शेती व्यवसायामधील निर्यात संधी

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने पाहता, भारताची सध्याची एकूण शेतमाल निर्यातीची टक्केवारी जागतिक व्यापाराच्या फक्त सतरा टक्के असून तब्बल ८३ टक्के व्यापारसंधी अजूनही उपलब्ध आहेत. हे या क्षेत्रातील होतकरू उद्योजकांनी ओळखले पाहिजे, संधीचा आवाका तर मोठा आहे; परंतु त्या संधीचा आपल्या उत्पादनाच्या अनुषंगाने कसा फायदा करून घेता येईल हे पाहणे आवश्यक ठरते. अनाठायी लालसा व सुयोग्य माहितीअभावी घेतलेले निर्णय मारक ठरल्याची अनेक उदाहरणे या क्षेत्रात पाहावयास मिळतात.

‘एपीडा’चे महत्त्व

शेतमालाचे वर्गीकरण प्रामुख्याने फळे, भाजीपाला, धान्य यामध्ये होते. त्यामुळे निर्यातदार उद्योजकाने विदेशी बाजारपेठेतील संभाव्य ग्राहकाच्या मागणीनुसार त्या त्या उत्पादनाचा पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरते. जर निर्यातदार हा शेतमाल उत्पादक शेतकरी असेल तर त्याने आपल्या उत्पादनसापेक्ष अशीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हेरावी, जेथे मागणीचे आधिक्य आहे. यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे आहे भारत सरकारच्या सहयोगाने आपल्या निर्यात व्यवसायाचे नियोजन करणे.

सरकारने शेतमाल निर्यातवृद्धीकरता खासकरून एक्स्पोर्ट प्रमोशन कौंसिल या स्वतंत्र संस्थेची निर्मिती केली आहे. ही संस्था अ‍ॅग्रीकल्चर प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलप्मेंट ऑथॉरीटी (एपीडा) या नावाने ओळखली जाते. प्रत्येक निर्यातोच्छूक उत्पादक वा व्यापारी उद्योजकाने या संस्थेचे सदस्यत्व घेणे हितकारक ठरते.

या संस्थेतर्फे निर्यातदारांना निर्यातीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले जाते व त्यांच्या विवक्षित उत्पादनपरत्वे बाजारपेठा मिळवून देण्यासही सहाय्य केले जाते. संस्थेतर्फे उत्पादित शेतमालाचा दर्जा ही आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे आहे की नाही हे पडताळले जाते. तसेच सर्व पडताळणीअंती निर्यातदारास आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे दिली जातात.

निर्यातक्षम शेतमाल उत्पादन निवड :

शेतीव्यवसायातील उत्पादनांची उपलब्धता ही बर्‍याच बाह्यघटकांवर अवलंबून असते. जसे, हवामान, पर्जन्यमान, ऋतूबदल, इ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यवसायाचा उच्चतम स्तर आहे आणि येथे उत्पादनाची मागणी ही महत्तम प्रमाणात असते. तसेच शेतमाल हा नाशिवंत असल्याने निर्यातदाराला ग्राहकाभिमुखता जपणे हे मोठे आव्हान असते. त्यात भरीस भर म्हणून की काय, विदेशी बाजारपेठेतील दर हे नाशिवंत उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठ्याच्या अनुषंगाने सतत बदलत असतात.

या सर्व पार्श्वभूमीवर निर्यातदाराने फक्त एकाच उत्पादनावर अवलंबून राहणे थोडे जोखमीचे ठरू शकते. शक्यतो शेतमाल निर्यातदारांनी एकापेक्षा अनेक उत्पादनांमध्ये व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे; जेणेकरून कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित कारणपरत्वे व्यवसाय बाधित न होता अव्याहत चालू राहतो. तसेच परदेशी ग्राहकाची मागणी ही पुरवता येणे तुलनेने सोपे जाते.

– सौरभ दर्शने
संपर्क : 8104055489

The post शेती व्यवसायामधील निर्यात संधी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment