सरकारी कर्जयोजनांचा लाभ घेण्यासाठी ‘उद्यमीमित्र’

अनेकदा आपल्याला उद्योजकांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती नसते. तसेच ज्या योजना माहीत आहेत, त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे कळत नसते. तुम्हीही अशाच स्थितीत असाल तर आजच भेट द्या ‘उद्यमीमित्र’ला.

‘उद्यमीमित्र’ हे भारत सरकारने लघुउद्योजकांसाठी तयार केलेले वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर लघुउद्योजकासांठी असलेल्या ‘पंतप्रधान मुद्रा योजना’, ‘स्टॅण्डअप इंडिया योजना’, ‘एमएसएमई कर्ज योजना’ आणि फेरीवाल्यांसाठी असलेल्या ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजने’ची सविस्तर माहिती घेता येऊ शकते; शिवाय या पोर्टलद्वारे या कर्ज योजनांसाठी ऑनलाइन अर्जही करता येतो.

या पोर्टलची देशभाल तसेच याचा बॅकेण्ड सिडबी सांभाळतो. तुम्ही येथे अर्ज केल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष कर्ज मिळेपर्यंत तुम्हाला सिडबीतर्फे सहकार्य केले जाते. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यातही काही अडचण असल्यास तुम्हाला सहकार्य मिळते.

‘उद्यमीमित्र’ पोर्टलच्या माध्यमातून मुद्रा योजना किंवा स्टॅण्डअप इंडिया योजनेसाठी अर्ज केल्यावर हे पोर्टल तुमचा अर्ज बँकेकडे पाठवते आणि प्रत्यक्ष कर्जवितरण बँकेमार्फत होते. मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला ५० हजार ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. ‘स्टॅण्डअप इंडिया’द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजक यांना १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते.

‘उद्यमीमित्र’ पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे उद्यमी रेजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. उद्यमी रेजिस्ट्रेशन ऑनलाइन होते व पूर्णपणे मोफत आहे.

‘उद्यमीमित्र’ पोर्टलला भेट देण्यासाठी udyamimitra.in या संकेतस्थळाला भेट द्या.

– टीम स्मार्ट उद्योजक

The post सरकारी कर्जयोजनांचा लाभ घेण्यासाठी ‘उद्यमीमित्र’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment