या दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे

ते दोघं ‘केंब्रिज सिस्टिमॅटिक्स’ या तंत्रज्ञान सेवा पुरवणार्‍या कंपनीत नोकरी करत होते. काही काळानंतर दोघांनी नोकरी सोडली, पण तरीही ते एकमेकांच्या संपर्कात होते. खरं सांगायचं तर त्या दोघांमधील एकालादेखील उद्योजक बनण्याचे धाडस दाखवण्याची इच्छा नव्हती.

कालांतराने त्यांना डिलिव्हरी व्यवसाय खुणावू लागला आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिलिव्हरी उद्योगातील लॉजिस्टिक्सचा अभाव. या उद्योगात एक अनमोल संधी लपली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ठरवलं की त्या संधीचं सोनं करायचं.

त्या काळात ग्राहक आणि उत्पादक यांच्यात बरेच व्यवहार होत असत, पण बहुतांश व्यवहार अजूनही असंघटित होते. डिलिव्हरी उद्योगात सुसुत्रता नव्हती त्यामुळे त्यात विस्कळीतपणा आलेला होता. दोघांच्या मनात एक कल्पना आली आणि एकत्र येऊन त्यांनी आपल्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली.

त्यांची योजना प्रत्यक्षात आणत अल्बिंदर धिंडसा आणि सौरभ कुमार या दोघांनी एका खोलीत दोन-चार लोकांना हाताशी घेऊन २०१३ मध्ये त्यांचे स्टार्टअप लाँच केले आणि त्याला ‘वन नंबर’ असे नाव दिले. स्टार्टअपचा उद्देश ग्राहकांना मागणीनुसार पिकअपची सुविधा तसेच किरकोळ दुकाने जसे की किराणा, फार्मसी, रेस्टॉरंट्समधून ड्रॉप सेवा प्रदान करणे हे होते.

ग्राहकांच्या स्थानिक वितरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे वन- स्टॉप सोल्यूशन होते, परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आलं की वरील बहुतेक ऑर्डर किराणा माल आणि फार्मसी उत्पादनांसाठी आहेत. म्हणून त्यांनी आपला व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला आणि फक्त किराणा माल तसेच फार्मसीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

कंपनीचे पुन:ब्रॅण्डिंग करण्याची ही योग्य वेळ होती आणि ‘वन नंबर’ हे नाव बदलून त्याला ‘ग्रोफर्स’ केले. ‘ग्रोफर्स’ हा ई-कॉमर्स स्टार्टअप प्लॅटफॉर्म होता आणि आपल्या ग्राहकांना किराणा माल, भाज्या, बेकरी अशा दैनंदिन गरजांची उत्पादनं घरपोच देत असे.

‘ग्रोफर्स’ने बी-टू-बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल म्हणून सुरुवात केली, परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की अशा पद्धतीने ते बाजारपेठ काबीज करू शकत नाहीत. त्यामुळे ‘ग्रोफर्स’ हायपर-लोकल डिलिव्हरी नेटवर्कमध्ये बदलले.

आता ग्रोफर्सचा मुख्य हेतू ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी देणे आणि त्यासाठी ते ग्राहकांच्या जवळच्या दुकानातून वितरणाची सोय करत होते. या व्यवस्थेतून किरकोळ विक्रेत्यांकडून मिळणार्‍या कमिशनद्वारे त्यांना महसूल मिळत गेला.

जेव्हा ‘ग्रोफर्स’ने व्यवसायास सुरुवात केली तेव्हा त्यांना काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागले, ज्याचा सामना कमीअधिक प्रमाणात सगळ्याच स्टार्टअप्सना करावा लागतो. त्यामध्ये महत्त्वाचे होते लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकप्रियता मिळवणे.

तीन महिन्यांनंतर ‘ग्रोफर्स’ने अधिक ऑर्डर्स मिळवण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लाँच केले. शिवाय कंपनीने विविध शहरांमधील आपल्या कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या सुमारे ७०० पर्यंत वाढवली. सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी कोणतीही जाहिरात मोहीम चालवली नाही हे विशेष.

ज्या काळात ‘ग्रोफर्स’ची स्थापना झाली, त्या काळात भारतातील जवळपास प्रत्येक शहरात स्टार्टअप्स स्थापन झाले होते; ‘ग्रोफर्स’ने मात्र बरीच मोठी मजल मारली होती. २०१४ मध्ये ‘ग्रोफर्स’ला ५०० हजार डॉलर्सचा पहिला निधी प्राप्त करण्यात यश आले, तर २०१५ मध्ये कंपनीने टायगर ग्लोबल मॅनेजमेंट या फर्मकडून १० दशलक्ष डॉलर्स उभे केले. ‘ग्रोफर्स’ला आजपर्यंतचा सर्वात मोठा निधी सॉफ्ट बँकेकडून मिळाला आहे ज्याची रक्कम ६१ कोटी डॉलर्स आहे.

भारतातील इतर शहरांमध्ये पोहोचण्यापूर्वी ‘ग्रोफर्स’ने दिल्ली एनसीआरमध्ये ट्रायल रन घेतला. १३ डिसेंबर २०२१ रोजी ‘ग्रोफर्स’ने क्‍विक-कॉमर्स सिस्टिम स्वीकारण्याच्या अनुषंगाने त्याचे नाव बदलून ‘ब्लिंकिट’ केले.

‘ब्लिंकिट’ प्रामुख्याने किराणा सामान, ताजी फळे आणि भाज्या, मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीज, किचनवेअर, पुस्तके, घर आणि ऑफिसच्या गरजा, बेकरी आयटम, निमल केअर, बेबी केअर आणि पर्सनल केअर उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, फुले इ. ऑर्डर्स डिलिव्हर करते.

सात वर्ष ऑनलाइन किराणा वितरण सेवा दिल्यानंतर ‘ब्लिंकिट’ने संपूर्ण शहरांमध्ये डार्क स्टोअर्स स्थापन करून भारतात एक्सप्रेस किराणा डिलिव्हरी सुरू केली. जुलै २०२१ मध्ये ‘ब्लिंकिट’ने गुडगावमध्ये १५ मिनिटांत ७ हजारहून अधिक ठिकाणी किराणा सामान वितरित केले.

एका महिन्यानंतर दहा शहरांमध्ये दररोज २० हजारपेक्षा अधिक ठिकाणी १५ मिनिटांत डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये दहा मिनिटांची डिलिव्हरी सुरू केली. पारंपारिक ई-कॉमर्स डिलिव्हरीसाठी एक दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागतो, तर जलद डिलिव्हरीमुळे कमी कालावधीत अधिक ग्राहकांना वस्तू पोहचवणे शक्य होते.

‘ब्लिंकिट’ या ऑनलाइन किराणा वितरण कंपनीला भारतीय खाद्यवितरण कंपनी झोमॅटोकडून १०० दशलक्ष इतके फंडस् मिळाले. यामुळे १ बिलियनपेक्षा जास्त मूल्य गाठण्यात आणि युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होण्यास कंपनीला शक्य झाले. ‘ब्लिंकिट’चे मूल्य सध्या १.१ अब्ज इतके आहे आणि २०२२ मध्ये ही क्‍विक कॉमर्स युनिकॉर्न कंपनी त्याच्या विद्यमान गुंतवणूकदार झोमॅटोकडून सुमारे ५०० दशलक्ष निधी उभारण्याचा विचार करत आहे.

– चंद्रशेखर मराठे

The post या दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment