या तीन तरुणांनी एकत्र येऊन तयार केला शेतकर्‍यांसाठी फ्लेक्सिबल आणि मुव्हेबल ‘किसान गॅस’

भारताला आपण शेतीप्रधान देश म्हणतो, पण शेतकर्‍यांचेच प्रश्न या देशात सर्वात जास्त आणि बिकट आहे. त्याचसोबत देशाची प्रगती जसजशी शहरकेंद्रित झाली, तसतसं ‘शेतकर्‍यांचं हित’ हे फक्त राजकारण्यांच्या निवडणूक घोषणेपुरतं मर्यादित झालं. अशा विषम अवस्थेतही समाजात काही मंडळी अशी असतात की जी खर्‍या अर्थाने शेती आणि शेतकरी यांचा विकास व्हावा यासाठी कटिबद्ध होतात. धनंजय अभंग, शंतनू खानवेलकर आणि रोहित हड्डा ही त्रयी अशाच प्रकारचं उदाहरण म्हणून सांगता येईल.

धनंजय मेकनिकल इंजिनीअर, शंतनू एच आर आणि जाहिरात क्षेत्रात मातब्बर तर रोहित माहिती तंत्रज्ञानात निपुण म्हणजेच या स्टार्टअप टीमचा टेकगाय. सिनेमा किंवा वेब सिरीजप्रमाणेच या तिघांच्या स्टार्टअपची म्हणजेच मक्लीनर्जी टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडफची कहाणी आहे.

धनंजय ‘फर्स्ट एनर्जी’ नावाच्या कंपनीत मोठ्या पदावर होता. ‘फर्स्ट एनर्जी’ला दुसर्‍या कंपनीने टेकओव्हर केलं तेव्हा धनंजयने कंपनी सोडली. त्यानंतर त्याने नोकरी करण्याऐवजी स्वतःचं काही सुरू करू असा विचार केला. सप्टेंबर २०१५ च्या आसपास धनंजय पाबळच्या ‘विज्ञान आश्रम’मध्ये कचर्‍यावर प्रयोग करू लागला.

लवकरच नोकरीनिमित्त परदेशात असलेला शंतनू भारतात परत आला. तोपर्यंत धनंजयचा पायलट प्रोजेक्ट तयार झालेला आणि ‘विज्ञान आश्रम’कडून त्याला यावर आधारित उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन मिळालेलं. आता तिघांनी मिळून या स्टार्टअपला पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

मार्केटिंग प्लॅन तयार झाला. पहिला ग्राहक मिळेपर्यंत सात आठ महिने गेले. मरकळचा श्रीश्री रविशंकर यांचा आश्रम हा पहिला ग्राहक म्हणून मिळाला. पहिला ग्राहक मिळाल्यावर आणि तो प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर आपण हा व्यवसाय म्हणून पुढे नेऊ शकू, याची या तिघांना खात्री पटली.

रोहित हा इंटरनेट आणि तंत्रज्ञानातला किडा असल्यामुळे त्याने प्लांटमध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली. जसे की प्लांटमधून जी स्लरी बाहेर पडते तिथे काही प्रोग्रामिंग करून अशा चिप्स बसवल्यात की स्लरीचा पी. एच. ऑटोमॅटिक मोजला जातो आणि एक मेसेज क्लाऊडला आणि एक आम्हाला कळवला जातो. त्यामुळे प्लांट बंद पडणार आहे हे दोन दिवस आधीच आम्हाला कळतं.

अशाप्रकारे या स्टार्टअपमध्ये धनंजय इंजिनीअरिंग, शंतनू मार्केटिंग आणि कम्युनिकेशन आणि रोहित तंत्रज्ञान सांभाळतात. आय.आय.एम. कोलकाताकडून या ‘क्लीनर्जी’ला इंक्युबेशन मिळाले आहे तसेच इक्विटीमध्ये गुंतवणूक मिळाली आहे. यामुळे कामाला आणखी गती मिळाली. एल.एल.पी. म्हणून सुरू केलेली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली.

यु.डी.सी.टी आणि भाभा ऑटोमिकमध्ये अनुभव असलेले डॉ. अरुण दीक्षित यांना ‘क्लीनर्जी’मध्ये मानद डायरेक्टरशीप दिली आहे. ते चौथे डायरेक्ट आहेत. या तिघांमधला समान दुवा शेती हा आहे. धनंजयची शेती आहे. त्याचे वडील कृषी विभागात नोकरी करत होते. सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती यावर वडिलांपासून त्याच्या घरात काम सुरू आहे. शंतनूचे वडील डॉक्टर त्यामुळे शुद्ध अन्न मिळावं, त्यासाठी सेंद्रिय शेती तेही पुरस्कर्ते. रोहितचं कुटुंब गावातच राहणारं. गावात किराणा व्यापारी त्यामुळे शेतीशी जोडलेलं.

हा समान दुवा पकडून शेतकर्‍यांसाठी आपण काही ठोस करावं या उद्देशाने ‘क्लीनर्जी’ने ‘किसान गॅस’ हे प्रॉडक्ट आणले. शेतकरी जे पारंपरिक बायोगॅस प्लांट बसवतात ते बांधलेले असतात किंवा नंतरच्या काळात सिंटेक्सच्या टाकीत असतात. ‘किसान गॅस’ हे पूर्णपणे फ्लेक्सिबल आणि मुव्हेबल बायोगॅस डायजेस्टर प्लांट आहे.

यातून जी स्लरी बाहेर पडते तिचे ऑटोमॅटिक द्रव आणि घन अशी विभागणी होऊन येते. यातून निघणारे द्रव हे अतिशय पोषक मूल्य असलेले असते, त्यामुळे शेतकरी ते थेट पिकांना सोडू शकतात. घन रूपाचे सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत करता येते.

‘किसान गॅस’ची वैशिष्टये

शेतकर्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘किसान गॅस’ची रचना केली आहे. यामध्ये गुरांचे शेण, मानवी मैला, स्वयंपाकघरातून निघणारा जैविक कचरा, पालापाचोळा याच्या वापरातून बायोगॅस तयार केला जातो. स्वयंपाकासाठी तसेच विजेवर चालणार्‍या उपकरणांसाठी बायोगॅस उपयोगी आहे. यातून तयार होणार्‍या स्लरीचा जैविक खत म्हणून वापर होतो.

मध्यम व अल्पभूधारक शेतकरी, दुग्धउत्पादक शेतकरी, कुक्कुटपालक तसेच ग्रामपंचायतींसाठी हे ‘किसान गॅस’ उपयुक्त आहे.

उच्चविद्याविभूषित असे हे तीन तरुण आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही भरीव कामगिरी करावी या उद्देशाने हे काम करत आहेत. हे सतीच वाण तितकं सोपंही नाही. सुरुवातीच्या काळात धनंजय आणि शंतनूला नोकरी करणार्‍या आपल्या पत्नीकडून व्यवसायासाठी पैशांची मदत घ्यावी लागली आहे.

स्टार्टअप फाउंडर्सना ज्या ज्या प्रसूतीवेदना सहन कराव्या लागतात, त्या सगळ्या सहन कराव्या लागल्या आहेत. तेव्हा आता या तिघा फाउंडर्सच्या सिनर्जीतून ‘क्लीनर्जी’चं हे यश आज पाहायला मिळत आहे.

संपर्क – 9890252771

The post या तीन तरुणांनी एकत्र येऊन तयार केला शेतकर्‍यांसाठी फ्लेक्सिबल आणि मुव्हेबल ‘किसान गॅस’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment