वाडिया ग्रुप : जहाजबांधणीपासून सुरू झालेला २८६ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास

सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरत येथील इंग्रजांनी भारतातच त्यांच्या गरजांसाठी लागणारी छोटी जहाजे बांधण्याचे ठरवले. डॉकयार्ड्स आणि जहाज बांधणीसाठी लागणारा कच्चा माल यांच्या उपलब्धतेमुळे सुरत हे महत्त्वाचे जहाजबांधणी आणि देखभाल केंद्र बनले.

जे. ओव्हिंग्टन या इंग्रज अधिकार्‍याने १६९० मध्ये सुरतला भेट दिली. ते जहाजबांधणीतील भारतीयांच्या कौशल्याने प्रभावित झाले. भारतीयांनी वापरलेले लाकूड इतके मजबूत होते की ते बंदुकीच्या गोळीनेदेखील तुटत नव्हते. इंडियन टीकवुड इंग्लिश ओकपेक्षा अधिक मजबूत आहे, अशी टिप्पणी ओव्हिंग्टन यांनी केली.

पंचवीस वर्षे वयाच्या एका पारसी युवकाने ही संधी हेरली आणि ब्रिटिश समुदायामधील आपली ओळख वापरून योग्य व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचला. तो युवक होता लवजी नसरवानजी वाडिया. जहाजे बांधणे हा वाडिया कुटुंबाचा पिढिजात व्यवसाय होता आणि जहाजबांधणी उद्योगांमध्ये सुरत इथे त्यांनी चांगलं नाव कमावलं होतं. त्याने ब्रिटिशांसमोर जहाजे बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला.

सुरत हे भारताच्या पश्चिम किनार्यावरील एक अतिशय महत्त्वाचे बंदर होते, जेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. पंधराव्या शतकापासून सुरत येथे पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटीशांची व्यापार केंद्रे होती. सर्व व्यापार समुद्रमार्गे होत असल्याने जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस येऊ लागला होता.

लवजी नसरवानजी वाडिया

जहाजबांधणी करणारे बरेचसे स्थानिक होते आणि ते छोट्या बोटी, जहाजे इत्यादी बांधत असत. परंतु त्यांची ऊठबस उच्चभ्रू आणि विशेषतः महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार्‍या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये नव्हती. लवजी नसरवानजी वाडिया या युवकाने ब्रिटिश समुदायामधील आपल्या ओळखीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीकडून जहाजे बांधण्याचे कंत्राट मिळवले. वर्ष होतं १७३६. वाडिया ग्रुपची ही पहिली कंपनी होती.

आताच्या मुंबई शहरातील बॉम्बे ड्राय-डॉक तसेच आशियातील पहिला ड्राय-डॉक लवजी वाडिया आणि त्यांचा भाऊ सोराबजी वाडिया यांनी १७५० मध्ये बांधले होते. पश्चिम आणि पूर्वेकडील सर्व जहाजांसाठी मुंबई हे व्यवहार्य व्यापारी बंदर मानले जाऊ लागले, ज्यात या वाडिया बंधूंचा सिंहाचा वाटा होता. लवजी यांना मुंबईतील जहाजबांधणी उद्योगाचे संस्थापक म्हटले जाते. त्यांचे पुत्र माणेकजी आणि बोमनजी यांनी सचोटी, धडाडी आणि समर्पित प्रयत्नांनी लवजी वाडिया यांचा वारसा पुढे चालवला.

वाडिया कुटुंबाने जहाजबांधणी उद्योगाचा विस्तार केला, तसेच पूल, धरणे आणि इमारतींच्या बांधकामातदेखील नांव कमावले. १८४० ते १९४० च्या दरम्यान सुरतमधील जहाजबांधणी आणि बांधकाम उद्योगावर कावसजी,बर्जोरजी, बेहरामजी, रुस्तमजी, होर्मुसजी, नसरवानजी आणि पेस्टनजी वाडिया यांचे वर्चस्व होते.

पेस्टनजीचे मुलगे फ्रामरोझ, फिरोजशाह आणि धनजीशाह यांनी इमारत आणि बांधकाम व्यवसाय सुरू ठेवला, त्याचबरोबर समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. त्यांच्या धर्मादाय संस्थांमध्ये नर्सिंग होम, मोफत शिक्षण संस्था आणि रुग्णालये यांचा समावेश आहे.

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना फ्रेंच लोकांचा दोन छोट्या प्रदेशावर मालकी हक्क होता; एक पूर्व किनार्‍यावर आणि दुसरा पश्चिमेकडे. १९२९ मध्ये पेस्टनजी वाडिया यांनी ताप्ती समुद्राजवळ असणारा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश फ्रेंचांकडून विकत घेतला; यामध्ये एका मोठ्या वाड्याचा समावेश होता. अनेक वर्षांनंतर वाडिया कुटुंबाने हा वाडा महिलांच्या शिक्षणासाठी दान केला. वयाच्या २७व्या वर्षी मरण पावलेल्या फ्रामरोझ वाडियाचा मुलगा झालच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरतमधील झाल एफ. वाडिया कॉलेज स्थापन करण्यात आले.

वाडिया मास्टर-शिपबिल्डर्सच्या सात पिढ्यांनी जुन्या बॉम्बेमध्ये भारतीय आणि ब्रिटिश नौदलासाठी अनेक जहाजे बांधली. बॉम्बे डॉकयार्डशी त्यांचा संबंध १९१३ मध्ये संपुष्टात आला, पण तोपर्यंत लवजी वाडिया कुटुंबाने व्यापारी जहाजे, फ्रिगेट्स, वॉटर बोट्स आणि स्टीमशिप अशी चारशेहून अधिक जहाजे बांधली.

द बॉम्बे डॉकयार्ड आणि वाडिया मास्टरच्या १९५५ मधील प्रकाशनानुसार, एचएमएस त्रिंकोमाली हे जहाज लवजी जमशेदजी बमनजी वाडिया यांच्या पुतण्याने ब्रिटीश नौदलासाठी बांधले होते. १८९७ मध्ये जहाजाचे नामकरण फौडरॉयंट असे करण्यात आले. १८५२ ते १८५७ मधील क्रिमियन युद्ध आणि दुसर्‍या महायुद्धामध्ये या जहाजाने ब्रिटीशांची चांगली सेवा केली आणि ते आता ब्रिटनमध्ये आहे. लवकरच त्याचे संग्रहालयात रूपांतर केले जाईल.

जमशेदजी, नवरोजी आणि धनजीभाई वाडिया हे एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश भारतातील उत्कृष्ट जहाजबांधणी विशेषज्ञ आहेत, ज्यांनी एकट्या ब्रिटिश नौदलासाठी 22 जहाजे बांधली. एचएमएस ट्रायकोमालीप्रमाणेच एचएमएस कॉर्नवॉलिसने १८१३ मधील ब्रिटिश-अमेरिकन युद्धात भाग घेतला आणि वीस वर्षांनंतर चीन समुद्रात ब्रिटिश फ्लीटचे प्रमुख म्हणून या जहाजाने एका मोहीम दलाचे नेतृत्व केले. एचएमएस कॉर्नवॉलिस या जहाजावर हाँगकाँग ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या नानकिंगच्या तहावर ऐतिहासिक स्वाक्षरी झाली.

वाडिया कुटुंबांमध्ये केवळ कर्तृत्त्ववान पुरुष होते असं नाही, तर काही कर्त्या स्त्रियादेखील होत्या. मोतलीबाई माणेकजी वाडिया ही अशीच एक स्त्री. जहांगीर वाडिया यांची ही मुलगी. तिचा जन्म ३० ऑक्टोबर १८११ रोजी झाला. तिने तिचा चुलत भाऊ माणेकजीशी विवाह केला, पण लवकरच वयाच्या २६व्या वर्षी ती विधवा झाली.

कौटुंबिक व्यवसायाची धुरा तिने समर्थपणे सांभाळली. तिच्या उपजत व्यावसायिक कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे कौटुंबिक संपत्ती आणि धर्मादाय कार्य; दोन्हींमध्ये वाढ झाली. तिने दारेमेहर्सच्या म्हणजे पारसी अग्यारी यांच्या देखभालीसाठी मोठी रक्कम दान केली आणि तिचे वडील जहांगीर यांच्या स्मरणार्थ मुंबईत एक अग्यारी बांधली. १८९४ मध्ये तिने उदवाडा आतश बेहराम या आठव्या शतकातील आणि सर्वात जुन्या अग्यारीची पुनर्बांधणी केली आणि तिच्या भविष्यातील देखभालीसाठी ठराविक रक्कम बाजूला ठेवली.

तिने अनेक दवाखाने आणि विशेषत: बाई मोतलीबाई प्रसुती रूग्णालयाची स्थापना केली. तिने अनाथाश्रमांना जमीन आणि पैशाचं पाठबळ दिलं. मोतलीबाईंच्या स्वप्नांपैकी एक स्वप्न होतं राणी व्हिक्टोरियाला वैयक्तिकरित्या जुन्या नाण्यांचा एक उत्तम संग्रह भेट देण्याचं, परंतु दुर्दैवाने ती इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नवरोजी याने तिच्या वतीने ते स्वप्न पूर्ण केले.

वाडिया कुटुंबामध्ये आणखी एक कर्तबगार आणि तीव्र सामाजिक भान असलेली स्त्री होती, जिचं नांव आहे जेरबाई नसरवानजी वाडिया. ती कमी किंमतीच्या गृहनिर्माण संकुलांची (बाग) प्रवर्तक होती. मुंबईत लाल बाग आणि नवरोज बाग तिच्या पुढाकारातून आणि देणगीतून बांधले गेले.

१९१७ मध्ये जेरबाईंनी नवरोजी एन. वाडिया ट्रस्ट फंडाची स्थापना केली आणि रुस्तम बाग आणि जेर बाग बांधण्यात मदत केली. तिचे मुलगे कुसरो आणि नेस यांनी तिचे कार्य पुढे सुरू ठेवत कुसरो बाग आणि नेस बाग बांधले. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी तिच्या स्मरणार्थ लहान मुलांसाठी बाई जेरबाई वाडिया रुग्णालय बांधले.

वाडिया कुटुंबामध्ये आणखी एक दयाळू स्त्री होती जिचं नांव आहे हिराबाई कावसजी जहांगीर. वाडिया कुटुंबात जन्मलेल्या आणि श्रीमंत रेडीमनी कुटुंबात विवाहित, तिने आपला वेळ भौतिक सुखाच्या मागे धावून घालवला नाही, तर पारसी आणि इतर लोकांच्या भल्यासाठी व्यतीत केला.

तिने खास मुलींसाठी नर्सरी स्कूल, वाडिया वाच्छा स्कूल आणि सर कावसजी जहांगीर स्कूलची स्थापना केली, तर मुलांसाठी सर कावसजी जहांगीर ग्रामीण संस्था आणि आणि पूणे येथे कावसजी जहांगीर नर्सिंग होम उघडले. तिने कला आणि विज्ञानाला प्रोत्साहन दिले. सर कावसजी जहांगीर इन्स्टिट्यूट फॉर सायन्स आणि प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी स्थापन करण्यासाठी योगदान दिले आणि मुंबईतील लोकांसाठी कलेचा चिरस्थायी वारसा सोडला.

नवरोजी नसरवानजी वाडिया यांचा जन्म ३० ऑगस्ट १८४९ रोजी झाला. इंग्लंडमध्ये इंजिनिअरिंगमधील उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कापडाच्या निर्मितीसाठी सुप्रसिद्ध बॉम्बे डायिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची स्थापना केली. त्यांनी अनेक कापड गिरण्या सुरू केल्या. जसे की नॅशनल, नेरियाड, धुन, ईडी ससून, प्रेसिडेन्सी, कालिकत, सेंच्युरी.

वंचितांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. विविध सरकारी आणि शैक्षणिक संस्थांचे सदस्य आणि अध्यक्ष या नात्याने त्यांनी चांगल्या शालेय शिक्षणासाठी संस्था स्थापन केल्या. बालवाडी, मुले आणि मुलींसाठी शारीरिक प्रशिक्षणासाठी पुढाकार असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या दानशूरतेमुळे अनेक सामाजिक-आर्थिक योजना राबवणे शक्य झाले. १८८९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना मचॅम्पियन ऑफ द इंडियन एम्पायरफ हा सन्मान प्रदान केला. मुंबईत एकही धर्मादाय संस्था नव्हती जिच्याशी नवरोजी जोडलेले नाहीत.

नवरोजी यांचे मुलगे कुसरो आणि नेस वाडिया यांनी कापड व्यवसायाचा विस्तार केला आणि भारतातील सर्वात मोठे कापड व्यवसायिक बनले. ते त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठी तसेच परोपकारी कार्यासाठी ओळखले जात होते. १९२० च्या दशकात नेस वाडिया याने वायरलेस सेवा, इंडिया रेडिओ आणि कम्युनिकेशन कंपनीची स्थापना केली आणि भारत आणि ब्रिटनला पहिल्यांदा एकमेकांच्या संपर्कात आणले. १९१९ मध्ये ब्रिटीश साम्राज्याचा मनाईटहूडफ मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

वाडिया कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य मानले आहे. पुण्यातील नेस वाडिया कॉलेज आणि कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी, नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संशोधन आणि शिक्षणाच्या अनेक संस्था याच कुटुंबाच्या आर्थिक मदतीवर उभ्या आहेत.

केवळ व्यवसायाचा विस्तार करायचा आणि पैसे कमवायचे असा संकुचित विचार वाडिया कुटुंबातील सदस्यांनी केला नाही. समाजाप्रती आपली बांधिलकी जपत या कुटुंबाने जहाजबांधणीपासून सुरुवात केली आणि अनेक व्यवसायांची यशस्वी उभारणी केली.

वाडिया ग्रुपमध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी चार कंपन्या भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत.

बॉम्बे डाईंग – १८७९ मध्ये स्थापना.
बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन – १८६३ मध्ये स्थापना.
ब्रिटानिया इंडस्ट्रीज – १९१८ मध्ये स्थापना.
नॅशनल पेरॉक्साइड लिमिटेड – १९९९ मध्ये स्थापित.

सूचीबद्ध कंपन्यांव्यतिरिक्त वाडिया यांच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत त्यापैकी काही :

ग्लॅडरॅग्स – एक फॅशन मॅगझिन आहे जे मॉरीन वाडिया या माजी एअर होस्टेसच्या खास आवडीचे आहे. १९५९ मध्ये स्थापना.
वाडिया टेक्नो – इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड – १९६० मध्ये स्थापना.
गो एअर – २००५ मध्ये स्थापना.
पंजाब किंग्स – क्रिकेट संघ, इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार्‍या दहा फ्रँचायझींपैकी एक. २००८ मध्ये स्थापना.
बॉम्बे रियल्टी – २०११ मध्ये स्थापना.

– चंद्रशेखर मराठे

The post वाडिया ग्रुप : जहाजबांधणीपासून सुरू झालेला २८६ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment