२,५००+ महिलांना मेणबत्ती उत्पादक बनवणाऱ्या संगीता गुरव

उद्योजकता ही एक वृत्ती आहे. तिचा शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी किंवा शहरी-ग्रामीण भौगोलिक पार्श्वभूमीशी काही संबंध नसतो. भांडवलाच्या उपलब्धतेशीही संबंध नसतो. उद्योजकतेची प्रवृत्ती ज्यांच्या अंगात आहे, ती व्यक्ती तिची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यातून मार्ग काढत जाते आणि काळाच्या ओघात आपले असे एक स्वतंत्र स्थान निर्माण करते. ओळख बनवते. व्यवसायात यश संपादन करते.

बदलापूर येथील मेणबत्तीनिर्मिती व्यवसायाच्या प्रशिक्षिका आणि मेणबत्ती उत्पादक संगीता गुरव यांनीही आपल्या उद्योगप्रवण वृत्तीच्या जीवावर सगळ्या अडचणींवर मात करून महाराष्ट्रभरात मेणबत्ती प्रशिक्षिक म्हणून आपले एक स्थान निर्माण केले आहे. मेणबत्ती उत्पादनातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. केवळ इतकेच नव्हे तर मेणबत्ती उत्पादनाच्या लघुउद्योगाच्या माध्यमातून संगीता गुरव यांनी राज्यभरातील हजारो महिलांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा प्रकाश पाडला आहे. हजारो महिलांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आहे.

आज जरी बदलापूर सारख्या मुंबई जवळील उपनगरात राहत असल्या तरी संगीता गुरव या मुळच्या ग्रामीण भागातल्या. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वावर हिरे हे त्यांचे मूळ गाव. त्या गुरव समाजातील आहेत. ग्रामीण भागात जिथे ब्राह्मण पुरोहित उपलब्ध नसतात तिथे गुरव समाज देवळांतील देवांची पूजा करतो. पंचांग सांगतो. ग्रामीण भागात गुरव समाजाला ब्राह्मणांचा पर्याय म्हणून बघितले जाते. संगीताताई या त्या समाजातील.

त्या काळच्या प्रथेप्रमाणे १९८५ साली जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचा कृष्णदेव मनोहर गुरव यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्या खेड्यातून थेट मुंबईजवळच्या उल्हासनगर येथे आल्या. त्यांचे पती कृष्णदेव हे रेल्वेत कामाला होते. त्या काळी सरकारी कर्मचाऱ्यांना पगार फार कमी असे. पतीच्या तुटपुंज्या पगारात संगीता आपला संसार नेटाने करू लागल्या. पतीच्या पगारातील बराचसा भाग घरभाडे देण्यातच जात असे. प्रत्यक्ष संसाराला कमी पैसे उरत. यावर काय उपाय करता येईल याबद्दल संगीता गुरव सतत विचार करत असत.

उल्हासनगर या निमशहराला लागूनच आशेळे नावाचे खेडे आहे. संगीताताई त्या आशेळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहत होत्या. या ग्रामपंचायतीने एकदा महिलांसाठी मेणबत्त्या व इतर घरगुती उत्पादने बनवण्याचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. संगीता यांनी त्या वर्गात सहभाग घेतला. त्यात त्यांना मेणबत्त्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मेणबत्त्या बनवण्यासाठी साचा व त्यासाठी भांडवल लागणार होते. संगीता गुरव यांनी धाडस करून गुंतवणूक केली आणि मेणबत्त्या बनवणे सुरू केले. तो काळ लोडशेडींगचा होता. नेहमी लाईट जात असत. लोकांना मेणबत्त्यांची फार गरज लागत असे. संगीता गुरव यांनी बनवलेल्या मेणबत्त्यांची गुणवत्ता इतर मेणबत्यांपेक्षा जास्त चांगली होती.

बाजारातील मेणबत्त्यांपेक्षा त्या दीर्घकाळ जळत असत. त्यामुळे लोक आवर्जून त्यांच्याकडे येऊन मेणबत्त्या खरेदी करत. एक घरगुती किंवा कुटीरोद्योग म्हणून चालू झालेला संगीता यांचा मेणबत्ती उत्पादनाचा उद्योग कालौघात चांगलाच नावारुपाला आला. आपल्या संसाराला हातभार लागावा हा त्यांचा उद्देश निश्चितच सफल झाला.

त्यांनीही आपल्या मेणबत्त्यांमधे अनेक प्रकारचे बदल केले. नवनवे प्रकार विकसित केले. मेणबत्ती जास्त काळ जळत राहावी म्हणून संक्रांतीमधे वापरल्या जाणाऱ्या सुगडात म्हणजे मातीच्या मडक्यांत मेण घालून दीर्घ काळ तेवत राहणाऱ्या मेणबत्त्या बनवल्या. ती मडकी त्या रंगरंगोटी करून सुशोभित करीत. त्यामुळे त्या मेणबत्त्यांना चांगलीच मागणी आली. तसेच काचेच्या ग्लासात व अल्युमिनीयमच्या पणतीच्या मेणबत्त्याही त्या बनवत.

त्यांच्या मेणबत्त्यांची गुणवत्ता इतरांपेक्षा सरस असे. त्यामुळे त्यांच्या मेणबत्त्यांना नेहमीच चांगली मागणी असे. ‘वेदांत आर्टस’ हे त्यांचे फेसबुक पेज आहे. त्यावर त्यांच्या सर्व उत्पादनांची माहिती मिळते.

जागोजागी निरनिराळ्या उद्योगजत्रा भरतात. त्यात संगीता गुरव आपला स्टॉल लावत असत. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. प्रत्येक ठिकाणी त्या आपली व्हीजिटींग कार्डे देत असत. ओळखी वाढवत. करून घेत. लवकरच त्या एक आघाडीच्या महिला लघुउद्योजिका आणि मेणबत्ती उत्पादक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आकाराला आले.

पुढे काही महिला बचतगटांनी मेणबत्ती प्रशिक्षण देण्याची विचारणा केली. संगीता गुरव यांना असे वाटत असे की जास्तीत जास्त महिलांनी मेणबत्ती उत्पादनाचे प्रशिक्षण घ्यावे आणि स्वावलंबी बनावे. त्या सदिच्छेने त्यांनी तसे वर्ग घेण्यास सुरूवात केली. नाबार्ड ही संस्था महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यात ती महिलांना फिनाईल, लिक्विड सोप वगैरे बनवण्याचे प्रशिक्षण देते.

नाबार्डनेही संगीता गुरव यांना मेणबत्ती प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निमंत्रण दिले. संगीताताईंनी अशी निमंत्रणे स्वीकारली आणि धडाडीने निरनिराळ्या ठिकाणी मेणबत्ती प्रशिक्षणाचे वर्ग घेतले. आपल्या वर्गात त्या मेणबत्त्या बनवून दाखवत. त्यामुळे महिलांना खरे प्रात्यक्षिक बघायला मिळे. काही सहकारी बॅंकांनीही आपल्या बचतगट आणि महिला ग्राहकांसाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित केले.

संगीता गुरव यांनी मेणबत्ती उत्पादनाची सुरुवात केल्याला आता ३५ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही आघाड्यांवर खूप प्रगती नोंदवली आहे. वैयक्तिक बाबतीत त्यांनी मेणबत्ती उत्पादन व प्रशिक्षणाच्या जोरावर चाळीतील भाड्याच्या घरापासून ते आधी चाळीत स्वत:चे घर, मग बदलापूरला एक वन बीएचके आणि नंतर आता टू बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे.

सामाजिक प्रगतीच्या बाबतीत त्या आता महाराष्ट्रातील नामवंत मेणबत्ती उत्पादनतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. असंख्य समाजसेवी, महिला सबलीकरण करणाऱ्या संस्था, महिला बचतगटांचे समूह त्यांना आपल्या सभासदांना मेणबत्ती उत्पादनाचे शिक्षण देण्यासाठी बोलावतात. कणकवली, सावंतवाडीपासून पुणे, कोल्हापूर, गडचिरोलीपर्यंत त्यांचे मेणबत्ती प्रशिक्षण वर्ग झालेले आहेत. दुरदूरचे लोक त्यांना मेणबत्ती प्रशिक्षणासाठी आवर्जून बोलवतात. अपंगांच्या संस्थांकडून त्या मानधन घेत नाहीत. अगदी कचरावेचक महिलांच्या गटांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

संगीता गुरव यानी आजवर सुमारे २५,००० महिलांना मेणबत्ती उत्पादनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्यापैकी निदान २,५०० महिलांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातील काहींनी त्यात उत्तम यश मिळवले आहे. म्हणजे संगीता गुरव यांच्यामुळे तेवढ्या महिला स्वालंबी झाल्या असे आपण म्हणू शकतो. संगीता गुरव यांनी एवढ्या महिलांच्या आयुष्यात मेणबत्तीचा नव्हे तर स्वावलंबनाचा, आत्मविश्वासाचा प्रकाश पाडला आहे. स्वयंपूर्णतेची ज्योत पेटवली आहे.

संगीता गुरव यांच्या या सर्व यशस्वी वाटचालीत त्यांचे पती कृष्णराव यांचा तितकाच मोलाचा वाटा आहे. पाठींबा आहे. पती व त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. तसेच वावर हिरे या मूळ गावातील लोकांचाही त्यांना आशीर्वाद आणि पाठबळ मिळाले. त्यामुळेच संगीताताई एवढी मोठी झेप घेऊ शकल्या. पती, सासरची मंडळी व गावकरी यांचे त्या आभार मानतात.

केवळ मेणबत्ती उत्पादक आणि प्रशिक्षक एवढीच संगीता गुरव यांची ओळख नाही आहे. मुळात धडपड, उद्योजकता हे गुण त्यांच्यात ठासून भरलेले आहेत. त्या गुरव समाजातील असल्याने लोक त्यांच्याकडे ज्योतिष विचारायला येत. त्याला पूरक म्हणून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचाही कोर्स केला. सुप्रसिध्द वास्तुविशारद विजय हजारी यांच्या हस्ते त्यांना ज्योतिष अलंकार ही पदवी मिळाली आहे. मेणबत्ती उत्पादन-प्रशिक्षणाबरोबरच त्या वास्तुशास्त्राबाबतचे सल्ले देतात.

संगीता गुरव यांना अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. गुरव समाज संघटनेच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या समाजातर्फे त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच कृष्णा फाऊंडेशन, पुणे तर्फे त्यांना उद्योगरत्न हा पुरस्कार दिला गेला. भोपाळ येथे झालेल्या एका उद्योजक संमेलनात त्यांना व्हॅक्स क्वीन हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला.

सध्या प्रशिक्षक म्हणून त्यांना सतत राज्यभर फिरावे लागते. त्यामुळे प्रत्यक्ष मेणबत्त्या बनवण्याएवढा वेळ त्यांना मिळत नाही. तरी काही आग्रही आणि जुन्या ग्राहकांसाठी त्या आजही स्वत मेणबत्त्या बनवतात. सध्या संगीता गुरव या मेणबत्ती प्रशिक्षण वर्गासाठीच वेळ देतात. एरवी त्यांचे मेणबत्ती उत्पादनाचे काम त्यांची कन्या प्रतिक्षा आणि जावई तानाजी गुरव हे बघतात.

संगीताताई गुरव आता ५५ वर्षांच्या आहेत. आपल्या स्वानुभवावरून त्या महिलांना सांगू इच्छितात की, महिलांनी परिस्थितीचे रडगाणे न गाता छोटामोठा व्यवसाय सुरू करून घरखर्चाला हातभार लावावा. टीव्ही सिरीयल बघण्यात वेळ न घालवता आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल यावर भर द्यावा.

सध्या वाढत्या शहरीकरणामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मोठ्या सोसायट्यातल्या नोकरदार महिलांना अनेक छोट्या गोष्टींसाठी मदतीची गरज असते. दळण दळून आणणे, निवडलेल्या भाज्या विकणे वगैरे सेवा महिला पुरवू शकतात. त्यात रोजगाराच्या अनेक संधी लपलेल्या आहेत.

महिलांनी टीव्ही सिरिअल बघणे वगैरे निरर्थक गोष्टींत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या मर्यादेत आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा. कोणतेही काम किंवा उद्योग हा छोटा नसतो. आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी महत्त्वाची असते. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात नेहमी छोटी असते. काळाच्या ओघात त्याचा विस्तार होत जातो.

संपर्क – संगीता गुरव – 9561606609

The post २,५००+ महिलांना मेणबत्ती उत्पादक बनवणाऱ्या संगीता गुरव appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment