप्न बघतात, तसं त्या काळात स्वत:ची सायकल असावी असं वाटत असे. ज्या रस्त्यावर त्यांनी सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले, त्या रस्त्याचे नामकरण आज किर्लोस्कर रोड असे आहे. चांगल्या प्रकारे शेती करण्यासाठी शेतीची उपयुक्त अवजारे वापरायला हवीत यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी लोखंडी नांगरांची निर्मिती केली. किर्लोस्करांचं हे पहिलं उत्पादन होतं.

त्यांनी पूर्वीच्या औरंगाबाद राज्यात चॅफ कटर आणि लोखंडी नांगराच्या निर्मितीसाठी एक छोटेसे युनिट स्थापन केले. चॅफ कटर हे एक यांत्रिक उपकरण आहे ज्यामध्ये पेंढा किंवा गवत इतर चार्‍यामध्ये मिसळण्यापूर्वी त्याचे अगदी बारीक तुकडे केले जातात आणि मग गुरांना खायला दिले जाते. हे प्राण्यांच्या पचनास मदत करते आणि प्राण्यांना त्यांच्या अन्नाचा कोणताही भाग नाकारण्यापासून प्रतिबंधित करते.

त्या काळात शेतकर्‍यांमध्ये असा गैरसमज होता, की लोखंडी नांगराने जमीन नांगरायची किंवा तिच्यावर आघात करायचा हे अयोग्य आहे, कारण जमीन म्हणजे आपली आईच. त्यामुळे तिच्यावर लोखंडी नांगर चालवायचा म्हणजे एक प्रकारचं पाप. त्यामुळे सुरुवातीच्या काळातकिर्लोस्करांना शेतकर्‍यांच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. अंधश्रद्धाळू शेतकर्‍यांना पटवणे फार कठीण होते आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना त्यांचा पहिला लोखंडी नांगर विकायला तब्बल दोन वर्षे लागली.

लक्ष्मणराव किर्लोस्करांना त्यांच्या कारखान्यासाठी योग्य जागा हवी होती, पण ती मिळू शकली नाही. नंतर मात्र औंधच्या शासकाकडून मदत मिळाली ज्याने त्यांना जागा दिली आणि सतरा हजार रुपयांच्या कर्जाची व्यवस्थादेखील केली. १९१० मध्ये लक्ष्मणरावांनी कुंडल रोड नावाच्या प्रसिद्ध रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या रखरखीत पडीक जमिनीत आपला कारखाना सुरू केला. आतां हा कारखाना प्रसिद्ध किर्लोस्कर इंडस्ट्रीज म्हणून ओळखला जातो आणि कुंडल रोड हे स्टेशन किर्लोस्करवाडी म्हणून ओळखले जाते.

लक्ष्मणराव किर्लोस्कर हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते थोर समाजसुधारकही होते. जेव्हा ग्रामीण भागातील लोक रूढी आणि वाईट चालीरिती पाळत होते, तेव्हा त्यांनी अस्पृश्यता दूर करण्याचा पुरस्कार केला. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी स्थापन केलेल्या वस्तीत अस्पृश्यता बंदी केली. त्यांचा समाजसुधारणेवर आणि माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता. कायद्याने गुन्हेगार ठरवलेल्या आणि शिक्षा भोगून तुरूंगातून सुटका झालेल्यांना समाजात मान मिळत नाही, नोकरी तर नाहीच नाही, पण लक्ष्मणरावांनी मात्र अशा माजी गुन्हेगारांना नाईट वॉचमन म्हणून कामावर ठेवले.

१८९७ मध्ये लक्ष्मणरावांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण वळण आलं ज्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. व्हिजेटीआयमध्ये त्यांच्याऐवजी एका अँग्लो-इंडियन माणसाला पदोन्नतीसाठी निवडण्यात आले. लक्ष्मणरावांनी व्हिजेटीआय सोडले आणि बेळगावात सायकलच्या दुकानात भावाकडे रुजू झाले. लवकरच या दोघांनी शहरातील आणि आजूबाजूच्या श्रीमंत लोकांच्या आवडीची एक चैनीची वस्तू शोधली.

विंडमिल किंवा पवनचक्की. त्यांनी यूएसएच्या सॅमसन विंडमिलकडून डीलरशिप मिळवली आणि जोरदार विक्री मोहीम सुरू केली. त्यांनी एका वर्षात इतक्या पवनचक्क्या विकल्या की सॅमसन कंपनीने लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांचे भाऊ रामुअण्णा यांना एक पवनचक्की मोफत दिली. कोणत्याही चैनीच्या वस्तूंचे कमी प्रमाणात ग्राहक असतात; इथेदेखील तेच झालं, त्यांच्याकडून पवनचक्की विकत घेणारे ग्राहक लवकरच संपले.

किर्लोस्कर बंधू

१९०१ मध्ये त्यांना औंधच्या एका छोट्या संस्थानाच्या राजांनी असेंब्ली हॉल बांधण्याचे कंत्राट दिले होते, परंतु काही दिवसांतच दुर्दैवाने राजे मरण पावले आणि वारसाहक्कासाठी वाद निर्माण झाले. लक्ष्मणरावांचे काम ठप्प झाले आणि त्यांची गुंतवणूक अडकून पडली. त्यांना पुन्हा बेळगावला परतावे लागले. हा धक्का लक्ष्मणरावांना बरंच काही शिकवून गेला आणि स्थिर उत्पन्नासाठी काय करता येईल याचा ते विचार करू लागले. त्यांनी स्वत:ची उत्पादने बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांना शेतकर्‍यांसाठी अशी उत्पादनं बनवायची होती, ज्यांना मोठी बाजारपेठ लाभेल.

किर्लोस्कर बंधूंनी तीन अमेरिकन नियतकालिकांचे सदस्यत्व घेतले होते आणि रामुअण्णा त्या नियतकालिकांना काळजीपूर्वक फाईल आणि अनुक्रमित करत असत. त्यांना अमेरिकेतून मेल-ऑर्डर कॅटलॉगदेखील प्राप्त झाले. एका कॅटलॉगमध्ये कटर म्हणजेच चारा कापणार्‍या यंत्राचे चित्र पाहून लक्ष्मणरावांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

यंत्राच्या वर्णनात असे म्हटले होते की तो कटर दांडे आणि मुळांसकट चार्‍याचे बारीक तुकडे करेल, जे खाण्यासाठी गुरे सहसा अळमटळम करतात. त्यांनी एक यंत्र ऑर्डर केले आणि त्याची आपल्या कारखान्यात चाचणी घेतली. ते यंत्र चांगले काम करत असल्याचे पाहून लक्ष्मणरावांनी तसेच यंत्र बनवायचे ठरवले.

त्यांच्या कारखान्याला लागूनच त्यांनी एक छोटीशी झोपडी बांधली. काही साधने आणि उपकरणे खरेदी केली आणि तिथे चारा-कटर बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुंबईहून कास्टिंग विकत घेतली. स्थानिक भाषेत त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. १९०१ मध्ये हे पहिले किर्लोस्कर उत्पादन होते. विक्री वाढल्याने लक्ष्मणरावांनी २.५ एचपीचे एक इंजिन, एक लहान लेथ मशीन, एक ड्रिलिंग मशीन आणि एक लहान एमरी ग्राइंडर खरेदी केले, जे सर्व त्यांनी झोपडीत बसवले.

त्यांनी युरोप आणि अमेरिकेतील औद्योगिक वसाहतींबद्दल वाचले होते, जिथे उद्योगांच्या मालकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी सामुदायिक घरे बांधली होती. आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्वत:चा उद्योग आणि घरांची वसाहत उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते; हे स्वप्न त्यांनी किर्लोस्करवाडी येथे साकारले, जिथे त्यांनी १९१० मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड हा कारखाना सुरू केला.

केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने २० जून १९६९ रोजी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट जारी केले आणि मराठी मातीत औद्योगिक विकासाचे रोप रूजवल्याबद्दल या महान उद्योजकाला मानवंदना दिली.

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा वारसा पुढे चालवतकिर्लोस्करांच्या मुलांनी आणि आता तिसर्‍या पिढीने कंपनीचा जगभर विस्तार केला आहे. किर्लोस्कर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, किर्लोस्कर डीएमसीसी, किर्लोस्कर अमेरिका कॉर्पोरेशन, किर्लोस्कर एबारा पंप्स लिमिटेड, किर्लोस्कर कोरोकोट प्रायव्हेट लिमिटेड, कराड प्रोजेक्ट्स अ‍ॅण्ड मोटर्स लिमिटेड, कोल्हापूर स्टील लिमिटेड, एसपीपी पंप यूके अशा काही कंपन्या किर्लोस्कर कुटुंबीय चालवत आहेत.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीने २००७ मध्ये जगातील सर्वात मोठा नर्मदा सिंचन प्रकल्प साकार केला. हा गुजरात सरकारच्या वतीने राबवण्यात आलेला प्रकल्प होता.
किर्लोस्कर ब्रदर्सचा भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी जवळचा संबंध आहे आणि त्यांनी भारतीय अणुऊर्जा प्रकल्पात तैनात असलेले जड पाणी किंवा हार्ड वॉटर उपसण्यासाठी कॅनबंद मोटर पंप बनवले आहेत.
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही पहिली भारतीय कंपनी आहे जिने तिच्या वॉल्व्हसाठी फॅक्टरी म्युच्युअल सर्टिफिकेशन मिळवले आहे

किर्लोस्कर ब्रदर्सची ऐंशीपेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थिती आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे आणि १८८० च्या उत्तरार्धात भारतीय ब्रॅण्ड अंतर्गत उत्पादने विकणारी भारतातील पहिली अभियांत्रिकी कंपनी होती.
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला २०१२ मध्ये ASME N-STAMP मानांकन प्राप्त झाले आणि हे प्राप्त करणारी ती पहिली भारतीय कंपनी आहे.

 

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही भारतातील तमिळनाडू राज्याचे दुसरे सर्वात मोठे महानगर असलेले कोईम्बतूर येथे सर्व महिलांनी चालवल्या जाणार्‍या आणि व्यवस्थापित उत्पादन प्रकल्प असलेल्या पहिल्या पंप कंपन्यांपैकी एक आहे.
२०१८ च्या जुलै महिन्यात पाण्याने भरलेल्या गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाला वाचवण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने थाई सरकारला बचाव कार्यात मदत केली. अत्यंत शक्तिशाली पंपाने गुहेतील पाणी बाहेर खेचून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यत आले.

– चंद्रशेखर मराठे

The post मराठी मातीत औद्योगिक विकासाचे रोप लावणार्‍या महान उद्योजकाची अस्सल भारतीय कंपनी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment