या शास्त्रज्ञाने ७०० रुपयांत सुरू केलेली कंपनी आज एवढी मोठी फार्मा कंपनी आहे

ब्रिटिश भारताच्या काळात लंडन नंतर ब्रिटिश साम्राज्याचे दुसरे शहर अशी कलकत्त्याची ओळख होती आणि तिथल्या ग्रेट ईस्टर्न हॉटेलला पूर्व दिशेचा हिरा म्हणून ओळखले जात असे. त्या वेळी कलकत्ता त्याच्या बाबू संस्कृतीसाठी प्रसिद्ध होते, ज्यात सामाजिक, नैतिक आणि राजकीय बदलांचे पैलू समाविष्ट होते. एकोणिसाव्या शतकातील बंगालमध्ये आधुनिक उदारमतवादी विचारांचे प्रबोधन झाले जे हळूहळू उर्वरित भारतामध्ये पसरले.

१८९२ मध्ये प्रफुल्लचंद्र रे या रसायनशास्त्रज्ञाने ९१, अप्पर सर्क्युलर रोड, कोलकाता येथे भाड्याने घर घेतले आणि ७०० रुपयांच्या भांडवलासह जे आजच्या हिशोबाने अडीज लाख रुपये होतील, ‘बंगाल केमिकल वर्क्स’ची स्थापना केली. बंगाली तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना वाढवणे आणि वसाहती ब्रिटिश सरकारकडून नोकर्‍यांना पर्याय उपलब्ध करून देणे या उद्देशाने त्यांनी कंपनीची स्थापना वैयक्तिक उपक्रम म्हणून केली.

१८९३ साली कंपनीने कोलकाता येथील इंडियन मेडिकल काँग्रेसच्या अधिवेशनात आपली हर्बल उत्पादने सादर केली. कंपनीचा नावलौकिक झाल्यावर प्रफुल्लचंद्र यांनी उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी कंपनीमध्ये २ लाख अतिरिक्त निधी जोडला.

प्रफुल्लचंद्र रे

व्यवसायाचे रूपांतर लिमिटेड कंपनीत करण्यात आले आणि १२ एप्रिल १९०१ रोजी कंपनीचे नाव बदलून बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेड असे ठेवण्यात आले. १९०५ मध्ये कोलकात्यातील माणिकतला येथे एका कारखान्याने सुरवात करून आणखी तीन कारखाने स्थापन करण्यात आले. १९२० मध्ये पाणिहाती येथे १९३८ मध्ये मुंबईत आणि १९४९ मध्ये कानपूर येथे.

सर प्रफुल्लचंद्र रे, २ ऑगस्ट १८६१ रोजी जन्मलेले एक प्रख्यात बंगाली रसायनशास्त्रज्ञ होते. ते शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि सामाजिक भान असलेले उद्योगपतीदेखील होते. त्यांनी रसायनशास्त्रातील पहिली आधुनिक भारतीय संशोधन शाळा स्थापन केली. त्यांना भारतातील रसायनशास्त्राचे जनक मानले जाते.

प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म तत्कालीन ब्रिटिश भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीच्या पूर्वेकडील ररुली कटिपारा या गावात झाला. ते जमीनदार हरीशचंद्र रायचौधरी आणि त्यांची पत्नी भुवनमोहिनी देवी यांचे तिसरे अपत्य होते. प्रफुल्लचंद्र सात भावंडांपैकी एक होते. त्यांना चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या.

अल्बर्ट स्कूलमधील त्यांच्या शिक्षकांना ते त्यांच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात खूप पुढे असल्याचे आढळले. १८७८ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली आणि पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला.

प्रफुल्लचंद्र यांनी प्रामुख्याने इतिहास आणि साहित्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी, तेव्हा पदवीसाठी रसायनशास्त्र हा विषय अनिवार्य होता. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटने त्यावेळी विज्ञान अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही सुविधा देऊ केल्या नसल्यामुळे, ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये बाह्य विद्यार्थी म्हणून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या व्याख्यानांना उपस्थित रहात. ते विशेषत: अलेक्झांडर पेडलर, प्रेरणादायी व्याख्याते आणि प्रयोगशील अभ्यासक यांनी शिकवलेल्या रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमांकडे आकर्षित झाले होते, जे भारतातील सुरुवातीच्या संशोधन रसायनशास्त्रज्ञांपैकी एक होते.

लवकरच प्रायोगिक विज्ञानाने आकृष्ट झालेल्या प्रफुल्लचंद्र यांनी रसायनशास्त्रामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला, कारण आपल्या देशाचे भविष्य तिच्या विज्ञानातील प्रगतीवर अवलंबून असेल हे त्यांनी ओळखले होते. प्रयोग करण्याच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांनी आपल्या वर्गमित्राच्या घरात छोटीशी रसायनशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केली, जिथे पेडलरची काही प्रात्यक्षिके पुन्हा करून पाहिली. एक दिवस सदोष उपकरणाचा स्फोट झाल्याने ते अपघातातून बचावले.

१८८१ मध्ये त्यांनी एफएची परीक्षा द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण केली आणि या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने कलकत्ता विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. लॅटिन आणि फ्रेंच भाषा शिकून अनिवार्य विषय असलेल्या संस्कृतवर प्रभुत्व मिळवण्याबरोबरच त्यांनी बीएच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना गिलख्रिस्ट पारितोषिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला, ज्यासाठी किमान चार भाषांचे ज्ञान आवश्यक होते.

अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेनंतर त्यांना दोनपैकी एक शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठातील बीएस्सीकरता नावनोंदणी केली. ऑगस्ट १८८२ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी ते युनायटेड किंग्डमला गेले. एडिनबर्ग येथे विद्यार्थीदशेत असताना प्रफुल्लचंद्र यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातील त्यांची आवड जोपासली.

१८८५ मध्ये त्यांनी विद्रोहाच्या आधी आणि नंतरचा भारत या विषयावरील निबंधासाठी विद्यापीठाद्वारे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रवेश केला. ब्रिटिश राजवटीवर जोरदार टीका करणारी आणि ब्रिटिश सरकारला चेतावणी देणारे त्यांचे सादरीकरणाचे सर्वोत्कृष्ट प्रवेशिकांपैकी एक म्हणून मूल्यांकन केले गेले आणि विद्यापीठाचे नुकतेच नियुक्त झालेले प्राचार्य विल्यम मुइर यांनी त्यांचे खूप कौतुक केले.

बीएस्सी पदवी प्राप्त केल्यानंतर प्रफुल्लचंद्र यांनी डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला. त्यांचे प्रबंध सल्लागार क्रुम ब्राउन हे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होते, पण ते अजैविक रसायनशास्त्राकडे आकर्षित झाले होते. १८९६ मध्ये त्यांनी मर्क्युरस नायट्रेटचे स्थिर संयुग शोधले. प्रफुल्ल चंद्र यांना होप पारितोषिक देण्यात आले ज्यामुळे त्यांना डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर आणखी एक वर्ष त्यांच्या संशोधनावर काम करता आले. विद्यार्थी असताना १८८८ मध्ये ते एडिनबर्ग केमिकल सोसायटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले.

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने त्यांच्या कार्याचा गौरव युरोपबाहेरील पहिला केमिकल लँडमार्क फलक देऊन केला. ते भारतातील पहिली फार्मास्युटिकल कंपनी बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सचे संस्थापक होते. त्यांनी अ हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री फ्रॉम द अर्लीएस्ट टाइम्स टू द मिडल ऑफ सिक्स्टीन्थ सेंच्युरी हे पुस्तक लिहिले.

१९४४ मध्ये प्रफुल्लचंद्र यांच्या मृत्यूनंतर बाजारात टिकून राहण्यासाठी बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेडला संघर्ष करावा लागला आणि १९५० मध्ये कंपनी तोट्यात जाऊ लागली. १५ डिसेंबर १९७७ रोजी केंद्र सरकारने कंपनीचे व्यवस्थापन ताब्यात घेतले, त्यानंतर १५ डिसेंबर १९८० रोजी कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले.

नवीन उपक्रमाचे नाव बंगाल केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड असे झाले. बंगाल केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बीसीपीएल) आता भारत सरकारच्या मालकीची रासायनिक आणि औषध उत्पादक कंपनी आहे, जी औद्योगिक रसायने, प्रतिजैविक इंजेक्टेबल्स, गोळ्या आणि कॅप्सूलसारखी औषधी आणि घरगुती उत्पादने बनवते.

– चंद्रशेखर मराठे

The post या शास्त्रज्ञाने ७०० रुपयांत सुरू केलेली कंपनी आज एवढी मोठी फार्मा कंपनी आहे appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment