₹५,००० भांडवलात करता येण्यासारखे ९ व्यवसाय

नोकरी करायची नाहीच, हे लहानपणापासून डोक्यात होते. आता माझं वय ४२ आहे. गेली तेरा वर्षे मी म्युचुअल फंड वितरक म्हणून स्वतःचा व्यवसाय करतोय. त्या आधी काही वर्षे गुंतवणूक क्षेत्रात नोकरी केली. फक्त दोन वेळा नोकरीसाठी बायोडाटा बनवण्याची माझ्यावर वेळ आली. कुठल्याही सरकारी नोकरीचा फॉर्म मी आजवर भरलेला नाहीये व नाही कुठल्या नोकरीसाठी अर्ज.

व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे नकोत, पण तुमच्या मोबाईलमध्ये जितके नंबर आहेत त्यातल्या किमान वीस टक्के लोकांपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयुक्त अशी सेवा दिली की तुम्ही यशस्वी झालात असे समजा. थोडक्यात किमान दोनशे जण असे हवेत की त्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकता व ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात.

कोणते उद्योग आहेत?
(हे मी सर्व स्वानुभवावरून सांगत आहे. यापैकी काही व्यवसाय मी स्वतः केले आहेत.)

१) लहान मुलांना शाळेत / क्लासमध्ये लागणाऱ्या वह्या / वाढदिवसानिमित्ताने रिटर्न्स गिफ्ट : जिथे शैक्षणिक साहित्य होलसेल भावत मिळते अशा ठिकाणी जाऊन माहिती काढून या. दरवर्षी वह्या या लागतातच. आता क्लासही असतो त्यामुळे वह्यांचा वापर जास्त. त्यामुळे हा एक व्यवसाय होऊ शकतो.

त्याबरोबर याच दुकानात पट्टी, पेन्सिल, रबर, आकर्षक कंपास होलसेल भावात मिळतात. त्या तुम्ही तुमच्या वह्या घेण्याऱ्या ग्राहकाला मुलाच्या वाढदिवसाच्या रिटर्न्स गिफ्टसाठी सुचवू शकता. (अनेक वस्तू आहेत, ज्या तुम्ही वर्षभर विकून चांगले उत्पन्न मिळवू शकता.)

२) उदबत्ती व्यवसाय : मला वाटत नाही असे कुठतेही घर असेल जिथे अगरबत्ती लावली जात नसेल. बाराही महिना चालणार हा व्यवसाय आहे. सणासुदीला नवीन प्रकार देऊन तुम्ही त्या काळात व्यवसाय वाढवू शकता (गणपती, नवरात्र, इद्यादी) याबरोबर कापूर, वाती, धूप अशा अनेक गोष्टी घाऊक बाजारातून घेऊन (होलसेल) तुम्ही तुमचा सहज व्यवसाय सुरू करू शकता. अशी दोनशे घरं पकडा, जे रोज उदबत्ती वापरतात. दोनशे पाकिटे सहज संपली.

३) राखी, आकाश कंदिल, रंग, रांगोळ्या व्यवसाय : वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे दोनशे जण आहेत, तर तुम्ही व्यवसायिक झालाच समजा. आपल्याकडे बारा महिने सणवार आहेत. तुम्हाला फक्त या दोनशे जणांच्या संपर्कात राहायचे आहे. बाजारात ₹२० – ₹३० असणारी राखी घाऊक बाजारात तीन-चार रुपयांना मिळते. तुम्ही १५ रुपयांत विकली तरी नफाच. या व्यवसायात गुंतवणूक किती लागेल याचा तुम्ही विचार करू शकता? हीच गोष्ट रंग, रांगोळी व कंदिलची.

४) तुळशीची रोपे / बागकाम : आज कुठल्याही कार्यक्रमात अनेक ठिकाणी रोपे दिली जातात. तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर तुम्ही तुळशीची लागवड करू शकता. तुळस लावायला किती खर्च अपेक्षित आहे तुम्ही अंदाज करू शकता. मुंबईसारख्या ठिकाणी एक रोप पंधरा रुपयांच्या खाली येत नाही. हीच गोष्ट मातीची. शहरात मातीला किंमत ₹३० – ₹४० किलो सुरू आहे.

हल्ली सोसायट्यांमध्ये टेरेस गार्डन संकल्पना जोरात सुरू आहे. तुमच्याकडे घरची माती आहे, रोपे आहेत तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. कुंड्या, माती व रोपे यांच्या माध्यमातून टेरेस गार्डन बनवून देण्याचा व्यवसाय उत्तम आहे. दरवर्षी देखभाल खर्च घेऊन तो ग्राहक तुम्ही टिकवू शकता.

५) मका (पॉपकॉर्न) : हल्ली बाजारात मक्याची दहा रुपयांची छोटी छोटी पाकिटं मिळतात. भाजल्यावर किंवा उकडल्यावर फक्त वाटीभर मका खायला तयार होतो. पण मका जिथे पिकतो तिथे याचा भाव बघाल तर कमालीचा स्वस्त असतो. इथून घाऊक भावाने मका आणून त्याची पाकिटं करून तुम्हीही विकू शकता.

६) कोकण – नाशिक : फणसाचे तळलेले गरे म्हटले की तोंडाला पाणी सुटतं ना? तुम्ही कोकणात राहत आहात, स्वतःचं फणसाचं झाड आहे तर झालं काम. खर्च म्हणजे तळायला लागणारे तेल.. शहरात हे फणसाचे तळलेले गरे ₹६०० – ₹७०० किलोनी विकले जातात. हीच गोष्ट आंबे, कोकम, सुपारी, कोकम सरबत यांची.

तुमची स्वतःची गाडी असेल तर हे पदार्थ जिथे सहज उपलब्ध नाहीत तिथे किंवा ओळखीत विकू शकता. कोकणातील वस्तू नाशिकसारख्या ठिकाणी विकायला / द्यायला येणार असाल, तर नाशिकमधील कांदे, मनुका, द्राक्ष, ऊस घेऊन तो कोकणात विकू शकता. म्हणजे जाता-येता गाडीत माल भरलेला असेल.

७) स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी : तुम्ही स्मार्ट उद्योजकचे प्रतिनिधी व्हा उत्तम माहिती लोकांपर्यत पोहचवून लोकांना उद्योजक होण्यात मदत करा आणि त्यातून अर्थार्जनही करा. हाही एक व्यवसायच आहे. स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी होण्याबद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

८) प्रिंटिंग प्रेसची कामे घेऊ शकता. रबर स्टँप, स्टिकर, ट्रॉफी, सन्मान चिन्ह बनवून देऊ शकता. यासाठी स्वतःची प्रिंटिंग प्रेस हवी असण्याची गरज नाही.

९) म्युच्युअल फंड : मी वयाच्या विसाव्या वर्षांपासून व्यवसायासंबंधी विचार करतो आहे. त्यात वह्याविक्री, प्रिंटिंग कामे, ट्यूब लाईट चॉक, साजूक तूप, अगरबत्ती, राख्या विक्री असे व्यवसाय चाचपडत होतो. वयाच्या २१-२२ व्या वर्षी मला म्युच्युअल फंडबद्दल माहिती मिळाली व लक्षात आले की म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की हे आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात.

साठ वर्षांच्या कुलकर्णी काकांकडून मला म्युच्युअल फंडाबद्दल माहिती मिळाली. म्युच्युअल फंडात दीर्घकाळात होणारी वाढ ही व्यवसायात होणाऱ्या वाढीसारखीच आहे हे लक्षात आले आणि मीही म्युच्युअल फंड वितरक म्हणून व्यवसाय करून लागलो.

असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही अल्प भांडवलात करू शकता. वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर अशा दोनशे व्यक्ती आहेत, ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे व तुम्हाला त्यांची सोय बघून सेवा द्यायला आवडेल. बोलणाऱ्याची मातीही सोन्याच्या भावात विकली जाते.

– दीपक जोशी
९९६७०७२१५

The post ₹५,००० भांडवलात करता येण्यासारखे ९ व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment