शेतकरी बांधवांसाठी शेळीपालनाचा जोडधंदा लाभदायक : डॉ. भिकाने

नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (मपमविवि) अंतर्गत दूधबर्डी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ‘शास्त्रोक्त शेळी व्यवस्थापन’ प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. अनिल भिकाने म्हणाले, “कृषीउत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी बांधवांनी व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन केले तर अधिक नफा कमावणे शक्य आहे.”

शेळीपालनासाठी येणारा कमी खर्च तसेच शेळीला लागणारा कमी आहार याच्या तुलनेमध्ये जास्त उत्पन्न मिळते, त्यामुळेच शेळीला ‘गरीबांची गाय’ असे म्हणतात, असे सांगून पूर्वी फक्त कुटुंबाची गरज पूर्ण करणाऱ्या शेळीच्या मांसाला वाढत्या मागणीमुळे शेळीपालन व्यवसाय भरपूर नफा मिळवून देतो, असे डॉ. भिकाने यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात शेळीच्या लेंड्यांपासून बनणाऱ्या खताला तसेच मांसाबरोबरच शेळीच्या दुधालाही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्याचाही लाभ शेतकरी बांधवांना आता मिळू शकतो, असेही प्रा. डॉ. भिकाने यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर यांनी पुरस्कृत केला होता. ग्रामीण युवकांना कौशाल्यावर आधारित 7 ते 13 फेब्रुवारी, 2023 या काळात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षिणार्थींना मपमविविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सारीपुत लांडगे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आत्माचे प्रकल्प उपसंचालक प्रभाकर शिवणकर, तसेच प्रशिक्षण समन्वयक कमलेश चांदेवार, विषय विशेषज्ञ डॉ. श्वेता लेंडे उपस्थित होते.

यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींनीही मनोगत व्यक्त केले. शेती करताना नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी शेळीपालनाचे तंत्र जाणून घेणे उपयुक्त ठरेल, असे शुभम दाढे यांनी सांगितले. तर प्रशिक्षण घेतल्यामुळे आता शेळीपालन करणे अत्यंत सोपे जाईल, असे रामचंद्र जिचकार यांनी नमूद केले.

The post शेतकरी बांधवांसाठी शेळीपालनाचा जोडधंदा लाभदायक : डॉ. भिकाने appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment