महाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स ही ‘पीएनजी’ या टोपणनावाने ओळखली जाणारी एक भारतीय ज्वेलरी कंपनी आहे, जी गणेश गाडगीळ यांनी १८३२ मध्ये स्थापन केली. २०१२ मध्ये कायदेशीररित्या विभक्त होईपर्यंत पीएनजी ही सांगली येथे पी.एन. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स आणि पुणे येथे पी.एन. गाडगीळ अ‍ॅण्ड कंपनी या दोन शाखांमध्ये कार्यरत होती.

कंपनीची स्थापना ‘गाडगीळ ज्वेलर्स’ या नावाने सांगली येथे २९ नोव्हेंबर १८३२ रोजी गणेश गाडगीळ यांनी केली. अनंत गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी सांगली येथे डोंगरे-कोंढे येथील गाडगीळ घराण्याचे गणेश आणि यशोदा गाडगीळ यांच्या पोटी झाला.

गाडगीळ यांना दोन बहिणी होत्या. त्यांनी ताराबाई अभ्यंकर यांच्याशी विवाह केला आणि या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा झाला. ते गणेश गाडगीळ यांचे पणतू आणि पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांचे पुतणे होते.

अनंत गाडगीळ यांनी १९३८ मध्ये सांगली येथील पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स स्टोअरमध्ये ज्वेलर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि १९५८ मध्ये कौटुंबिक व्यवसायाची शाखा स्थापन करण्यासाठी ते लक्ष्मी रोड, पुणे येथे गेले. त्यांच्या समकालीन लोकांकडून आणि प्रमुख वर्तमानपत्रांनी त्यांच्या व्यावसायिक बुद्धी आणि परोपकारी कार्यासाठी त्यांचे कौतुक केले.

त्यांच्या व्यावसायिक बुद्धीचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे १९६८ च्या गोल्ड अ‍ॅक्टद्वारे त्यांनी आपला व्यवसाय टिकवून ठेवला. १९९३ मध्ये लातूर भूकंपातील पीडितांसाठी निधी उभारणी करून त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. त्यांना प्रेमाने दाजीकाका गाडगीळ म्हणत असत.

दाजीकाका गाडगीळ यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. पुणे महानगरपालिकेने अनेक प्रसंगी त्यांचे कौतुक केले. त्यांनी रोटरी क्लब ऑफ पुणेकडून रोटरी उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त केला आणि वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने त्यांना मानद फेलोशिप दिली. २००७ मध्ये त्यांनी थिंक प्युअर नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले.

२००९ मध्ये त्यांनी गंगा नदीवर मराठीत गंगा नावाच्या पुस्तकाचे सहलेखन केले. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांच्या नावाने दाजीकाका करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत देण्यात येऊ लागला. दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ रोजी पुण्यात वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले.

दुकानाअभावी हा व्यवसाय सुरुवातीला शहरातील गजबजलेल्या रस्त्याच्या फुटपाथवर चालवला जात होता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोन्यासारखा मौल्यवान व्यवसाय, तोदेखील चक्क रस्त्यावर, म्हणजे त्या काळातील लोकं किती सत्शिल असतील याची कल्पना येते. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी कंपनीचे नाव गाडगीळ ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स असे ठेवले.

गणेश गाडगीळ यांनी १८६० मध्ये सांगली येथे विकत घेतलेल्या वाड्यात व्यवसाय हलवला. गाडगीळ यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबाने पूर्वी सांगली संस्थानातील कोल्हटकर आणि मोडक घराण्यांमध्ये सावकार म्हणून काम केले होते. त्यामुळे पटवर्धनांच्या राजेशाही ज्वेलरचा सन्मान आणि त्याला साजेसे कार्यालय त्यांना देण्यात आले.

गाडगीळ यांना त्यांच्या तिन्ही मुलांनी व्यवसायात यशस्वी व्हावे असे वाटले आणि ते साहजिकच होते. परंतु त्यांचा मोठा मुलगा रामचंद्र याने दुधाचा व्यवसाय केला आणि धाकटा मुलगा गोपाळ वकील झाला आणि संसाराला हातभार म्हणून त्याने कपड्यांचे दुकान सुरू केले.

त्यांचा मधला मुलगा नारायण आणि त्याच्या मुलांनी हा व्यवसाय सुरू ठेवला. १८७४ मध्ये त्यांचा मोठा नातू पुरुषोत्तम याच्या जन्मानंतर गाडगीळ यांनी कंपनीचे नाव बदलून पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स असे ठेवले. त्यांच्या नातवाचे नाव व्यवसायात बरकत आणेल असा त्यांना विश्वास होता.

१८९० मध्ये गाडगीळ यांच्या निधनानंतर कंपनीचा कारभार त्यांचा मुलगा नारायण गाडगीळ आणि त्यांच्या तीन मुलांनी सांभाळला. १९२० मध्ये नारायण गाडगीळ यांच्या निधनानंतर, कंपनी पुरुषोत्तम आणि त्यांचे धाकटे भाऊ गणेश गाडगीळ द्वितीय, आणि वासुदेव गाडगीळ यांनी चालवली. १९५४ मध्ये पुरुषोत्तम यांच्या मृत्यूनंतर, कंपनीचे व्यवस्थापन त्यांच्या लहान भावांना आणि त्यांच्या मुलांना वारसाहक्काने मिळाले.

१९५८ मध्ये गणेश गाडगीळ द्वितीय यांचे धाकटे पुत्र अनंत दाजीकाका गाडगीळ आणि वासुदेव गाडगीळ यांचे पुत्र विश्वनाथ गाडगीळ यांनी पुण्यात पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स अ‍ॅण्ड कंपनी या नावाने कंपनीची शाखा सुरू केली.

१९५८ नंतर कंपनीच्या दोन शाखा एकाच ब्रॅण्डखाली कार्यरत राहिल्या. दाजीकाका गाडगीळ, विश्वनाथ गाडगीळ आणि लक्ष्मण गाडगीळ यांनी पुण्यातील व्यवसाय सांभाळला आणि वासुदेव यांचा मुलगा हरी आणि शंकर सांगलीत कंपनी सांभाळत होते. १९६५ मध्ये वासुदेव गाडगीळ यांच्या निधनानंतर कंपनीच्या सांगली शाखेचा वारसा त्यांचा मुलगा हरी आणि गणेश यांचा मुलगा शंकर आणि त्यांचे पुत्र यशवंत यांच्याकडे त्यांचा मृत्यू होईपर्यंत होता.

आता सांगली शाखा हरीची मुले धनंजय आणि गणेश आणि त्यांचा नातू सिद्धार्थ आणि आकार यांचे पुत्र प्रकाश आणि नातू मिलिंद, राजू आणि समीर सांभाळत आहेत. २०१२ मध्ये दोन शाखा औपचारिकपणे विभक्त झाल्या; पुणे शाखा पी. एन. गाडगीळ अ‍ॅण्ड कंपनी आणि सांगली शाखा पी. एन. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स म्हणून कार्यरत राहिली. दाजीकाका गाडगीळ यांचे २०१४ मध्ये निधन झाले आणि कंपनीच्या पुणे शाखेतील काही शोरूम्स त्यांचा मुलगा आणि नातवाच्या वाट्याला आली.

२०१५ पासून कंपनीच्या पुणे शाखेने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि अमेरिका, तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये फ्रँचायझिंग मॉडेलचा वापर करून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. २०१२ मध्ये पीएनजी सन्सची स्थापना करण्यात आली आणि २०२० पर्यंत चिंचवड आणि नाशिक येथे असलेल्या दोन शोरूमसह २९ पेक्षा जास्त शोरूम्स उघडण्यात आले.

सध्या पुणे येथे पीएनजी सन्स या नावाने अजित गाडगीळ २५ शोरूम्सचे व्यवस्थापन करतात. सांगली शाखेच्या महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटकमधील दहा दुकानांचे व्यवस्थापन पुरुषोत्तम नारायण गाडगीळ या नावाने केले जाते.

दाजीकाका गाडगीळ यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या एकूण प्रवासाविषयी जनसामान्यांना माहिती मिळावी, या हेतूने हडपसर, पुणे येथे २०१४ च्या उत्तरार्धात ‘दाजीकाका गाडगीळ गोल्ड म्युझियम’ पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स स्टोअरमध्ये उघडण्यात आले.

हे संग्रहालय सांगलीसारख्या एके काळच्या छोट्या नगरातील सोन्याच्या व्यापार्‍यांच्या पारंपारिक, संयुक्त कुटुंबात जन्मलेल्या मुलाच्या प्रवासाचा मागोवा घेणार्‍या एका उल्लेखनीय प्रवासाचे दर्शन घडवते.

ज्या तरुण मुलाच्या रक्तात कृष्णा नदीची पवित्रता आणि मोठेपणा आहे, ज्या नदीच्या काठावर तो जन्माला आला, तो कुटुंबाचा पालनहार बनला. ज्यांनी आपल्या कुटुंबियांना व्यावसायिक तसेच भावनिक बंधामध्ये घट्ट बांधून ठेवत उद्योजकतेमध्ये नवीन मानके स्थापित केली, त्या दाजीकाका गाडगीळ यांनी नवकल्पना, धैर्य, दूरदृष्टी आणि ग्राहकांचे समाधान यांना सर्वोच्च महत्त्व देत महाराष्ट्र व जगभरातील असंख्य लोकांचा विश्वास जिंकला.

आपल्या परिवारातील प्रतिभा आणि कौशल्याचा उपयोग करून कौटुंबिक मालकीचा व्यवसाय कशा प्रकारे विकसित केला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गोल्ड म्युझियम. प्रगतीशील वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या कोणत्याही व्यावसायिक संस्थेच्या बरोबरीने सोन्याचा व्यवसाय कसा आणता येईल हे दाजीकाका गाडगीळ यांनी सिद्ध केले.

हे संग्रहालय भारतातील सोन्याच्या खाणकाम आणि निर्यातीच्या इतिहासाला समर्पित आहे, ज्यामध्ये गाडगीळ कुटुंब आणि त्यांच्या सुवर्ण क्षेत्रातील योगदानावर भर देण्यात आला आहे. दाजीकाकांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात डिझाइन केलेल्या आणि तयार केलेल्या दागिन्यांसाठी संग्रहालयात एक प्रदर्शन विभागदेखील आहे. पहिले संग्रहालय अंदाजे ३ हजार चौरस फूट जागेत विकसित करण्यात आले आणि हीच संकल्पना देशभरातील सर्व शोरूम्समध्ये राबवण्यात येईल.

नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘पीएनजी सन्स’ ही पब्लिक लिमिटेड कंपनी बनली असून तिच्या आठ सदस्यीय संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक आहेत. २०२१ मध्ये कंपनी फॉर्च्यून ‘इंडिया ५००’ यादीत समाविष्ट झाली. भारतातील सर्वात जुन्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेली ही कंपनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत आपली वाटचाल सुरू ठेवत आहे.

– चंद्रशेखर मराठे

The post महाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment