स्वतःला ऑनलाइन शिक्षणाची आवड असणाऱ्या ‘बायजू’ने जगभरातल्या करोडो विद्यार्थ्यांना लावली ऑनलाइन शिक्षणाची गोडी

शाळेत असताना ते वर्गात न बसता घरी येऊन शिकत; म्हणजे भविष्यातील घरबसल्या शिक्षणाचा पाया त्यांच्या हातून नकळतच घातला गेला. ते व्यवसायाने अभियंता आहेत आणि २००६ पासून विद्यार्थ्यांना गणिताचे प्रशिक्षण देत होते. त्यांनी कॅट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्यांना चांगले टक्के मार्क्स मिळत आहेत हे बघून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीचे मूल्य २२ अब्ज अमेरिकन डॉलर आहे आणि त्यांचे ११५ दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी आहेत.

‘बायजू’ ही एक भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे आणि तिचे मुख्यालय बेंगालुरू येथे आहे. त्याची स्थापना २०११ मध्ये बायजू रवींद्रन आणि दिव्या गोपीनाथ यांनी केली होती.

‘बायजू’ ॲप थिंक ॲंड लर्नने विकसित केले आहे. ही कंपनी बायजू रवींद्रन, त्यांची पत्नी दिव्या गोपीनाथ आणि विद्यार्थ्यांच्या एका गटाने २०११ मध्ये स्थापन केली होती. बायजू रवींद्रन व्यवसायाने अभियंता आहेत आणि २००६ पासून विद्यार्थ्यांना गणिताचे प्रशिक्षण देत होते.

सुरुवातीला कंपनीने स्पर्धात्मक परीक्षांसाठी ऑनलाइन व्हिडिओ-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. २०१२ मध्ये कंपनीने डेलॉइट टेक्नॉलॉजी फास्ट फिफ्टी इंडिया आणि डेलॉइट टेक्नॉलॉजी फास्ट फाईव्ह हंड्रेड एशिया पॅसिफिक रेटिंगमध्ये प्रवेश केला.

बायजू रवींद्रन आणि दिव्या गोपीनाथ

बायजू रवींद्रन यांचा जन्म १९८१ मध्ये केरळ राज्यातील अझिकोडे गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रवींद्रन आणि आईचे शोभनवल्ली. त्यांनी मल्याळम माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले जेथे त्यांची आई गणिताची शिक्षिका आणि वडील भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. ते शाळेतील वर्गात न बसता घरी येऊन शिकत; म्हणजे भविष्यातील घरबसल्या शिक्षणाचा पाया छोट्या बायजूच्या हातून नकळत घातला गेला.

बी.टेक. पूर्ण केल्यानंतर ते सेवा अभियंता म्हणून एका बहुराष्ट्रीय शिपिंग कंपनीत रुजू झाले. २००३ मध्ये सुट्टीत त्यांनी कॅट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या त्याच्या मित्रांना मदत केली. त्यानंतर त्यांनी स्वतः कॅट परीक्षा दिली आणि १०० व्या पर्सेंटाइलमध्ये गुण मिळवले. जेव्हा त्यांनी पुन्हा परीक्षा दिली, तेव्हा त्यांनी पुन्हा १०० व्या टक्केवारीत गुण मिळवले.

दोन वर्षांनंतर त्यांनी कॅट परीक्षेचा अभ्यास करण्यास लोकांना मदत करणे सुरूच ठेवले आणि त्यांना चांगले टक्के मार्क्स मिळत आहेत हे बघून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये चाचणी परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या ‘बायजू’ क्लासेसची स्थापना केली.

२०११ मध्ये त्यांनी पत्नी दिव्या गोपीनाथसोबत बायजू’ज ची स्थापना केली, जिच्याशी त्यांची परीक्षा तयारी वर्गात असताना भेट झाली. २०१५ मध्ये मोठे स्मार्टफोन आले आणि स्क्रीनचा आकार वाढला. तेव्हा बायजू’ज द्वारे विकसित केलेल्या ॲपवर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना लॅपटॉपची गरज नव्हती; त्यांच्या हातातील मोबाइलवर ते शक्य झाले. ऑक्टोबर २०१८ मध्ये ॲपचा विस्तार इंग्लंड, अमेरिका आणि इतर इंग्रजी भाषिक देशांमध्ये झाला.

दिव्या गोपीनाथचा जन्म बेंगालुरू येथे झाला. तिचे वडील अपोलो हॉस्पिटलमध्ये नेफ्राॅलॉजिस्ट आहेत आणि तिची आई दूरदर्शनमध्ये प्रोग्रामिंग एक्झिक्युटिव्ह होती. दिव्याने तिचे शालेय शिक्षण फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले आणि बेंगालुरूमधील आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले.

२००७ मध्ये पदवी घेतल्यानंतर तिची भेट बायजू रवींद्रनशी झाली, जे तिला जीआरई परीक्षेचा पूर्व अभ्यासक्रम शिकवत होते. वर्गातील ब्रेकदरम्यान बायजू रवींद्रन यांनी तिला शिक्षिका होण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षिका म्हणून तिची कारकीर्द २००८ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू झाली. “हा १०० विद्यार्थ्यांचा वर्ग होता आणि बहुतेक विद्यार्थी माझ्यापेक्षा फक्त एखाद-दोन वर्षांनी लहान होते, त्यामुळे प्रौढ दिसण्यासाठी मी साडी नेसलेली होती.” ती म्हणाली.

जानेवारी २०२१ मध्ये त्यांना नॅशनल स्टार्टअप ॲडव्हायझरी कौन्सिलमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले. एप्रिल २०२१ मध्ये ‘बायजू’ने आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड १ बिलियन अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी केले.

‘बायजू’ हे शैक्षणिक ॲप आहे जे फ्रीमियम मॉडेलवर चालते. नोंदणीनंतर १५ दिवसांपर्यंत त्या ॲपच्या शैक्षणिक सामग्रीवर विनामूल्य प्रवेश असतो. हे ॲप इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री प्रदान करते. २०१९ मध्ये इयत्ता पहिली ते तिसरीसाठी प्रारंभिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला. ‘बायजू’ भारतातील आयआयटी – जेईई, एनईईटी, कॅट, जीआरई आणि जीमॅट यासारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठीदेखील प्रशिक्षण देऊ लागले.

या ॲपवर शैक्षणिक विषय आणि संकल्पना बारा ते वीस मिनिटांच्या डिजिटल ॲनिमेशन व्हिडिओसह स्पष्ट केल्या जातात आणि विद्यार्थी स्वतःच्या वेळेनुसार शिकू शकतात. ‘बायजू’च्या अहवालानुसार त्यांचे एकूण ४० दशलक्ष वापरकर्ते आहेत आणि ३ दशलक्ष वार्षिक सशुल्क सदस्य आहेत.

कंपनीने इतर देशांतील इंग्रजी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बायजू’ ॲपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती सुरू करण्याची योजना आखली आहे आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या अर्ली लर्न ॲपमध्ये नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

एप्रिल २०२१ मध्ये कंपनीने व्हाईटहॅट ज्युनियरचे संस्थापक करण बजाज यांच्या नेतृत्वाखाली “बायजू’ज फ्यूचर स्कूल” सुरू करण्याची घोषणा केली. द फ्यूचर स्कूलचे उद्दिष्ट आहे गणित, विज्ञान, इंग्रजी, संगीत आणि ललित कला आणि कोडिंग यासारखे विषय कथाकथनाद्वारे तसेच परस्परसंवादासह शिकवणे.

ही कंपनी भारतातील दोनशे शहरांमध्ये पाचशे शिकवणी केंद्र सुरू करणार आहे, ज्यापैकी ८० केंद्र आधीच सुरू झाली आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि मेक्सिकोमध्ये फ्यूचर स्कूल सुरू करण्यात येणार आहे. करोना काळात तर ‘बायजू’ हे अत्यंत उपयुक्त ॲप सिद्ध झाले आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गरज या ॲपद्वारे पूर्ण केली.

– चंद्रशेखर मराठे

The post स्वतःला ऑनलाइन शिक्षणाची आवड असणाऱ्या ‘बायजू’ने जगभरातल्या करोडो विद्यार्थ्यांना लावली ऑनलाइन शिक्षणाची गोडी appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment